विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतभरातील विद्यालयांमध्ये रसायनशास्त्राच्या अभ्यासाला पाठबळ देण्यासाठी रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री (आरएससी) आणि सीएसआयआर एकत्र येऊन काम करणार


देशातील 30 सीएसआयआर प्रयोगशाळांमध्ये आयोजित केलेल्या आरएससीच्या जागतिक ‘कॉईन’ प्रयोगामध्ये देशभरातील दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

Posted On: 23 SEP 2022 2:31PM by PIB Mumbai

 

आरएससी अर्थात रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री आणि सीएसआयआर अर्थात औद्योगिक आणि शास्त्रीय संशोधन मंडळ या दोन संस्थांनी भारतभरातील विद्यालये तसेच महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रसायनशास्त्राच्या अभ्यासाची रुची वाढविण्यासाठी तयार केलेल्या आउटरीच कार्यक्रमासाठी भागीदारी केली आहे.

देशातील 30 सीएसआयआर प्रयोगशाळांमध्ये आयोजित केलेल्या आरएससीच्या जागतिक कॉईन प्रयोगामध्ये देशभरातील दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे.

सीएसआयआरच्या जिज्ञासा या शालेय विद्यार्थी तसेच संशोधकांच्या देशव्यापी आउटरीच कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एकत्र येऊन काम करण्याच्या हेतूने या दोन संस्थांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा करार बिगर-आर्थिक प्रकारचा आहे तसेच तो नवीकरण करण्याच्या पर्यायासह किमान तीन वर्षांच्या काळासाठी लागू असेल.                   

सीएसआयआर ही संस्था समुद्रशास्त्र आणि खाणकामापासून रसायने आणि नॅनो तंत्रज्ञानापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्व प्रकारच्या विषयांच्या विस्तृत श्रेणीमध्ये संशोधन आणि विकास कार्य करण्यासाठी समर्पितपणे कार्य करत आहे. देशभरात या संस्थेच्या प्रयोगशाळा तसेच आउटरिच केंद्रांचे उत्तम जाळे पसरलेले आहे.

जिज्ञासा हा कार्यक्रम भारतातील विद्यमान शैक्षणिक कार्यक्रमांना पूरक ठरेल. उदाहरणार्थ, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री आरएससी आणि जिज्ञासा यांच्यातील भागीदारीच्या माध्यमातून आरएससीच्या विद्यमान शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आणि रसायनशास्त्र विषयक शिबिरांचा विस्ताराला हातभार लागेल तसेच या भागिदारीच्या माध्यमातून अनेक ऑनलाइन शिक्षण उपक्रमही सुरू करण्यात येतील.

जिज्ञासा कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, या भागिदारीमार्फत एका  जागतिक प्रयोगाचे आयोजन केले जात असून त्यात सीएसआयआरच्या सर्व प्रयोगशाळा सहभागी होत आहेत. सीएसआयआरच्या 30 पेक्षा जास्त प्रयोगशाळांमध्ये आयोजित या ग्लोबल कॉईन प्रयोगात किमान 2,000 शालेय विद्यार्थी, 150 शिक्षक आणि 350 स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. या प्रयोगात सहभागी झालेल्या सर्वांना, वेगवेगळ्या प्रकारच्या नाण्यांपासून तयार केलेल्या बॅटरींची तुलना करण्यास सांगितले जाणार आहे. पुढच्या टप्प्यांत त्यांना, या प्रयोगातून आपण प्राप्त केलेल्या माहितीची तुलना, जगभरातून सहभागी झालेल्या इतरांना प्राप्त झालेल्यांच्या माहितीशी करता येणार आहे.

22 सप्टेंबर रोजी आयोजित एका समारंभात दोन्ही संस्थांनी यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सीएसआयआरतर्फे डॉ. गीता वाणी रायसम यांनी तर आरएससी तर्फे मुख्य परिचालन अधिकारी पॉल लुईस यांनी, सीएसआयआरचे महासंचालक डॉ. एन कलायसेल्वी आणि राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेचे (CSIR-NPL) संचालक डॉ. वेणुगोपाल अचंता यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

 

रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री (RSC)

रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री ही, रासायनिक शास्त्रज्ञांना परस्परांशी, इतर शास्त्रज्ञांशी आणि संपूर्ण समाजाशी जोडणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. लंडनमध्ये 1841 साली या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे 50,000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सदस्य आहेत. शास्त्रज्ञांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे मोलाचे काम, ही संस्था करते.

 

उद्योग आणि वैज्ञानिक संशोधन परिषद (CSIR)

उद्योग आणि वैज्ञानिक संशोधन परिषद - सीएसआयआर ही 1942 साली स्थापन झालेली एक स्वायत्त संस्था आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन आणि विकास कामासाठी ही संस्था ओळखली जाते. सीएसआयआर ही एक समकालीन संशोधन, विकास आणि अभियांत्रिकी संस्था आहे. या संस्थेचे जाळे देशभरात पसरलेले असून, संस्थेच्या तब्बल 37 राष्ट्रीय प्रयोगशाळा देशभरात कार्यरत आहेत.

***

S.Bedekar/S.Chitnis/M.Pange/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1861707) Visitor Counter : 195


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu