संरक्षण मंत्रालय
YD 12653 (तारागिरी)च्या उद्याच्या जलावतरणाबाबत संक्षिप्त माहिती
Posted On:
10 SEP 2022 6:20PM by PIB Mumbai
मुंबईत माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे 11 सप्टेंबर 2022 रोजी प्रकल्प 17 ए मधील युद्धनौका - तारागिरीचे जलावतरण करण्यात येणार आहे. पश्चिमी नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग -इन -चीफ व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असतील.
गढवाल येथील हिमालयातील पर्वतरांगेच्या नावावरून ‘तारागिरी’ हे नाव घेतले असून प्रोजेक्ट 17A श्रेणीतील ही पाचवी युद्धनौका आहे. ही जहाजे P17 युद्धनौका (शिवालिक श्रेणी) ची सुधारित आवृत्ती असून सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे. 'तारागिरी' ही पूर्वीच्या लिअँडर श्रेणीतील एएसडब्ल्यू युद्धनौका 'तारागिरी'चा पुनरावतार आहे, जिने 16 मे 1980 ते 27 जून 2013 या तीन दशकांहून अधिक कालावधीत देशासाठी केलेल्या आपल्या गौरवशाली सेवेत असंख्य आव्हानात्मक मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला. P17A कार्यक्रमांतर्गत माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे 4 आणि जीआरएसई येथे 3 अशा सात जहाजांची बांधणी सुरू आहे. 2019 आणि 2022 दरम्यान आतापर्यंत P17A श्रेणीतील चार युद्धनौका (एमडीएल आणि जीआरएसई येथे प्रत्येकी दोन) नौदलात दाखल करण्यात आल्या आहेत.
P17A जहाजांचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या युद्धनौका डिझाइन ब्युरो या आरेखन संस्थेने देशातच केले आहे. देशातील सर्व युद्धनौका डिझाइन करणारी ही अग्रणी संस्था आहे. ‘आत्मनिर्भरतेच्या’ दिशेने सुरु असलेल्या अथक प्रयत्नांच्या अनुषंगाने प्रोजेक्ट 17A जहाजांच्या उपकरणे आणि प्रणालीसाठी 75% ऑर्डर एमएसएमई सह देशातील कंपन्यांना दिल्या जात आहेत.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858320)
Visitor Counter : 244