पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
एकदाच वापरता येणाऱ्या, बंदी असलेल्या वस्तूंसाठी पर्यावरणस्नेही पर्यायांविषयी राष्ट्रीय प्रदर्शन आणि स्टार्टअप परिषद 2022
Posted On:
26 SEP 2022 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2022
देशात बंदी घातलेल्या, एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकला पर्याय देण्यासाठी आणि नवोन्मेष आणि स्टार्टअप परिसंस्थेला पर्यावरणस्नेही पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम उपक्रमांपैकी एक म्हणून, बंदी घातलेल्या एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिक वस्तूंच्या पर्यायांवर राष्ट्रीय प्रदर्शन आणि स्टार्टअप्स परिषद -2022 चे आज चेन्नईमधील चेन्नई ट्रेड सेंटर येथे उद्घाटन करण्यात आले. तमिळनाडू सरकारचे पर्यावरण, हवामान बदल, युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री शिव व्ही मय्यानाथन यावेळी उपस्थित होते.
प्रदर्शन आणि स्टार्टअप्स परिषद -2022 च्या उदघाटनावेळी भारत सरकारचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांचा दृक-श्राव्य संदेश दाखवण्यात आला. भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि तामिळनाडू सरकार यांनी संयुक्तरित्या प्रदर्शन आणि स्टार्टअप परिषदेचे आयोजन केले आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आपल्या संदेशात असे अधोरेखित केले की, संसाधनांच्या जाणीवपूर्वक वापराच्या जागी अविवेकी वापरामुळे खराब आणि व्यवस्थापन न केलेला प्लास्टिक कचरा आढळतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ताग, आणि बांबू यांसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करणे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक जीवनशैलीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे.
पर्यावरण पूरक पर्याय घेऊन देशभरातील 150 हून अधिक उत्पादक या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. पर्यावरणस्नेही पर्यायांमध्ये काथ्या, उसाची चिपाडे, तांदूळ आणि गव्हाचा कोंडा, वनस्पती आणि शेतीचे अवशेष, केळी आणि सुपारीची पाने, ताग आणि कापड यासारख्या नैसर्गिक तंतूपासून बनवलेल्या वस्तूंचा समावेश आहे. हे राष्ट्रीय प्रदर्शन नागरिक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि बंदी घातलेल्या एकदा वापरायच्या प्लास्टिकच्या वस्तूंना पर्यावरणपूरक पर्याय देणाऱ्या उत्पादकांसाठी खुले आहे. हे प्रदर्शन आणि स्टार्टअप्स परिषद पर्यावरणस्नेही पर्यायांच्या उपलब्धतेबद्दल मोठ्या प्रमाणावर जागरूकता पसरवेल आणि स्टार्टअप्सना त्यांचे उपाय वाढवण्यासाठी एक मंच प्रदान करेल.
राज्य सरकारे, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे, संबंधित केंद्रीय मंत्रालये, वित्तीय संस्था आणि बँकांचे प्रतिनिधी या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. या प्रदर्शनासोबतच, एकदा वापरायच्या प्लास्टिकला पर्याय आणि हवेच्या गुणवत्ता व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सची परिषदही आयोजित करण्यात आली आहे. एक्स्पो सह आयोजित. स्टार्टअप्सची परिषद नवोन्मेषक आणि संस्था आणि देशातील स्टार्टअप परिसंस्थेला समर्थन देणारे सरकारी विभाग यांच्यात विचार विनिमय करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. सागरी प्लास्टिक कचरा - समस्या, आव्हाने आणि पुढे जाण्याचा मार्ग आणि पर्यावरणस्नेही पर्यायांचे उत्पादन या विषयावरील सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1862384)
Visitor Counter : 176