राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

62व्या राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय अभ्यासक्रमाच्या प्राध्यापक आणि अभ्यासक्रम सदस्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली

Posted On: 15 SEP 2022 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2022

62 व्या राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय अभ्यासक्रमाच्या प्राध्यापक आणि अभ्यासक्रम सदस्यांनी आज (15 सप्टेंबर, 2022) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

या कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, सुरक्षा ही एक अशी संज्ञा आहे जी आपण आपल्या संभाषणात नेहमी वापरतो. पण याचे परिणाम दूरगामी आहेत. गेल्या काही दशकांमध्ये या संज्ञेची व्याख्या अधिक व्यापक झाली आहे. जी गोष्ट केवळ प्रादेशिक अखंडतेपुरती मर्यादित होती, ती आता राजकीय आणि आर्थिक परिक्षेत्रातही दिसू लागली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षणाच्या धोरणात्मक, आर्थिक, वैज्ञानिक, राजकीय आणि औद्योगिक पैलूंच्या दृष्टीने राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय अभ्यासक्रमाची आजच्या काळातील समर्पकता अधिक महत्वपूर्ण ठरते. हे लक्षात घेऊन या समस्या मुळापासून जाणून घेण्यासाठी एनडीसीचा अभ्यासक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे, याबद्दल राष्ट्रपतींनी संतोष व्यक्त केला.

62 व्या एनडीसीच्या अभ्यासक्रमात सशस्त्र दलातील 62, नागरी सेवेतील 20, मैत्रीपूर्ण परदेशातील 35 आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील 1 सदस्य सहभागी आहेत हे लक्षात घेऊन राष्ट्रपती म्हणाल्या की या अभ्यासक्रमाचे हे अतिशय वेगळे असे वैशिष्ट्य आहे की ज्यामुळे या अभ्यासक्रमाचे खूप कौतुक झाले आहे. या अभ्यासक्रमाच्या सदस्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना जाणून घेता येते त्यायोगे त्यांचे विचार आणि अभिव्यक्तीचे क्षितिज अधिक विस्तारते, असे त्या म्हणाल्या.

आपण एका गतिमान जगाचे भाग आहोत जिथे अगदी लहानश्या बदलाचे व्यापक परिणाम होतात. काही वेळा यात सुरक्षिततेच्या दृष्टीने होणारे बदल अंतर्भूत असतात. कोविड महामारी पसरण्याचा वेग आणि कोविडची लाट हे आज मानवतेला भेडसावणाऱ्या धोक्याचे फक्त एक उदाहरण आहे. यामुळे आपल्याला

मानवजातीच्या असुरक्षिततेची जाणीव होते. येणारा प्रत्येक धोका आपल्याला लढा देण्याची आवश्यकता आणि त्याचा प्रादुर्भाव पुन्हा होणार नाही याकरता बाळगायच्या सावधानतेबद्दल विचार करायला भाग पाडतो. आपण केवळ पारंपारिक धोक्यांनाच नव्हे तर निसर्गाच्या अनोख्या धोक्यांचाही सामना करण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे. हवामान बदल आणि शाश्वत विकास हे आजच्या घडीला अतिशय महत्व असलेले मुद्दे आहेत. सर्व देशांनी एकत्र येऊन त्यावर उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. या टप्प्यावर देशाच्या धोरणात्मक योजना देशांच्या परराष्ट्र धोरणांशी जुळणे महत्वाचे आहे. हा एक सर्वसमावेशक आणि बहुआयामी दृष्टीकोन आहे ज्यासाठी आपण स्वतःला सुसज्ज करणे आवश्यक आहे.

भारत एक राष्ट्र म्हणून आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या गेल्या आहेत. हीच दृष्टी भारताला विकास आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे नेत आहे. अगदी अलीकडेच भारताची स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका विक्रांत भारतीय नौदलात सामील झाली तेव्हा हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण होता, असे राष्ट्रपती म्हणाल्या. असे उपक्रम भारतीय नागरिकांच्या मनात आशा आणि प्रेरणा निर्माण करतात. प्रगतीच्या या वाटेवर आपण अखंडपणे वाटचाल करत राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

G.Chippalkatti /B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1859535) Visitor Counter : 214