रसायन आणि खते मंत्रालय

कॅनडामधील कॅनपोटेक्स या जागतिक स्तरावरील पोटॅशियमच्या सर्वात मोठ्या पुरवठादाराबरोबर भारतीय खत कंपन्यांचा सामंजस्य करार

Posted On: 28 SEP 2022 2:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2022

 

कोरोमंडल इंटरनॅशनल, चंबल फर्टिलायझर्स आणि इंडियन पोटॅश लिमिटेड या भारतीय खत कंपन्यांनी कॅनडामधील कॅनपोटेक्स या जागतिक स्तरावरील पोटॅशियमच्या सर्वात मोठ्या पुरवठादाराबरोबर 27 सप्टेंबर 2022 रोजी सामंजस्य करार केला. आज नवी दिल्लीत, केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांना हा सामंजस्य करार सादर करण्यात आला. हा करार म्हणजे भारतातील शेतकरी समुदायासाठी खतांची दीर्घकालीन उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. कॅनडामधील कॅनपोटेक्स हे जागतिक स्तरावरील पोटॅशियमचे सर्वात मोठे पुरवठादार असून ते दरवर्षी सुमारे 130 लाख मेट्रिक टन उत्पादनाची निर्यात करतात.

भारतीय शेतकऱ्यांना म्युरिएट ऑफ पोटॅशचा पुरवठा करण्यासाठी अशा प्रकारच्या दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी झाल्याबद्दल, केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आनंद व्यक्त केला. या करारामुळे पोटॅश खताचा पुरवठा आणि दर, दोन्ही बाबींमधील अस्थिरता कमी होईल आणि भारताला या खताचा दीर्घकालीन पुरवठा सुनिश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या स्रोतांचा चांगला पुरवठा होत राहावा, यासाठी स्रोतांनी समृद्ध असलेल्या देशांसोबत दीर्घकालीन भागीदारी करण्यासाठी भारत सरकार देशातील खत उद्योगाला प्रोत्साहन देत आहे. कच्चा माल आणि खतांसाठी आवश्यक खनिजांच्या आयातीवर भारतातील खत उद्योग अवलंबून आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भागीदारीच्या माध्यमातून खते आणि कच्च्या मालाची सुरक्षित दीर्घकाळ उपलब्धता सुनिश्चित होते, तसेच बाजारातील अस्थिर परिस्थितीतही दर स्थिर ठेवणे शक्य होते, असे ते म्हणाले.

या सामंजस्य कराराअंतर्गत कॅनडामधील कॅनपोटेक्समार्फत भारतीय खत कंपन्यांना 3 वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक 15 लाख मेट्रिक टन पोटॅशचा पुरवठा करणार आहे. या पुरवठा भागीदारीमुळे देशातील खतांची उपलब्धता वाढविण्याबरोबरच पुरवठा आणि दरातील अस्थिरता कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

* * *

G.Chippalkatti/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1862893) Visitor Counter : 150