इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले निर्मिती परिसंस्थेच्या विकास कार्यक्रमा”ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या तंत्रज्ञान नोड्सशी संबंधित सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन एककांना तसेच संयोगी सेमीकंडक्टर्स, पॅकेजिंग आणि सेमीकंडक्टर संबंधी इतर सुविधांसाठी 50% अनुदान मिळण्याची परवानगी

Posted On: 21 SEP 2022 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले निर्मिती परिसंस्थेच्या विकासासाठीच्या कार्यक्रमामध्ये पुढील सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे :

  1. या योजनेअंतर्गत भारतात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन उद्योग उभारणाऱ्या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञान नोड्ससाठी समान वागणूक तत्वाच्या आधारावर  त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या 50% वित्तीय पाठबळ देण्यात येईल.
  2. डिस्प्ले फॅब्रिकेशन उद्योग उभारण्यासाठी समान वागणूक तत्वाच्या आधारावर त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या 50% वित्तीय पाठबळ देण्यात येईल.
  3. या योजनेअंतर्गत भारतात संयोगी सेमीकंडक्टर्स/ सिलिकॉन फोटॉनिक्स/ सेन्सर्स फॅब्रिकेशन आणि सेमीकंडक्टर्स एटीएमपी/ओएसएटी सुविधांची उभारणी करताना समान वागणूक तत्वाच्या आधारावर त्यांच्या भांडवली खर्चाच्या 50% वित्तीय पाठबळ देण्यात येईल. त्याखेरीज, या योजनेतील लक्ष्यीत तंत्रज्ञानांमध्ये डिस्क्रिट सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन एककांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार, सर्व प्रकारच्या तंत्रज्ञान नोड्स माध्यमातून सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन एककांची उभारणी करताना एकसमान असे प्रकल्प खर्चाच्या 50% वित्तीय पाठबळ देण्यात येईल. संयोगी सेमीकंडक्टर्स आणि आधुनिक प्रकारच्या पॅकेजिंग साठी लागणारे विशिष्ट प्रकारचे तंत्रज्ञान लक्षात घेऊन, सुधारित कार्यक्रमामध्ये संयोगी सेमीकंडक्टर्स/ सिलिकॉन फोटॉनिक्स/ सेन्सर्स/डिस्क्रिट सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन एकके आणि एटीएमपी/ओएसएटी सुविधा यांच्या उभारणीसाठी समान वागणूक तत्वाच्या आधारावर त्यांच्या भांडवली खर्चाच्या 50% वित्तीय पाठबळ देण्यात येईल

या योजनेने जागतिक पातळीवरील अनेक सेमीकंडक्टर उत्पादन कंपन्यांना भारतात त्यांचे फॅब्रिकेशन उद्योग उभारण्यासाठी आकर्षित केले आहे. हा सुधारित कार्यक्रम भारतातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देईल. संभाव्य गुंतवणूकदारांशी झालेल्या चर्चेच्या आधारावर अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की लवकरच या योजनेतून पहिली सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा उभारण्यात येईल.

भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती मोहिमेला मार्गदर्शन करण्यासाठी भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले निर्मिती परिसंस्थेच्या विकास कार्यक्रमासाठीची नोडल संस्था म्हणून उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील जागतिक कीर्तीच्या तज्ञांची सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने सर्व प्रकारच्या तंत्रज्ञान नोड्स माध्यमातून सिलिकॉन सेमीकंडक्टर्स फॅब्रिकेशन एकके / सिलिकॉन फोटॉनिक्स/ सेन्सर्स/डिस्क्रिट सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन एकके आणि एटीएमपी/ओएसएटी सुविधा यांच्यासाठी एकसमान पद्धतीचे पाठबळ देण्याची शिफारस केली होती आणि सरकारकडून ही शिफारस स्वीकारण्यात आली.इतर अनेक प्रकारांसोबत, 45एनएम आणि त्यापेक्षा अधिक आकाराच्या तंत्रज्ञान नोड्सना वाहन क्षेत्र, उर्जा आणि दूरसंचार क्षेत्राकडून मोठी मागणी आहे. तसेच समग्र सेमीकंडक्टर बाजाराच्या सुमारे 50% हिस्सा  या घटकाचा  आहे.

 

 

  

 

 

 

 

S.Kulkarni /S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1861219) Visitor Counter : 165