संरक्षण मंत्रालय

सुरक्षेसंदर्भातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी लॉजिस्टिक प्रणाली तयार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे: संरक्षण मंत्र्यांचे भारतीय सैन्याच्या पहिल्या लॉजिस्टिक चर्चासत्रात प्रतिपादन

Posted On: 12 SEP 2022 4:36PM by PIB Mumbai

 

भविष्यात सुरक्षेच्या क्षेत्रातील आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आणि देशाला अधिक उंचीवर नेण्यासाठी एक सामर्थ्यशाली, सुरक्षित, वेगवान आणि आत्मनिर्भरलॉजिस्टिक यंत्रणा तयार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,असे प्रतिपादन संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ते आज नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या सामंजस्य से शक्तीया संकल्पनेवर आधारीत  भारतीय सैन्याच्या पहिल्या लॉजिस्टिक चर्चासत्राला  संबोधित करत होते.

भविष्यात, युद्धक्षेत्र असो किंवा नागरी क्षेत्र, यासाठी लागणाऱ्या रसदीच्या पुरवठ्याचे महत्व  वाढणार आहे.अशा परिस्थितीत एकविसाव्या शतकाच्या गरजांनुसार रसद व्यवस्थेत सुधारणा करणे ही काळाची गरज आहे.आत्मनिर्भरता हा लॉजिस्टिक क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे.आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, आपल्याला आत्मनिर्भररसद पुरवठा प्रणालीची आवश्यकता आहे, असे राजनाथ सिंह पुढे म्हणाले. 2047 पर्यंतच्या  अमृत काळात ’  भारताला महासत्ता बनवण्यासाठी सरकारने तयार केलेली रूपरेषा त्यांनी सांगितली.

सशस्त्र दलांच्या परिचालन  सज्जतेसाठी एक मजबूत लॉजिस्टिक प्रणाली स्थापन करण्याचा पाया रचला  जात असून योग्य वस्तू, योग्य गुणवत्ता आणि प्रमाणासह, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी सैन्याला उपलब्ध असेल,हे सुनिश्चित केले जाईल.लष्करी रसद हा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे जो युद्धाची परिणामकारकता ठरवत असतो, असे त्यांनी सांगितले.

दृश्‍यमान सकारात्मक परिणामांची माहिती देताना  राजनाथ सिंह म्हणाले की, सरकारच्या प्रयत्नांमुळे, विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच आपत्ती निवारण, मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत, बिगर-लढाईच्या कारणांमुळे निष्कासन, युध्दपातळीवरचे  शोध आणि बचाव कार्य, अपघातग्रस्तांना बाहेर काढणे यासाठी प्रतिसाद देण्यासाठी, लागणारा वेळ आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. राष्ट्र उभारणीत हा एक महत्त्वाचा पैलू असून त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही पुढे ते म्हणाले.

लॉजिस्टिक व्यवस्थेला चालना देणे सुरू ठेवण्याच्या गरजेवर भर देत संरक्षण मंत्री म्हणाले की, सरकार या तीन सेवांच्या गरजेनुसार देशात समान लॉजिस्टिक नोड्स स्थापन करण्यावर भर देत आहे.या नोड्सद्वारे, एका सेवेची संसाधने  सहजपणे इतरांना  उपलब्ध होतील,असे त्यांनी यावेळी नमूद केले.

लॉजिस्टिक यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार राहण्यासाठी नागरी-लष्करी सेवांना एकत्र येण्याचे आवाहन संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केले.भविष्यातील युद्धांमध्ये लॉजिस्टिकसाठी केवळ तीन सेवांपुरतेच नव्हे, तर औद्योगिक सहाय्य, संशोधन आणि विकास, सामुग्री  सहाय्य, उद्योग आणि मनुष्यबळाच्या रूपात विविध संस्थांनी एकत्र येणे आवश्यक  आहे, यावर त्यांनी भर दिला.

भारताला संरक्षण रसद पुरवठ्याची  जागतिक महासत्ता  बनवण्यासाठी राष्ट्राच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्यावर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आपल्या प्रारंभिक भाषणात भर दिला.सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे केवळ देशांतर्गत गरजा भागतील इतकेच नाही, तर इतर मित्र देशांनाही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार आणि संरक्षण, रेल्वे, नागरी विमान वाहतूक, वाणिज्य आणि उद्योग, निमलष्करी दलाचे इतर अधिकारी आणि शैक्षणिक आणि उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

***

S.Kane/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858723) Visitor Counter : 173


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil