रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
आगामी पाच वर्षांत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी वाहतूक क्षेत्राचा कायापालट करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम करायला हवे -नितीन गडकरी
प्रविष्टि तिथि:
09 SEP 2022 7:10PM by PIB Mumbai
आगामी पाच वर्षांत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी वाहतूक क्षेत्राचा कायापालट करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम करायला हवे असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते आज बंगळुरु येथे परिवहन विकास परिषदेच्या 41व्या बैठकीला संबोधित करत होते. ते म्हणाले की,भारत जगातील एक अव्वल वाहन निर्मिती केंद्र बनावे यासाठी पुढील 5 वर्षांत वाहन निर्मिती उद्योग 7.5 लाख कोटींवरून 15 लाख कोटींपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

भारतीय रस्ते क्षेत्रासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा अवलंब आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी डिजिटल संपर्करहित सेवांवर भर दिला तरच हे शक्य आहे असे ते म्हणाले. प्रदूषण आणि खर्च कमी करण्यासाठी सर्व डिझेल बसेसच्या जागी इलेक्ट्रिक बसचा वापर करायला हवा असे गडकरी म्हणाले. सर्व संबंधितांनी पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करायला हवा असे ते म्हणाले. रस्ते अपघातांच्या बाबतीत गंभीर आणि संवेदनशील दृष्टीकोन आवश्यक असून लोकांचे बहुमोल जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
41 व्या परिवहन विकास परिषदेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर, गोवा, कर्नाटक, दिल्ली आणि तामिळनाडू मधील परिवहन मंत्री सहभागी झाले होते. रस्ते बांधणी, सार्वजनिक वाहतूक, तंत्रज्ञानाचा अवलंब, रस्ते सुरक्षा आणि रस्ते वाहतूक विकासाबाबत मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 आणल्याबद्दल आणि त्याची जलद अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी गडकरींची प्रशंसा केली. रस्ते वाहतूक, रस्ते सुरक्षा आणि सहाय्यक वाहतूक पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दलही त्यांनी माहिती दिली. इलेक्ट्रिक बसेसना मान्यता आणि खरेदी, चार्जिंग स्टेशन्सची उभारणी , वाहनचालक प्रशिक्षण केंद्रे , वाहन फिटनेस सेंटर्स आदी आव्हानेही त्यांनी अधोरेखित केली.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (डॉ) व्ही के सिंग, सचिव गिरीधर अरामाने आणि सहसचिव महमूद अहमद यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1858128)
आगंतुक पटल : 185