पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्याला गती देणे ही काळाची गरज आहे: भूपेंद्र यादव
Posted On:
28 SEP 2022 6:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2022
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांनी आज संयुक्त अरब अमिरात मधील दुबई येथे जागतिक व्यापार केंद्रात, जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषदेत हरित अर्थव्यवस्थेवरील मंत्रिस्तरीय गोलमेज बैठकीला हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय मंत्र्यांनी आर्थिक विकासाबरोबरच पर्यावरण आणि हवामानविषयक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या गरजेवर भर दिला. विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांना गती देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली भारत राबवत असलेल्या विविध धोरणे तसेच भागीदारी अंतर्गत कामगिरी त्यांनी अधोरेखित केली. ऊर्जा, उद्योग, वाहतूक, कृषी आणि वनीकरण यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये हरित अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि इतर उपक्रमांसारख्या जागतिक उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.
केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणाले की, ऊर्जा कार्यक्षमता आणि थर्मल कम्फर्टवर आधारित कूलिंग ॲक्शन प्लॅन असलेला भारत हा पहिला देश असून भारताने उजाला योजना आणि औद्योगिक ऊर्जा कार्यक्षमता वाढवणाऱ्या योजनांसह काही महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. यावेळी भारताच्या महत्त्वाकांक्षी नवीकरणीय ऊर्जा प्रगतीचाही उल्लेख करण्यात आला.
हवामान बदल रोखण्यासाठीच्या वित्त व्यवस्थेविषयी( क्लायमेट फायनान्स), बोलताना यादव म्हणाले की, नेट झिरोसाठी ग्लासगो वित्तीय आघाडीने अंदाज व्यक्त केला आहे की, 2050 पर्यंत जागतिक स्तरावर निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी 100 ट्रिलियन डॉलर्सची आवश्यकता आहे. परंतु, विकसित देश 2020 पर्यंत वार्षिक 100 अब्ज डॉलर्सची रक्कम जमवण्यातही अपयशी ठरले आहेत तर भारताच्या राष्ट्रीय योगदानाला ( NDC) मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत गुंतवणुकीतून पाठबळ मिळाले आहे.
* * *
S.Kane/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1863078)
Visitor Counter : 234