माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ग्लोबल न्यूज फोरम 2022 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांचे बीजभाषण
Posted On:
04 OCT 2022 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2022
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल न्यूज फोरम 2022 च्या बैठकीत बीजभाषण केले. ही बैठक नवरात्रीच्या शुभ पर्वात होत आहे, असे डॉ मुरुगन यांनी, आशिया प्रशांत क्षेत्रातील विविध वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना सांगितले. संकटाच्या काळात दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांनी अधिक दक्षता बाळगायला हवी त्याचबरोबर सत्य आणि विश्वास यांचा पाया भक्कम असायला हवा, असे ते म्हणाले. ग्लोबल न्यूज फोरमच्या बैठकीचा विषय ' संकटाच्या काळात सत्य आणि विश्वास यांची जपणूक' हा असून, तो आजच्या काळाशी अतिशय सुसंगत आहे आणि कोविड - 19 च्या काळात तर याचे महत्व कित्येक पटींनी वाढले असून या पँडेमिकला इन्फोडेमिक असेही नाव देण्यात आले होते, असे त्यांनी नमूद केले.
अभिनव कल्पना आणि अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी हा मंच अतिशय उत्कृष्ट व्यासपीठ आहे, असे डॉ मुरुगन म्हणाले. साथरोगाच्या काळात अत्यंत तत्परतेने योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात प्रसार भारतीने मुख्य भूमिका पार पाडली असे सांगून, माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, असे डॉ मुरुगन यांनी अधोरेखित केले. एकीकडे संकटाच्या काळात खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीचा प्रसार जलदगतीने होत असताना दुसरीकडे या दुष्प्रवृत्तीविरुद्ध जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे.
एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनचे 250 सदस्य असून 70 पेक्षा जास्त देशांमध्ये, आणि 3 अब्जाहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेली ही सर्वात मोठी प्रसारण संघटना आहे, असे एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनचे सरचिटणीस जावद मोटाघी यांनी यावेळी सांगितले. आशिया प्रशांत क्षेत्र हे अतिशय वैविध्यपूर्ण क्षेत्र असून यामध्ये विविध संस्कृती, अर्थव्यवस्था आणि शासन प्रणाली असलेल्या लहान-मोठ्या राष्ट्रांचा समावेश आहे. मात्र विविधता हे संकट नाही तर संधी आहे आणि समानता आणि विविधतेचा आदर करण्यावर सर्वाचा भर असला पाहिजे, असे ते म्हणाले
दूरचित्रवाणी आणि रेडिओ प्रसारकांच्या सामूहिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्याबरोबरच क्षेत्रीय प्रसारकांमधील सहकार्य वाढीला लागावे, याकरता एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग करत असलेल्या कार्याबद्दल प्रसार भारतीला कौतुक वाटते, असे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अग्रवाल म्हणाले. तुर्की येथे 2019 मध्ये अशा प्रकारची बैठक झाली होती, त्यानंतर तीन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा ही प्रत्यक्ष स्वरूपातील बैठक होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
साथरोगाच्या काळात केलेल्या कामाचा उल्लेख करताना अग्रवाल यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीने महामारीच्या काळात खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी घेतलेल्या सक्रिय सहभागाचा विशेष उल्लेख केला आणि आणि पत्र सूचना कार्यालयाअंतर्गत तथ्य तपासणी एकक ( फॅक्ट चेक युनिट) देखील स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली. याशिवाय ‘डॉक्टर्स स्पीक’ हा फोन इन अर्थात प्रेक्षकांच्या प्रश्नांना दूरध्वनीवरून उत्तरे देण्याचा हा कार्यक्रम 20 प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात आला असून डॉक्टरांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.
* * *
M.Pange/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865141)
Visitor Counter : 166