राष्ट्रपती कार्यालय

स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष उपस्थिती

Posted On: 02 OCT 2022 7:47PM by PIB Mumbai

 

स्वच्छ भारत दिवसानिमित्त आज (ऑक्टोबर 2, 2022).  केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते, विविध श्रेणीमधील, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम राष्ट्रपतींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. गांधीजींचे विचार कालातीत आहेत, असे त्या म्हणाल्या. सत्य आणि अहिंसा या तत्वासोबतच, ते स्वच्छतेबद्दलही आग्रही होते. स्वच्छतेबद्दलच्या त्यांच्या निश्चयामागे, समाजातील विकृती नष्ट करणे आणि नव्या भारताची उभारणी करणे हा उद्देश होता. त्यामुळे, त्यांची जयंती स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरी करणे, हीच त्यांना श्रद्धांजली आहे,असे राष्ट्रपती म्हणाले.

स्वच्छ भारत अभियान-ग्रामीण ची सुरुवात 2014 साली करण्यात आली होती, तेव्हापासून, भारतभर, 11 हजारपेक्षा अधिक शौचालये बांधण्यात आली, तसेच 60 कोटी लोकांनी उघड्यावर शौचाला जाण्याच्या त्यांच्या सवयीत बदल केला आहे, असे त्यांनी सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून, भारताने, संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांपैकी, सहावे उद्दिष्ट, 2030 च्या मुदतीच्या 11 वर्षे आधीच साध्य केले आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

स्वच्छ भारत अभियान- ग्रामीण ही लोकांच्या मानसिकतेत बदल घडवणारी चळवळ आहे, असे त्या पुढे म्हणाल्या. कोविड महामारीच्या काळात, प्रत्येकाला शौचालयाचे महत्त्व समजले, हात स्वच्छ धुण्याची सवय लागली. तसेच, नळाने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था या महामारीपासून सर्वांचे  संरक्षण करणारी ठरली. भारत सरकार, आता स्वच्छ भारत अभियान- ग्रामीणच्या  दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करत असून त्याचे उद्दिष्ट, देशातील सहा लाख गावे ओडीएफ प्लस करणे हे आहे. आज आपण उघड्यावरील शौचाच्या पद्धतीपासून पूर्णपणे मुक्तता मिळवली आहे. आता आपल्याला त्यापुढचे अधिक कठीण लक्ष्य साध्य करायचे आहे.  घनकचरा आणि द्रव कचरा व्यवस्थापनाच्या  अधिक जटिल आणि तांत्रिक समस्येवर आपल्याला मात करायची आहे, असे त्या म्हणाल्या. स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवात झाल्यापासून, आतापर्यंत, 1.16 लाख गावांनी, स्वतःला ओडीएफ प्लस म्हणून जाहीर केले आहे. तसेच, घन आणि द्रवकचरा व्यवस्थापनाचे काम तीन लाख गावात सुरु झाले आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, स्वच्छतेसोबतच, प्रत्येक घराला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यावर देखील भारत सरकार काम करत आहे. प्रत्येक घराला 2024 पर्यंत नियमित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्याचे लक्ष्य जल जीवन मिशनअंतर्गत ठेवण्यात आले आहे. त्या म्हणाल्या की जेव्हा 2019 मध्ये जेव्हा जल जीवन मिशन सुरु करण्यात आले, तेव्हा केवळ 3.23 कोटी ग्रामीण घरांत नळाद्वारे पाणी पुरवठा होत होता, जो आकडा गेल्या तीन वर्षांत 10.27 कोटींपर्यंत पोचला आहे. उघड्यावर शौचापासून मुक्त आणि नळाद्वारे पाणी पुरवठ्यामुळे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय घट झाली आहे. मात्र आमचे लक्ष्य मोठे आहे. जल व्यवस्थापन आणि मलनिःसारण यात आपण जगापुढे उदाहरण ठेवले पाहिजे.

आज, आपण अमृत काळात प्रवेश करत आहोत, तेव्हा निरोगी, स्वच्छ आणि आत्मनिर्भर भारत तयार करणे हा आपला संकल्प असायला पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. हे ध्येय गाठण्यासाठी, आपणा सर्वांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, कारण इतक्या मोठ्या लोकसंख्येला मुलभूत सिविधा पुरविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि विपुल स्रोतांची गरज पडणार आहे. आपले राजकीय नेते, वैज्ञानिक, डॉक्टर्स, अभियंते, शिक्षक आणि सर्वात महत्वाचे, नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नाने आपण भारताला विकसित आणि आत्मनिर्भर तयार करण्यात आपण यशस्वी होऊ असा विशास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण बघण्यासाठी इथे क्लिक करा.

***

S.Bedekar/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864548) Visitor Counter : 132