संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग मंगोलियाला भेट देणार
भारतीय संरक्षण मंत्र्याची पूर्व आशियातील देशाला सामरिक दृष्टीकोनातून पहिलीच भेट
प्रविष्टि तिथि:
04 SEP 2022 3:45PM by PIB Mumbai
पूर्व आशियाई देशांशी सामरिक भागीदारीला चालना देत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे उद्यापासून ते 7 सप्टेंबरपर्यंत मंगोलियाला अधिकृत भेट देणार आहेत. राजनाथ सिंग यांचा मंगोलिया दौरा म्हणजे भारतीय संरक्षण मंत्र्याची त्या देशाला पहिलीच भेट असून यामुळे उभय देशांमध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आणि सामरिक भागीदारी आणखी मजबूत होणार आहे.
या भेटीदरम्यान, राजनाथ सिंग मंगोलियाचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल सैखनबायर यांच्यासमवेत द्विपक्षीय बोलणी करतील. ते मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष यू खुरेलसुख आणि ग्रेट खुराल या मंगोलियाच्या एकसदनी संसदेचे अध्यक्ष जी झंदनशतार यांची राजनाथ सिंग भेट घेतील. संपूर्ण प्रदेशात शांतता आणि भरभराट निर्माण करण्यामध्ये दोन्ही लोकशाही देशांना सामायिक स्वारस्य आहे.
भारत आणि मंगोलिया या दोन्ही देशांमध्ये सामरिक भागीदारी असून संरक्षण हा या भागीदारीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. मंगोलियाबरोबर वेळोवेळी करण्यात आलेल्या द्विपक्षीय संरक्षण करारांमध्ये दोन्ही देशांमध्ये व्यापक संपर्क असून संयुक्त कार्यकारी गटाची बैठक, लष्करी आदानप्रदान, उच्चस्तरीय नेत्यांच्या भेटी, क्षमता उभारणी आणि प्रशिक्षण कार्यक्रम आणि द्विपक्षीय लष्करी सराव यांचा त्यात समावेश आहे.
द्विपक्षीय बोलण्यांच्या दरम्यान, दोन्ही संरक्षण मंत्री भारत आणि मंगोलिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा आढावा घेतील आणि द्विपक्षीय करारांबाबत नवीन उपक्रमांची पडताळणी करतील. दोन्ही नेते सामायिक हितांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही आपल्या दृष्टीकोनांची देवाणघेवाण करतील.
***
G.Chippalkatti/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1856651)
आगंतुक पटल : 285