दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सहाव्या भारतीय मोबाईल परिषद 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार भारतातील 5G सेवांचा शुभारंभ
Posted On:
30 SEP 2022 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या म्हणजे एक ऑक्टोबर रोजी भारतातील 5G सेवांचा शुभारंभ होणार असून त्यांच्या हस्ते नवी दिल्लीतील प्रगती मैदानात सहाव्या भारतीय मोबाईल परिषद 2022 (IMC-2022) चे उदघाटन होणार आहे.
अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 5G सेवांचा शुभारंभ होत आहे. अलीकडेच 5G ध्वनिलहरींचा यशस्वीरित्या लिलाव करण्यात आला आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांना 51,236 मेगाहर्टझ इतक्या क्षमतेचे स्पेक्ट्रम वाटप यशस्वीरित्या करण्यात आले ज्याचे एकूण उत्पन्न 1,50,173 कोटी रुपये इतके आहे.
दूरसंवाद विभागाने ऑगस्ट 2022 मध्ये राईट ऑफ वे (आरओडब्ल्यू) नियम 2016 मध्ये सुधारणा केल्या आहेत, ज्यायोगे राईट ऑफ वे अनुमतीसाठी वाजवी दराने शुल्क आकारण्यात येईल, आणि रस्त्यावरील फर्निचरवर 5G चे लहान सेल आणि ऑप्टिकल फायबर केबलच्या स्थापनेसाठी आरओडब्ल्यू शुल्काची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दूरसंवाद विभागाने 2018 मध्ये तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था IITs, इंटरनेट माहिती सेवा IISc बेंगळुरू आणि SAMEER यांच्या मदतीने 5G टेस्टबेडची स्थापना केली आहे. स्टार्टअप्सद्वारे विचारधारा आणि नवीन संशोधनाच्या कल्पना मांडण्यासाठी तसेच नाविन्यपूर्ण उत्पादनांना चालना देण्यासाठी 2020 मध्ये 5G हॅकेथॉन आयोजित करण्यात आली होती. 5G केस लॅब च्या स्थापनेसाठी 2021 पासून आंतर मंत्रालयीन समिती 12 केंद्रीय मंत्रालयांच्या समन्वयाने कार्य करत आहे.
या प्रयत्नांमुळे पंतप्रधानांच्या “जय अनुसंधान” या आवाहनाला प्रत्यक्षात साकारण्यात मदत होईल. हे सर्व प्रयत्न भारताच्या उत्पादन आणि दूरसंवाद क्षेत्रासाठी परिवर्तन घडवून आणणारे आहेत, ज्यामुळे देशांतर्गत 5G एंटरप्राइझ कॅरियर ग्रेड स्टॅक तसेच नाविन्यपूर्ण प्रभावी 5G युज केसेस विकसित होतील.
पंतप्रधानांच्या हस्ते काही निवडक शहरांमध्ये लॉन्च केले जाणारे 5G चे जाळे पुढील काही वर्षांत संपूर्ण देशात पसरेल.
या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, तसेच त्यासाठी नोंदणी करण्यासाठी, या संकेतस्थळाला भेट देऊ शकता:
www.indiamobilecongress.com/.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1863879)
Visitor Counter : 250