संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी टोकियो येथील भारत-जपान 2+2 मंत्रीस्तरीय चर्चेनंतर प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन
Posted On:
08 SEP 2022 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2022
“मंत्री हयाशी, मंत्री हमदा, डॉ जयशंकर, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, स्त्री-पुरुषहो,
सर्वप्रथम, मी आपले यजमान मंत्री गण, त्याचं शिष्टमंडळ, आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांप्रती, त्यांनी केलेला उत्कृष्ट संवाद आणि प्रेमळ आदरातिथ्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या द्विपक्षीय संबंधांबाबतच्या त्यांच्या वचनबद्धतेचं मी मनापासून कौतुक करतो.
परस्पर हिताच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांचा विस्तृत आयाम यावर आज आपण चर्चा केली. आशिया खंडातल्या दोन समृद्ध लोकशाही म्हणून, आपण विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आचरणात आणत आहोत. यंदाचं वर्ष भारत आणि जपान दोघांसाठी महत्वाचं आहे, कारण आपण आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची 70 वर्ष साजरी करत आहोत. प्रशांत महासागर क्षेत्रातली शांतता आणि समृद्धी साठी हे नातं महत्वाचं आहे.
आजच्या चर्चेत आपण दोन्ही देशांमधलं लष्करी सहकार्य आणि दोन्ही बाजूंचं आदान-प्रदान याच्या प्रगतीची नोंद घेतली. आपल्या द्विपक्षीय सरावाची व्याप्ती आणि जटिलता आणखी वाढवण्याची सामायिक इच्छा व्यक्त केली. आपण तिन्ही सेवा आणि तटरक्षक दल यांच्यातला कर्मचारी संवाद आणि उच्च स्तरीय संवाद प्रस्थापित केला आहे. मला याचा आनंद आहे की जपानी स्वयं-सुरक्षा दलांचे संयुक्त कर्मचारी आणि भारताचे एकात्मिक सुरक्षा कर्मचारी यांच्यातल्या कर्मचारी पातळीवरच्या चर्चेला आपली सहमती आहे. मिलान (MILAN) या बहुपक्षीय सरावामधील जपानचं प्रथमच सहभागी होणं आणि यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात पुरवठा आणि सेवा कराराच्या परस्पर तरतुदीची झालेली अंमलबजावणी, हे आपल्या संरक्षण दलांमधील सहकार्याच्या प्रगतीचे महत्वाचे टप्पे आहेत.
भारत आणि जपान दरम्यानचं संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढवणं हे आपल्या प्रमुख प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे. आजच्या आपल्या बैठकीत, मला उदयोन्मुख आणि महत्वपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी एकत्र येण्याचा प्रस्ताव मांडण्याची संधी मिळाली. भारतीय संरक्षण परिप्रेक्षात गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी जपानी संरक्षण कंपन्यांना मी निमंत्रित देखील केलं आहे.
सागरी क्षेत्र जागरुकता यासह सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या मार्गांवर आपण विस्तृत चर्चा केली. दोन्ही देशाचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवर आधारित मुक्त, खुल्या, नियामाधारित आणि सर्वसमावेशक प्रशांत महासागर क्षेत्रासाठी भारत-जपान दरम्यानचे मजबूत संबंध अत्यंत महत्वाचे आहेत, यावर दोन्ही बाजूंनी एकमत झालं. भारताचा प्रशांत महासागर उपक्रम (आयपीओआय) आणि जपानचा मुक्त आणि खुला प्रशांत महासागर (एफओआयपी) यामध्ये अनेक गोष्टींचं साधर्म्य आहे. ‘प्रदेशातल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास, अर्थात सागर (SAGAR) या आपल्या सर्वसमावेशक दृष्टीकोनाच्या अनुषंगाने भारताने प्रादेशिक भागीदारांबरोबर सागरी सहकार्य देखील विकसित केलं आहे.
भारताचे आसियान (ASEAN) बरोबरचे संबंध आपल्या परराष्ट्र धोरणाची आधारशीला म्हणून उदयाला आली आहे. एडीडीएम (ADMM) प्लस द्वारे, सागरी सुरक्षा, एचएडीआर, शांतता प्रस्थापित करण्यासाठीची कारवाई यासह विविध क्षेत्रांमधलं सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत आणि जपान दोन्ही देश आसियान बरोबर आणि अन्य प्लस देशांबरोबर काम करत आहेत.
आज आपल्याला प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मतं मांडण्याची आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने विवादांचं शांततापूर्ण रीतीनं निराकरण करण्याच्या गरजेवर सहमती दर्शवली.
आजच्या अत्यंत फलदायी चर्चेबद्दल आणि भारत-जपान भागीदारी पुढे नेण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केल्याबद्दल, मी मंत्री हयाशी आणि मंत्री हमादा यांचे, पुन्हा एकदा आभार मानतो.
धन्यवाद.”
N.Chitale /R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1857839)
Visitor Counter : 219