गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

जागतिक अधिवास दिवस 2022 साजरा


सर्वसमावेशक आणि न्याय्य विकास साध्य करण्याचा सरकारचा संकल्प, सरकारच्या पथदर्शी शहरी मोहिमा आणि उपक्रमांतून अधोरेखित - हरदीप एस पुरी

Posted On: 03 OCT 2022 8:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2022

 

उज्ज्वल भविष्याची उभारणी करत असताना आपण कोणत्याही नागरिकाला किंवा कोणत्याही ठिकाणाला मागे सोडू शकत नाही, दुर्लक्षित राहू देऊ शकत नाही, असे मत, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस पुरी यांनी व्यक्त केले. याच संकल्पनेसह आपण यंदा जागतिक अधिवास दिवस 2022 साजरा करत आहोत, असे ते म्हणाले. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आज विज्ञान भवन येथे जागतिक अधिवास दिन 2022 साजरा केला, त्यावेळी अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते.

कोविड  – 19 महामारीने  शहरे आणि मानवी वस्त्यांमधली वाढती विषमता, असुरक्षितता आणि आव्हाने अधोरेखित केली आहेत, असे ते म्हणाले.  या महामारीने  आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने राष्ट्रीय आणि स्थानिक सरकारांना शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये, अर्थात कोणालाही मागे सोडू नका, हे ध्येय साध्य करण्यासाठी परिवर्तनशील मार्गावर जाण्यासाठी प्रेरीत केले आहे. भारतात हे ध्येय गाठण्यासाठीच्या प्रयत्नांना ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या घोषणेला अनुसरून दिशा मिळाली आहे.

जागतिक अधिवास दिन 2022 ची संकल्पना 'अंत्योदय से सर्वोदय' या गांधीवादी तत्त्वज्ञानाशी गहीरे नाते सांगणारी आहे. सर्वसमावेशक आणि न्याय्य विकास साध्य करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प, सरकारच्या पथदर्शी शहरी मोहिमा आणि उपक्रमांतून अधोरेखित होतो, असे ते म्हणाले.

भारत सरकारच्या आणि मंत्रालयाच्या विविध योजनांचे दाखले देत ते म्हणाले की  प्रधान मंत्री आवास योजना - PMAY), पीएम स्वनिधी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान - DAY-NULM , स्वच्छ भारत मोहिम अशा योजनांच्या माध्यमातून देशातील असुरक्षित आणि उपेक्षित घटकांच्या कल्याणाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

‘कोणालाही मागे सोडू नका आणि कोणतीही जागा मागे सोडू नका' ही यावर्षीची जागतिक अधिवास दिवसाची संकल्पना, आपल्याला या विषयावर अधिक चर्चा करण्याची आणि संकल्पनेत मांडलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवकल्पना मांडण्याची संधी देते, असे हरदीप पुरी यांनी सांगितले. हवामानातील बदलाप्रमाणेच महामारीमुळे उद्भवलेली परिस्थितीही भारताच्या शहरी भागात कायमस्वरूपी बदल घडवून आणणार आहे, यात शंका नाही. आजवरचा इतिहास लक्षात घेता, अशा मोठ्या संकटांमुळे शहरातील परिस्थितीत कायमस्वरूपी बदल झाले आहेत, असे ते म्हणाले.

 

* * *

S.Kakade/M.Pange/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864847) Visitor Counter : 218