राष्ट्रपती कार्यालय
आयआयटी हा देशाचा सन्मानबिंदू : राष्ट्रपती मुर्मू
Posted On:
03 SEP 2022 6:41PM by PIB Mumbai
भारतीय तंत्रज्ञान संस्था हा देशाचा सन्मानबिंदू असल्याचे राष्ट्रपत द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे आज (3 सप्टेंबर 2022) आयआयटी दिल्लीच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
आयआयटीने शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची क्षमता जगासमोर सिद्ध केली आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. एकाप्रकारे, आयआयटीची कहाणी ही स्वतंत्र भारताची कहाणी आहे. जागतिक स्तरावर आज भारताची स्थिती सुधारण्यात आयआयटीचे मोठे योगदान आहे. आयआयटीच्या प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांनी जगाला आपल्या बुद्धिमत्तेचे दर्शन घडवले आहे. आयआयटी दिल्ली आणि इतर आयआयटीमध्ये शिक्षण घेतले त्यापैकी काही आता जगभरातील डिजिटल क्रांतीमध्ये आघाडीवर आहेत. शिवाय, आयआयटीची प्रभावकक्षा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याही पलीकडे गेली आहे. शिक्षण, उद्योग, उद्योजकता, नागरी समाज, चळवळी, पत्रकारिता, साहित्य आणि राजकारण – प्रत्येक क्षेत्रात आयआयटीयन्स नेतृत्व करत आहेत.
सुरुवातीच्या आयआयटीपैकी प्रमुख असलेले दिल्ली आयआयटी, नव्या आयआयटी रोपार आणि आयआयटी जम्मू यांचे मार्गदर्शक आहे. अशाप्रकारे, आयआयटी दिल्लीने जगभरातील सर्वोत्कृष्टतेचे केंद्र म्हणून आयआयटीची प्रतिमा उभी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे त्या म्हणाल्या.
दिल्ली आयआयटीच्या सामाजिक जबाबदारीचे ताजे उदाहरण महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसून आले असे त्या म्हणाल्या. विषाणूला रोखण्याचे आव्हान पेलत, आयआयटी दिल्लीने महत्त्वाचे संशोधन आणि विकास प्रकल्प सुरू केले. जलद अँटीजेन चाचणी किट, पीपीई, प्रतिजैविक फॅब्रिक्स, उच्च कार्यक्षमता फेस मास्क आणि कमी किमतीचे व्हेंटिलेटर, यासह इतर साहित्य उपकरणांची संरचना केली, ते विकसित केले असे त्यांनी सांगितले.
आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू, तेव्हा 2047 सालापर्यंत, चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे आपल्या सभोवतालचे जग आमूलाग्र बदललेले असेल. ज्याप्रमाणे 25 वर्षांपूर्वी आपण समकालीन जगाची कल्पना करण्याच्या स्थितीत नव्हतो, त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन जीवनात कसे बदल घडवून आणणार आहेत याची कल्पना आज आपण करू शकत नाही. आपल्या मोठ्या लोकसंख्येमुळे, अडथळे ही सामान्य बाब असेल अशा भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी दूरदृष्टी आणि धोरणे असणे आवश्यक आहे. त्यावेळी नोकरीचे स्वरूप पूर्णपणे बदललेले असेल असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -
***
S.Kane/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1856548)
Visitor Counter : 241