वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
हिंद-प्रशांत क्षेत्र वित्तीय आराखडा (IPEF) च्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे होणाऱ्या पहिल्याच मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, येत्या 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान सॅन-फ्रान्सिस्को आणि लॉस एंजेलिस ला जाणार
Posted On:
02 SEP 2022 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, पीयूष गोयल येत्या 5 ते 10 सप्टेंबर या काळात, अमेरिकेत सॅन-फ्रान्सिस्को आणि लॉस एंजेलिसला जाणार आहेत. भारत- अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचाची परिषद आणि हिंद-प्रशांत वित्तीय आराखडा( इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क) च्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते सहभागी होतील. तसेच, अमेरिकेतील नामवंत उद्योजक, अमेरिकन अधिकारी आणि उद्योग प्रतिनिधींशी देखील ते चर्चा करतील. दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच, व्यापारविषयक वित्तीय संबंध मजबूत करण्यासाठी देखील ते प्रयत्न करतील.
त्याशिवाय, अमेरिकेचे वाणिज्य (USTR) मंत्री आणि आयपीईएफ मध्ये भागीदार असलेल्या इतर देशाच्या मंत्र्यांशीही त्यांच्या द्विपक्षीय बैठका होतील.
या दौऱ्यादरम्यान, गोयल, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी, भारतीय समुदायाचे नागरिक, स्टार्टअप उद्योजक यांच्यासह स्टार्ट अप गुंतवणूक भांडवलदारांशी आणि या क्षेत्रातील अभ्यासकांशी चर्चा करतील . भारत आणि अमेरिकेतील उद्योग समुदायात व्यापार आणि गुंतवणुकीचे बंध अधिक दृढ होण्यासाठी ते भेटीद्वारे प्रयत्न करतील. त्यांच्या ह्या भेटीत, भारताला गुंतवणुकीचे आकर्षक केंद्र म्हणून सादर करण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी, केंद्र सरकारने भारतात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी राबवलेल्या गतिशक्ती, स्टार्ट अप इंडिया, गुंतवणूक कॉरिडॉर्स यांसारख्या अनेक उपक्रमांची, माहिती देण्यात येईल.
दोन्ही देशांमधील औद्योगिक सहकार्य अधिक दृढ व्हावे आणि भागीदारीची व्याप्ती वाढावी, प्राधान्यक्षेत्रात व्यापार आणि गुंतवणूक वाढावी, या हेतूने, गोयल विविध घटकांशी चर्चा करतील. स्टार्ट अप व्यवस्थेच्या लोकांसोबत आणि भारतीय समुदायासोबत होणाऱ्या चर्चेतून, त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी, व्यापक प्रयत्नांवर यावेळी भर दिला जाईल. तसेच, भारतीय, सनदी लेखापाल संस्थेच्या अमेरिकेतील कार्यालयाचे उद्घाटनही गोयल यांच्या हस्ते होईल.
त्याशिवाय, जागतिक दृष्ट्या, नावाजलेल्या तंत्रज्ञानविषयातील तज्ञ, स्वयंउद्योजक आणि शिक्षण क्षेत्रातील धुरीण यांच्याशी, विशेषतः सिलिकॉन व्हॅली तील लोकांशी ते चर्चा करतील. भारतात गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या किंवा भारतात इलेक्ट्रॉनिक्स (सेमी कंडक्टर) तंत्रज्ञान, फिनटेक अशा क्षेत्रात आपल्या उद्योगांची व्याप्ती वाढवू इच्छिणाऱ्या लोकांशी चर्चा करतील.
त्याशिवाय सॅन फ्रान्सिस्को इथल्या स्टार्ट अप समुदायाशी देखील ते चर्चा करतील. ज्यातून भारतीय स्टार्ट अप्स व्यवस्थेसोबत भागीदारीच्या संधीना किती वाव आहे, याची चाचपणी केली जाईल. त्याशिवाय, भारतीय उद्योगांसाठी जागतिक भांडवल उभारणी, जागतिक दर्जाच्या अनुभवी उद्योजकांकडून, भारतीय स्वयंउद्योजकांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रयत्न केले जातील.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1856355)
Visitor Counter : 148