संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्र्यांची उलानबटोर इथे बैठक; संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठीच्या उपाययोजनावर केली चर्चा
राजनाथ सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ येथे भारताच्या सहाय्याने बांधलेल्या सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
भारताच्या साहाय्याने बांधण्यात येणाऱ्या भारत-मंगोलिया मैत्री शाळेची केली पायाभरणी
प्रविष्टि तिथि:
06 SEP 2022 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2022
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांच्या मंगोलिया दौऱ्याच्या पहिल्या दिवशी 06 सप्टेंबर 2022 रोजी उलानबटोर येथे मंगोलियाचे संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल सैखनबयर गुर्सेद यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी मंगोलियाचे अध्यक्ष आणि मंगोलियाची संसद 'स्टेट ग्रेट खुरलच्या' अध्यक्षांचीही भेट घेतली. राजनाथ सिंग यांनी भारताच्या सहाय्याने बांधलेल्या सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले आणि भारताच्या साहाय्याने बांधण्यात येणाऱ्या भारत-मंगोलिया मैत्री शाळेची पायाभरणी केली.
द्विपक्षीय चर्चा
मंगोलियाला भेट देणारे भारताचे पहिलेच संरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंग यांनी मंगोलिया इथे 05 सप्टेंबर 2022 रोजी पोहोचल्यानंतर आपल्या व्यस्त दिवसाची सुरवात उलानबटोर इथे मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेली मानवंदना स्वीकारली. त्यांनतर राजनाथ सिंग आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये प्रतिनिधिमंडळ स्तरावर बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी परस्परांवरील विश्वास आणि समजूतदारपणा, लोकशाही आणि कायदा यांच्या सामायिक मूल्यांवर आधारित धोरणात्मक भागीदारी पूर्णपणे अंमलात आणण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला अधोरेखित केले. याशिवाय वर्षअखेरीस भारतात आयोजित केलेल्या भारत-मंगोलिया संयुक्त कार्यकारी गटाचे पुनरुज्जीवन करण्याच्या संकल्पाचा देखील दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.
भेटीगाठी
राजनाथ सिंग यांनी मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष आणि सशस्त्र दलांचे प्रमुख उखनागीन खुरेलसुख यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील सौहार्द्र आणि त्यांच्या यापूर्वीच्या 2018 मधील भेटीचे स्मरण केले. 2018 मध्ये दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे भारताच्या सहाय्याने सुरू असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी केली होती. राजनाथ सिंग यांनी मंगोलियाची संसद 'स्टेट ग्रेट खुरलचे' अध्यक्ष जी झंडनशाटर यांचीही भेट घेतली.
सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्र
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उलानबटोर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात भारत सरकारच्या सहाय्याने बांधण्यात आलेल्या सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्रातील सुविधांविषयी संरक्षणमंत्र्यांना तेथील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यांनी केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या मंगोलियन सशस्त्र दलाच्या जवानांशीही संवाद साधला.
भारत - मंगोलिया मैत्री शाळा
राजनाथ सिंग यांनी मंगोलियाच्या शिक्षण आणि विज्ञान मंत्र्यांसमवेत भारत सरकारच्या सहाय्याने स्थापन होत असलेल्या भारत-मंगोलिया मैत्री शाळेची पायाभरणी केली.
भारताने 1955 मध्ये मंगोलियाबरोबर राजनैतिक संबंध स्थापन केले. मंगोलियाने भारताला धोरणात्मक भागीदार आणि “आध्यात्मिक शेजारी” म्हणून घोषित केले आहे. 2015 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान दोन आशियाई लोकशाहींमधील “सामरिक भागीदारी” घोषित करण्यात आली होती. संरक्षण हा मंगोलियासोबतच्या द्विपक्षीय गुंतवणुकीचा महत्त्वाचा घटक आहे.
* * *
S.Kakade/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1857210)
आगंतुक पटल : 589