वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या कृषी आणि अन्नप्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत, 30 टक्क्यांची वाढ होत ही निर्यात 9598 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली
Posted On:
12 SEP 2022 7:50PM by PIB Mumbai
वाणिज्यिक माहिती आणि सांख्यिकी महासंचालनालयाने जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्ष, 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जुलै या कालावधीत, देशातील कृषी आणि अन्नप्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 30 टक्क्यांची वाढ होऊन, ही निर्यात, 9598 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.
वर्ष 2022-23 साठी कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगांनी, 23.56 अब्ज डॉलर्सपर्यंतच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यातील, 9.59 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य केवळ या पहिल्या चार महिन्यांतच पूर्ण झाले आहे.
सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, निर्यातीचे 40 टक्के लक्ष्य गाठण्यात मदत झाली आहे.
वाणिज्यिक माहिती आणि सांख्यिकी महासंचालनालयाने जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या ह्याच कालावधीच्या तुलनेत, ताजी फळे आणि भाज्या यांच्या निर्यातीत चार टक्के वाढ झाली, तर प्रक्रियाकृत फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत 51 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. एप्रिल ते जुलै 2021 या काळात, ताजी फळे आणि भाज्या यांची निर्यात 498 डॉलर्स इतकी झाली होती, ती आता या वर्षात 517 डॉलर्सपर्यंत वाढली आहे.
वाणिज्यिक माहिती आणि सांख्यिकी महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील कृषी उत्पादनांची निर्यात, 2021-22 या आर्थिक वर्षांत 19.92 टक्यांनी वाढून 50.21 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती.
कृषी आणि प्रक्रियाकृत पदार्थांच्या निर्यातीत झालेली वाढ, कृषी आणि अन्न प्रक्रियाकृत उत्पादने निर्यात प्रोत्साहन परिषदेने राबवलेल्या विविध उपक्रमांचा परिपाक आहे. विविध देशांत बी-टू-बी प्रदर्शने आयोजित कारणे, उत्पादन-विशिष्ट नव्या बाजारपेठाचा शोध,भारतीय दूतावासांच्या मदतीने विपणन प्रोत्साहन मोहिमा आयोजित करणे अशा उपक्रमांचा यात उल्लेख करता येईल.
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858786)
Visitor Counter : 226