शिक्षण मंत्रालय
तरूण लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधानांची योजना- युवा 2.0 चा प्रारंभ
Posted On:
02 OCT 2022 7:09PM by PIB Mumbai
तरूण आणि होतकरू लेखकांना मार्गदर्शन करून त्यांना घडवण्यासाठी, पंतप्रधानांची योजना म्हणजेच ‘युवा-2.0 ‘ या योजनेचा प्रारंभ आज केंद्रीय शिक्षण आणि उच्च शिक्षण मंत्रालय तसेच उच्च शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आला. 30 वर्षाच्या आतील तरूण आणि उदयोन्मुख लेखकांना प्रशिक्षणाप्रमाणे मार्गदर्शन करण्याची ही योजना असून देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच भारत आणि भारतीय लेखनाला जागतिक स्तरावर पुढे नेण्याचा या योजनेचा उद्देष्य आहे. युवाच्या पहिल्या आवृत्तीत 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीतून लेखन करणा-या तरूण आणि उदयोन्मुख लेखकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्यामुळे ही योजना प्रभावी ठरली. त्यामुळे आता युवा 2.0 म्हणजेच (वाययूव्हीए - तरूण, होतकरू आणि अष्टपैलू- बहुमुखी लेखक) हा योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.
युवा 2.0 (तरूण, होतकरू आणि अष्टपैलू लेखक) ही योजना तरूणांनी भारतीय लोकशाही समजून घेऊन तिचे महत्व समजावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरून तयार केली आहे. युवा 2.0 हा India@ 75 Project (स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव) याचाच एक भाग असून-लोकशाही(संस्था, घटना, लोक, घटनात्मक मूल्ये-भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ) यावरील तरूणांचे दृष्टीकोन सर्जनशील आणि कल्पकतेने समोर आणण्यासाठी आहे. तसेच या योजनेतून भारतीय वारसा, संस्कृती आणि ज्ञान व्यवस्था यांना प्रोत्साहन देऊन अशा प्रकारच्या विषयांवर लिहिणा-या लेखकांचा स्त्रोत विकसित करण्यासाठी सहाय्य करेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्येही तरूण मनांना सक्षम करून तरूण वाचक आणि शिकणारे विद्यार्थी यांना भावी जगात नेतृत्वाची भूमिका साकारण्यास सक्षम करणारी, परिसंस्था विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. भारतात एकूण तरूणांची लोकसंख्या 66 टक्के आहे. यामुळे वयाच्या तक्त्यामध्ये भारत सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे युवावर्गामध्ये क्षमता निर्मिती आणि त्यांच्याद्वारे राष्ट्र उभारणी यासाठी त्यांच्यातील क्षमतांचा देशाने उपयोग करून घेतला पाहिजे. याची प्रतीक्षा देशालाही आहे. तरूण सर्जनशील लेखकांच्या नव्या पिढीला मार्गदर्शन करून त्यांना लेखक म्हणून घडिवण्याच्या उद्देष्याने सर्वोच्च पातळीवर पुढाकार घेण्याची अत्यंतिक गरज आहे. या संदर्भात, युवा 2.0 ही योजना सर्जनशील जगात लेखन क्षेत्रातील भावी मान्यवर तयार करण्यासाठी पाया रचण्याचे खूप मोठे काम करून, याबाबतीत खूप पुढे जाणार आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यास(नॅशनल बुक ट्रस्ट),ही केंद्रीय, शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्था मार्गदर्शनाच्या विविध-परिभाषित टप्प्यांतर्गत या योजनेची अंमलबजावणी सुनिश्चित करेल.या योजनेअंतर्गत तयार केली गेलेली पुस्तके नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया द्वारे प्रकाशित केली जातील तसेच संस्कृती आणि साहित्य यांची देवाणघेवाण करण्यासाठी इतर भारतीय भाषांमध्ये त्यांचे अनुवादही केले जातील, त्यामुळे 'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पनेचे संवर्धन होईल. निवड झालेले तरुण लेखक जगातील काही उत्कृष्ट लेखकांशी संवाद साधतील,साहित्य संमेलनात सहभागी होतील.
भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा समावेश असलेल्या भारतातील लोकशाहीच्या विविध पैलूंवर लिहिणाऱ्या लेखकांचा प्रवाह विकसित करण्यास ही योजना मदत करेल.याशिवाय,या योजनेद्वारे इच्छुक तरुणांना स्वत:ला मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी आणि भारतीय लोकशाही मूल्यांचा व्यापक दृष्टिकोन देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून प्रकट करण्यासाठी एक मंच उपलब्ध करेल. 21 व्या शतकातील भारतात, भारतीय साहित्याचे अग्रदूत निर्माण करण्यासाठी तरुण लेखकांची पिढी तयार होणे आवश्यक आहे म्हणून ही योजना तयार करण्यात आली आहे. पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात आपला देश तिस-या क्रमांकावर आहे आणि आपल्या देशात स्वदेशी साहित्याचा खजिना आहे, हे सर्व भारताने जागतिक स्तरावरुन प्रदर्शित करण्याची आवश्यकता आहे.
युवा 2.0 (YUVA 2.0) योजनेचे वेळापत्रक (तरुण, होतकरू आणि बहुमुखी लेखक) पुढीलप्रमाणे आहे:
- योजनेची घोषणा 2 ऑक्टोबर 2022.
- 2 ऑक्टोबर 2022 - 30 नोव्हेंबर 2022 दरम्यान https://www.mygov.in/ द्वारे आयोजित केलेल्या अखिल भारतीय स्पर्धेद्वारे एकूण 75 लेखकांची निवड केली जाईल.
- प्राप्त प्रस्तावांचे मूल्यमापन 1 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत केले जाईल.
- 28 फेब्रुवारी 2023 रोजी विजेत्यांची घोषणा केली जाईल.
- तरुण लेखकांना 1 मार्च 2023 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत सुविख्यात लेखक/गुरूंकडून प्रशिक्षण दिले जाईल.
- त्यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रकाशित पुस्तकांचा पहिला संच 2 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित केला जाईल.
***
S.Bedekar/U.Kulkarni/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1864532)
Visitor Counter : 611