रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने  स्वच्छता आणि प्रलंबित संदर्भाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम 2.0 चा केला प्रारंभ

Posted On: 02 OCT 2022 4:39PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, स्वच्छता आणि प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आजपासून एक विशेष मोहीम-टप्पा 2 ची सुरुवात केली आहे. ही मोहीम मंत्रालयाचे मुख्य कार्यालय आणि इतर उपकार्यालयांमधे, म्हणजे, एनएचएआय, एनएचआयडीसीएल, आयआरसी आणि आयएएचई अशा कार्यालयात राबवली जाणार आहे. ह्या विशेष मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात, मंत्रालयाचे मुख्यालय, एनएसएआय आणि एनएचआयडीसीएल यांची कार्यालये तसेच पथकर नाके आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुविधा केंद्रांची कार्यालये स्वच्छ केली जाणार आहेत.

आज यानिमित्त,वाहतूक भवन या इमारतीत झालेल्या कार्यक्रमात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव, गिरिधर अरमाने यांनी, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. तसेच, विविध श्रेणींमध्ये आलेल्या प्रलंबित प्रकरणांचाही वेळेत निपटारा करण्याच्या  सूचना सचिवांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  यात, खासदार संदर्भ, पंतप्रधान कार्यालय संदर्भ, सार्वजनिक तक्रार, संसदेत देण्यात आलेली आश्वासने, अशा सगळ्या तक्रारी-प्रकरणे यांचा निपटाराही ह्या मोहिमेअंतर्गत केला जाणार आहे. तसेच, मंत्रालयाच्या निर्णयप्रक्रियेत, मंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडून कमाल चार स्तरांवरील दिशानिर्देशांचे काटेकोर पालन केले जावे, असेही ते म्हणाले. 

एनएचएआय आणि एनएचआयडीसीएल यांनी, आपल्या देशभरातील  सर्व अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना  स्वच्छतेची शपथ देत, ह्या मोहिमेचा शुभारंभ केला.

भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सर्व अधिकृत व्यवहारांमध्ये पूर्ण सचोटी आणि अत्यंत स्वच्छता राखण्याचा सल्लाही यावेळी सचिवांनी सर्वांना दिला. अधिका-यांनी सामान्य जनतेच्या गरजांकडे लक्ष द्यायला  हवे, तसेच त्यांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.या मोहिमेच्या कालावधीत सर्व महामार्ग  खड्डेमुक्त करण्याचे तसेच, महामार्गांच्या बाजूला असणारे छोटे रस्ते  राइट ऑफ वेज (RoW) स्वच्छ, मोकळे करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत, असे निर्देश सचिवांनी दिले.

मंत्रालयाचे कार्यालय परिसर स्वच्छ आणि नीटनेटका  ठेवण्यासाठी सफाई कामगार करत असलेल्या कष्टाची यथोचित दखल घेऊन, यावेळी सचिवांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करत त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह  सचिवांनी वाहतूक भवनाच्या आवारात श्रमदानही  केले  आणि वाहतूक भवन परिसराची फेरी मारून स्वच्छतेची पाहणी केली.

***

S.Bedekar/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864491) Visitor Counter : 213


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil