वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

2047 पर्यंत भारत जागतिक विकासाला चालना देणारे शक्तीस्थान बनेल: पीयूष गोयल


समविचारी देशांसोबत मुक्त आणि न्याय्य व्यापारासाठी इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क (IPEF) हा एक महत्त्वाचा टप्पा: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे मजबूत, निर्णायक्षम आणि लोकांना केंद्रस्थानी मानणारे सरकार आहे: गोयल

भारतातील तरुणाई आणि विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या गुणवंतांमुळे, विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध : गोयल

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे, गोयल यांनी सर्व संबंधितांना केले आवाहन

Posted On: 11 SEP 2022 2:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 सप्‍टेंबर 2022

 

भारत 2047 पर्यंत जागतिक विकासाला चालना देणारे पॉवरहाऊस (शक्ती स्थान) बनण्याच्या मार्गावर आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियातल्या व्यावसायिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

आपल्या भाषणात, गोयल म्हणाले की इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क (IPEF) अर्थात भारत प्रशांत क्षेत्र आर्थिक आराखडा म्हणजे,  नियमावर चालणारी आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था आणि पारदर्शक आर्थिक व्यवस्था राखणे हे समान उद्दिष्ट बाळगणाऱ्या समविचारी देशांसोबत मुक्त आणि निष्पक्ष व्यापारासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा, मैलाचा दगड आहे, इंडो-पॅसिफिकमधील राजकीयदृष्ट्या स्थिर आणि खुल्या अर्थव्यवस्था, परस्परांमध्ये आर्थिक क्रियाकलापांचा, आर्थिक उलाढालींचा विस्तार करण्यासाठी एकत्र येत आहेत, असेही ते म्हणाले.

मेळाव्याला संबोधित करताना गोयल यांनी सांगितले की, भारतात होत असलेल्या प्रगतिकारक सुधारणा आणि विकास कामांमुळे, देशाने जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये पाचवा  क्रमांक पटकावला आहे. गेल्या काही वर्षांत झालेले मूलभूत बदल आणि संरचनात्मक सुधारणांच्या परिणामांचे मूल्यमापन करत गोयल यांनी नमूद केले की, 2047 या वर्षात भारताची अर्थव्यवस्था 35 ते 45 ट्रिलियन म्हणजेच 35 ते 45 लाख कोटी डॉलर्सची असेल आणि ती भारताला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत बसवेल, असे CII (भारतीय औद्योगिक महासंघ)चे अनुमान आहे.

भारत आज संधींचे आगार आहे आणि अमेरिकेतल्या व्यापारी समुदायासाठी एक संभाव्य बाजारपेठ आहे, असे ठासून सांगत त्यांनी नमूद केले की, भारताला लोकसंख्याशास्त्राच्या दृष्टीने लाभलेल्या मनुष्यबळाचा  लाभ होत आहे आणि भारतातली महत्त्वाकांक्षी तरुणाई विकासाच्या वाढीसाठी मोठी संधी प्रदान करते.  गोयल यांनी असेही सांगितले  की, भारत देखील स्वच्छ , प्रदूषणरहित ऊर्जा प्राप्तीच्या दिशेने  वेगाने वाटचाल करत आहे आणि 2030 वर्षा पर्यंत 500 गिगावॅट हरित ऊर्जा निर्मितीची क्षमता गाठण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

मंत्री म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात राजकीय स्थैर्य आणले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक निर्णयक्षम, समृद्ध भारताच्या हितासाठी कठोर निर्णय घेण्याची इच्छाशक्ती असणारे, वंचित घटकांसाठी लोककल्याण आणि सामाजिक सुधारणा यांचे संतुलन राखणारे सरकार आहे. सोबतच हे सरकार 1 अब्ज 30 कोटी नागरिकांना उत्तम नागरिक आणि देशाची आर्थिक वाढ आणि विकासात योगदान देणारे नागरिक म्हणून घडवते.  गेल्या काही वर्षांत सरकारने केलेल्या कल्याणकारी उपाययोजनांबद्दल बोलताना गोयल म्हणाले की, सरकार लोकांच्या, अन्न सुरक्षा(उपलब्धता), निवारा आणि शौचालयांसारख्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सक्षम आहे.

“जगातल्या सर्व लोकशाहींची जननी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्याकडे क्रियाशील न्यायव्यवस्था आणि कायद्याचे राज्य आहे, मजबूत माध्यमे आणि पारदर्शक सरकारी व्यवस्था आहे, याचा अभिमान वाटतो”, असेही गोयल यांनी सांगितले.

आज भारत हा जगाचा विश्वासार्ह सहकारी म्हणून उदयास आला आहे असे नमूद करून  गोयल म्हणाले की, माहिती-तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, आदरातिथ्य, रत्ने, दागिनेनिर्मिती या क्षेत्रांमध्ये आमच्याकडे असलेलं कौशल्य आणि गुणवत्ता पाहता भारत आता मौल्यवान वस्तू आणि सेवापुरवठा यांचा उच्च दर्जाचा उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे आणि भारताशी संबंध जोडू पाहणाऱ्या या क्षेत्रातल्या प्रत्येक गुंतवणूकदाराला संधी उपलब्ध करुन देईल.

गोयल पुढे  म्हणाले की, 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने आपण प्रवास सुरू करत असताना, पुढील 25 वर्षांत भारताचे स्थान नेमके काय असेल याचा विचार करणेही आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच प्रत्येक देशवासीयांच्या मनात कर्तव्याची भावना जागृत करुन कर्तव्यावर भर दिला आहे, याची आठवण करून देत  गोयल यांनी सर्व संबंधितांना, भारतीय आणि जगभरात विखुरलेला भारतीय समाजाला, 2047 पर्यंत समृद्ध आणि विकसित भारत घडवण्याच्या आपल्या संकल्पपूर्तीसाठी,   एकत्र मिळून काम करण्याचे आणि सामूहिक प्रयत्नांचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले.

प्रत्येक प्रसंगी ODOP (म्हणजेच एक जिल्हा एक उत्पादन) उत्पादने वापरण्याचे, थोडक्यात स्थानिक पातळीवर स्थानिक उत्पादनच वापरण्याचे आवाहन करून मंत्री महोदयांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. ते म्हणाले की,  जगभरातील भारतीयांनी 'मेड इन इंडिया' म्हणजेच स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य दिल्यास, कोट्यवधी भारतीय कारागिरांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने  आधार मिळेल.

 

* * *

S.Pophale/A.Save/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858482) Visitor Counter : 151