राष्ट्रपती कार्यालय

पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ

Posted On: 09 SEP 2022 5:01PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज (सप्टेंबर 9, 2022) पंतप्रधान क्षयरोग  मुक्त भारत अभियानाचा दुरदृष्य प्रणालीद्वारे  प्रारंभ केला. आपल्या देशात इतर सर्व संसर्गजन्य रोगांपैकी  क्षयरोगामुळे  सर्वाधिक मृत्यू होतात.त्यामुळे  पंतप्रधान क्षयरोग -मुक्त भारत अभियान' या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि या मोहिमेला जनचळवळ  बनवणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, असे राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना सांगितले. जगाच्या लोकसंख्येमध्ये भारताच्या लोकसंख्येचा हिस्सा 20 टक्क्यांहून काहीसा कमी आहे,मात्र जगातील एकूण क्षयरोग  रुग्णांपैकी 25 टक्क्यांहून अधिक रुग्ण भारतात आहेत.ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. क्षयरोगाने ग्रस्त बहुतेक लोक समाजातील गरीब वर्गातले असतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भारताला जगातील अग्रणी  देश  बनवणे हा  नव भारताचा विचार आणि कार्यपद्धती आहे. कोविड-19 महामारीचा सामना करताना भारताने जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे.आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचे  नव भारताचे धोरण, क्षयरोग  निर्मूलनाच्या क्षेत्रातही दिसून येत आहे. संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास  उद्दिष्टांनुसार  सर्व देशांनी  2030 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.भारत सरकारने मात्र 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

या अभियानाला  जनचळवळ  बनवण्यासाठी लोकांमध्ये क्षयरोग प्रतिबंधासाठी  जनजागृती करावी लागेल.या आजारापासून बचाव करणे शक्य असल्यासंदर्भात त्यांना माहिती द्यावी लागेल. या आजारावर प्रभावी  उपचार असून ते सुलभरित्या उपलब्ध  आहेत आणि सरकार या आजाराच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देते, असे राष्ट्रपतींनी सांगितले.  काही रूग्ण किंवा समुदायांमध्ये, या रोगाशी निगडीत एक न्यूनगंडाची भावना आहे आणि ते या आजाराकडे  कलंक म्हणून पाहतात.हा भ्रमही दूर करण्याची गरज आहे. अनेकदा क्षयरोगाचे जंतू प्रत्येकाच्या शरीरात असतात हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.जेव्हा एखाद्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती  काही कारणास्तव  कमी होते, तेव्हा ती  व्यक्ती या आजाराच्या विळख्यात सापडते. उपचाराने हा आजार  नक्कीच बरा होऊ शकतो. या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तेव्हाच  क्षयरोगग्रस्त लोकांना उपचार सुविधांचा लाभ घेता येईल, असे त्या म्हणाल्या.

क्षयरोगावर उपचार घेत असलेल्यांना आधार देण्यासाठी  सर्व समुदाय हितसंबंधितांना  एकत्र आणणे आणि क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने देशाच्या प्रगतीला गती देण्याच्या संकल्पनेतून  पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियान सुरु करण्यात आले आहे.

आभासी माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती प्रवीण पवार, राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे  नायब राज्यपाल, राज्य आणि जिल्हा आरोग्य प्रशासनातील  प्रतिनिधी आणि अन्य संबंधित उपस्थित होते.

राष्ट्रपतींचे हिंदीतील  भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858064) Visitor Counter : 350