वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी)च्या प्रगतीचा घेण्यात आला आढावा
Posted On:
30 AUG 2022 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) च्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
एप्रिलमध्ये 5 शहरांमध्ये अल्फा सुरू झाल्यापासून, ओएनडीसी त्यांच्याशी निगडित ग्राहकांपर्यंत पूर्णतः सेवा पोहोचतेय ना याची खातरजमा करण्यासाठी चाचणी करत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. येत्या आठवड्यात नेटवर्क सहभागींची संख्या लक्षणीयरीत्या 30 पेक्षा जास्त होईल अशी ओएनडीसी ला अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, मर्यादित भागात सार्वजनिक वापरकर्त्यांसह नेटवर्कची बीटा-चाचणी सुरू करण्याची योजना ओएनडीसी आखत आहे.
गोयल म्हणाले की नेटवर्क विकासाचे विविध उपक्रम सुरू ठेवताना, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ओएनडीसी चा मूळ उद्देश लहान, डिजिटल नसणाऱ्या व्यापार्यांना मदत करणे हा आहे, त्यांना डिजीटल होण्यासाठी आणि ई-कॉमर्स परिसंस्थेद्वारे देण्यात येणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी मदत केली पाहिजे.
ते म्हणाले की ग्राहक केंद्रित असल्यामुळे विद्यमान ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहेत. उत्पादनांबद्दल दिलेली आश्वासने, मागणी वेळेत पूर्ण करणे, कोणतेही प्रश्न न विचारलेले परतावा धोरणे आणि ग्राहकांसाठी अनुकूल परतावा आणि रद्द करण्याची प्रक्रिया याआधारे त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दृढ विश्वास निर्माण केला आहे. ओएनडीसीची चाचणी या निकषांवर केली जाईल. ओएनडीसी ने ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण सुनिश्चित करण्यासाठी आणि परतावा आणि रद्द करण्याच्या प्रक्रियेकरिता पारदर्शक धोरणे लागू करण्यासाठी मजबूत यंत्रणेद्वारे ग्राहक विश्वास निर्माण केला पाहिजे, असेही ते म्हणाले. ही धोरणे नेटवर्क स्तरावर लागू केली जाणार आहेत.
मंत्री गोयल यांनी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाला (DPIIT) ओएनडीसी च्या उपयुक्ततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने कार्यक्रम तयार करण्यासाठी सर्व राज्य सरकारांसोबत काम करण्याचे निर्देश दिले जेणेकरून देशातील छोटे व्यापारी, कारागीर, हस्तकलाकार, शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक या खुल्या नेटवर्कचा पुरेपूर लाभ घेण्यास सक्षम होतील.
ओएनडीसीने प्रत्यक्ष नेटवर्कची अंमलबजावणी करण्यासाठी व्यापारी आणि उद्योग संघटनांच्या सक्रिय सहकार्याने काम केले पाहिजे अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली. या संघटनांच्या सहकार्याने जलद अंमलबजावणी साध्य करता येईल.
देशभरातील अधिक उद्योजकांना ई-कॉमर्स अॅप्स विकसित करण्यात प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी तसेच त्यांच्या स्थानिक व्यापारी, कारागीर, हस्तकलाकार, शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक इत्यादींना मदत करण्यासाठी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ने स्टार्टअप परिसंस्थेसोबत काम केले पाहिजे. नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी काम करणाऱ्या सर्व सरकार समर्थित उद्योग आणि इतर संस्थांनी, यंत्रणांनी याचा फायदा घेतला पाहिजे.
या बैठकीला डीपीआयआयटीचे सचिव अनुराग जैन, डीपीआयआयटीचे अतिरिक्त सचिव अनिल अग्रवाल, क्यूसीआयचे अध्यक्ष आदिल जैनुलभाई, ओएनडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टी कोशी आणि माय गव्हचे संस्थापक अरविंद गुप्ता उपस्थित होते.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1855598)
Visitor Counter : 177