संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी टांझानियाच्या संरक्षणमंत्री डॉ स्टरगोमेना लॉरेन्स टॅक्स यांच्याशी  नवी दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा केली


संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आगामी पाच वर्षांसाठीचा पथदर्शक आराखडा तयार करण्यासाठी कृतीदल स्थापन करण्यावर सहमती

संरक्षणमंत्र्यांनी टांझानियाच्या संरक्षणमंत्र्यांना येत्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या डेफएक्सपो 2022 साठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले.

Posted On: 26 AUG 2022 8:24PM by PIB Mumbai

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी टांझानियाच्या संरक्षणमंत्री  डॉ स्टरगोमेना लॉरेन्स टॅक्स यांच्याशी  नवी दिल्ली येथे आज द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत, द्विपक्षीय, प्रादेशिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित औद्योगिक सहकार्य अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी सध्याच्या लष्कर ते लष्कर पातळीवरच्या घडामोडींचा आढावा घेतला आणि संरक्षण उद्योग सहकार्यावर लक्ष केंद्रित करून सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या उपाययोजनांवर  चर्चा केली

संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आगामी पाच वर्षांसाठीचा पथदर्शक आराखडा तयार करण्यासाठी कृतीदल स्थापन करण्यावर आणि यापुढील संयुक्त संरक्षण सहकार्य बैठक लवकरात लवकर टांझानिया मध्ये आयोजित करण्यावर दोन्ही मंत्र्यांमध्ये सहमती झाली.  राजनाथ सिंह यांनी  टांझानियाच्या संरक्षणमंत्री डॉ. स्टरगोमेना लॉरेन्स टॅक्स यांना 18 ते 22 ऑक्टोबर 2022 दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित केलेल्या भारत-आफ्रिका संरक्षण संवादासाठी आणि डेफएक्सपो 2022 साठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले.

त्याआधी आज सकाळी, टांझानियाच्या  संरक्षण आणि राष्ट्रीय सेवा मंत्र्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि स्मारकावर पुष्पहार अर्पण करून शहीद वीरांना श्रद्धांजली वाहिली.  राजनाथ सिंह यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीपूर्वी डॉ टॅक्स यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली.

भारतीय संरक्षण उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी डॉ टॅक्स  हैदराबादला जाणार असून तत्पूर्वी  वॉरगेमिंग विकास केंद्र आणि हिंद महासागर क्षेत्राशी निगडित इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटरला त्या भेट देणार आहेत.

***

R.Aghor/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1854747) Visitor Counter : 179