माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रसार माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राच्या क्षमतांच्या पुरेपूर वापरासाठीच्या धोरणांबाबत सरकार आणि उद्योग जगतादरम्यान संवाद


विविध प्रसारण मंचांचा लाभ घ्या आणि भारताला ग्लोबल कंटेंट हब बनवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावा, असे माहिती आणि प्रसारण सचिवांचे आवाहन

Posted On: 26 SEP 2022 7:49PM by PIB Mumbai

मुंबई, 26 सप्‍टेंबर 2022

 

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज, 26 सप्टेंबर 2022 रोजी मुंबईतील चित्रपट उद्योगातील विविध भागधारकांशी संवाद साधला.

दृकश्राव्य क्षेत्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरणे, परस्पर सहकार्य तसेच सरकार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारक यांच्यात नियमित संवाद आवश्यक आहे. या अनुषंगाने, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे – एनएफडीसी तर्फे आज, 26 सप्टेंबर 2022 रोजी मुंबईत, अशा भागधारकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर भाकर, या बैठकीसाठी उपस्थित होते.

त्याचबरोबर, मॅडॉक फिल्म्सचे संस्थापक दिनेश विजन, धर्मा प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता, अयान मुखर्जी, आर. बाल्की, अबंडांटियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम मल्होत्रा, अॅमेझॉन प्राइम व्हिडीयोचे गौरव गांधी आणि अपर्णा पुरोहित, नेटफ्लिक्सच्या मोनिका शेरगिल, पीईएन इंडियाचे अध्यक्ष जयंतीलाल गाडा, बालाजी मोशन पिक्चर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाविनी शेठ, प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिबाशीष सरकार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन तेज आहुजा तसेच निर्माते महावीर जैन आणि मधु मंटाना, अशा प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनी आणि मनोरंजन उद्योग व्यावसायिकांनी उद्योग विश्वाचे प्रतिनिधित्व केले.

प्रसार माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या धोरणात्मक उपक्रमांबाबत यावेळी प्राधान्याने चर्चा करण्यात आली. भारतात चित्रीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी चित्रपट सुविधा कार्यालयाच्या माध्यमातून माहिती आणि प्रसारण मंत्रालय करत असलेले प्रयत्न तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाच्या प्रयत्नांबाबत माहिती देण्यात आली. आंतरराष्‍ट्रीय निर्मिती आणि अधिकृत सह-निर्मितीसाठी नुकतीच सुरू करण्यात आलेली प्रोत्‍साहनपर योजना आणि त्‍यामुळे भारतात आशय निर्मितीसाठी होणाऱ्या लाभाबाबतही यावेळी तपशीलवार चर्चा करण्यात आली. सरकारतर्फे देऊ करण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत, उद्योगांनी केलेल्या अपेक्षित प्रोत्साहनपर सूचनांची नोंदही यावेळी घेण्यात आली.

आगामी 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव  यशस्वी करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांबाबत आणि त्याद्वारे उद्योगासाठी निर्माण होणाऱ्या संधींबाबतही प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून, सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2021 च्या मसुद्यामध्ये केलेल्या सुधारणांबाबत अभिप्राय घेण्यात आला. या भागधारकांनी सकारात्मक अभिप्राय देत, प्रस्तावित सुधारणा एकमताने स्वीकारल्या.

भारतातील चित्रपटगृहांच्या संख्येबद्दल उद्योग जगताच्या मनातील प्रश्नांची दखल घेत, चित्रपटगृहांच्या बांधकामांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने एक खिडकी यंत्रणा विकसित करत असून, त्यासंदर्भातील कायदा प्रगतीपथावर असल्याची माहितीही संबंधित भागधारकांना देण्यात आली. दृकश्राव्य क्षेत्रातील इतर अनेक उपक्रमांबाबतही उपस्थितांना तपशीलवार माहिती देण्यात आली.

आजची चर्चा यशस्वी झाल्याचे सांगत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले “चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी मंत्रालयाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी  मनोरंजन उद्योग जगतासोबत साधलेला संवाद, ही एक उत्तम संधी आहे. या संवादात सहभागी सर्व भागधारकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. त्यांच्यासाठी प्रदान केलेल्या विविध प्रसारण मंचांचा लाभ घ्यावा आणि भारताला ग्लोबल कंटेट हब बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना त्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन आम्ही त्यांना केले आहे.”

 

* * *

PIB Mumbai | JPS/S.Patil/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1862344) Visitor Counter : 270