माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्था,(एआयबीडी)च्या 47 व्या वार्षिक मेळाव्याचे केले उद्घाटन
प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अगरवाल यांना 2022 साठीचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान
Posted On:
20 SEP 2022 4:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2022
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्था (एआयबीडी)च्या 47 व्या वार्षिक मेळाव्याचे आणि 20 व्या बैठकीचे उद्घाटन केले. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा आणि एआयबीडीच्या संचालिका फिलोमिना ज्ञानप्रगासम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अगरवाल यांना 2022 साठीचा जीवनगौरव पुरस्कार यावेळी ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुख्य प्रवाहातील माध्यमांना सर्वात मोठा धोका हा नव्या युगातील डिजिटल प्लॅटफॉर्मचा नसून खुद्द मुख्य प्रवाहातील माध्यम वाहिन्यांचाच आहे, असे ठाकूर यावेळी म्हणाले खरी पत्रकारिता ही वस्तुस्थितीला सामोरे जाणे, सत्य मांडणे आणि सर्व बाजूंना त्यांचे मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही असते, असे ते पुढे म्हणाले.
ध्रुवीकरण करणाऱ्या, खोट्या कथा पसरवणार्या आणि जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या पाहुण्यांना आमंत्रित केल्याने वाहिनीची विश्वासार्हता कमी होते, अशी टिप्पणी त्यांनी केली.
“चर्चात्मक कार्यक्रमांना बोलावले जाणारे अतिथी, आवाज आणि व्हिज्युअल संबंधी तुमचे निर्णय - प्रेक्षकांच्या दृष्टीने तुमची विश्वासार्हता ठरवतात. तुमचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक एक मिनिटासाठी थांबू शकतात, परंतु विश्वासार्हतेचे निकष पाळले नाहीत तर तुमच्या निवेदकावर, तुमच्या वाहिनीवर किंवा ब्रँडवर बातम्यांचा विश्वासार्ह आणि पारदर्शक स्रोत म्हणून कधीही प्रेक्षक विश्वास ठेवणार नाहीत”, असे ते पुढे म्हणाले.
कोणाच्याही साउंडबाइट्समध्ये असलेल्या व्यक्तव्यावरुन केवळ त्याचा निष्कर्ष काढू नका, संपूर्ण वक्तव्य ऐकून स्वतःच पुन्हा त्याचा अर्थ समजून घ्या, अशी सूचना त्यांनी केली. तसेच चॅनेलवर येणारे पाहुणे आणि वाहिन्यांसाठीही काही नियम आणि अटी तयार करा, असे आवाहन ठाकूर यांनी प्रसारकांना केले.
माध्यमांकडे, त्याच्या सर्व प्रकारात, सक्षमीकरणाचे प्रभावी साधन म्हणून सार्वजनिक धारणा आणि दृष्टीकोनांना आकार देण्याची अफाट क्षमता आहे, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, “माध्यमांचे स्थान अधिक सक्षम आणि फायद्याचे बनवण्यासाठी आमच्या पत्रकार आणि प्रसारक मित्रांसाठी सक्षम वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक आहे.”
प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एआयबीडीचे अध्यक्ष मयंक अगरवाल यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. एआयबीडी ने टाळेबंदीच्या काळातही प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण कार्यक्रम चालू ठेवले. फक्त गेल्या वर्षात 34 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ते कार्यक्रम परंपरेवर तसेच हवामान बदल, हरित तंत्रज्ञान, शाश्वत विकास, जलद अहवाल, मुलांसाठी प्रोग्रामिंग इत्यादीसारख्या उदयोन्मुख समस्यांवर केंद्रित होते, असे अगरवाल यांनी सांगितले.
भारतातील विविध दूतावासांचे प्रमुख, एआयबीडी सदस्य देशांचे प्रतिनिधी, प्रसार भारतीचे अधिकारी आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध शाखांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
R.Aghor /P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860881)
Visitor Counter : 204