पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हरियाणातील फरिदाबाद इथे अमृता रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 24 AUG 2022 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्‍ट 2022

 

अमृता रुग्णालयाच्या रूपाने आपल्या सर्वांना आशीर्वाद देणाऱ्या माता अमृतानंदमयी जी यांना मी वंदन करतो. स्वामी अमृतास्वरूपानंद पुरी जी, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, मुख्यमंत्री मनोहर लाल जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, कृष्णपाल जी, हरियाणाचे उपमुख्यमंत्री  दुष्यंत चौटाला, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनीनो,

काही दिवसांपूर्वीच देशाने स्वातंत्र्याच्या अमृतकाळात नव्या ऊर्जेने प्रवेश केला आहे. आपल्या या अमृततुल्य कार्यक्रमात देशाच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव होत आहे, देशाचे सामूहिक विचार जागृत होत आहेत. या अमृतकाळाच्या सुरवातीलाच  माता अमृतानंदमयींच्या आशीर्वादाचे अमृत देशाला मिळत आहे याचा मला आनंद आहे.  अमृता रुग्णालयाच्या रूपाने फरिदाबादमध्ये आरोग्याची एवढी मोठी संस्था उभी राहिली आहे.  हे रुग्णालय इमारतीच्या, तंत्रज्ञानाच्या बाबतीत जेवढे आधुनिक आहे, तेवढेच ते सेवा, संवेदना आणि अध्यात्मिक चेतनेच्या दृष्टीने अलौकिक आहे.  आधुनिकता आणि अध्यात्माचा हा संगम गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सेवेचे, प्रभावी उपचाराचे माध्यम बनेल.  या अभिनव कार्याबद्दल, सेवेच्या एवढ्या मोठ्या त्यागासाठी मी पूज्य अम्मा यांचे आभार मानतो.

स्नेहत्तिन्डे, कारुण्यत्तिन्डे, सेवनत्तिन्डे, त्यागत्तिन्डे, पर्यायमाण अम्मा। माता अमृतानंन्दमयी देवी, भारत्तिन्डे महत्ताय, आध्यात्मिक पारंपर्यत्तिन्डे, नेरवकाशियाण। आपल्या इथे सांगितले गेले आहे - अयं निजः परो वेति गणना, लघुचेतसाम्। उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥ एन्न महा उपनिषद आशयमाण, अम्मयुडे, जीविता संदेशम। अर्थात:- अम्मा म्हणजे प्रेम, करुणा, सेवा आणि त्याग यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे.  त्या भारताच्या आध्यात्मिक परंपरेच्या वाहक आहेत. अम्मांचा जीवन संदेश आपल्याला महाउपनिषदांमध्ये सापडतो. या पवित्र प्रसंगी मठाशी संबंधित संतजन, ट्रस्टशी संबंधित सर्व मान्यवरांना, सर्व डॉक्टर आणि इतर कर्मचारी बांधवांना मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो.

मित्रहो,

आपण वारंवार ऐकत आलो आहोत, न त्वहम् कामये राज्यम्, न च स्वर्ग सुखानि च। कामये दुःख तप्तानाम्, प्राणिनाम् आर्ति नाशनम्॥ अर्थात्, आम्हाला ना राज्याची आस आहे ना स्वर्गसुखाची इच्छा आहे. दुःखी लोकांचे  दुःख दूर करण्याचे सौभाग्य मिळत राहो हीच आमची इच्छा. ज्या समाजाचे विचार असे आहेत, ज्याची संस्कृती अशी आहे, त्या समाजात सेवा आणि उपचार  हेच समाजाचे चैतन्य बनते.  म्हणूनच, भारत एक असे राष्ट्र आहे जिथे उपचार ही सेवा आहे, आरोग्य हे दान  आहे.  जिथे आरोग्य आणि अध्यात्म दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत.आपल्या इथे आयुर्विज्ञान एक वेद आहे. आपण आपल्या वैद्यकशास्त्रालाही आयुर्वेदाचे नाव दिले आहे. आपण  आयुर्वेदातील सर्वात महान विद्वानांना, सर्वात महान वैज्ञानिकांना ऋषी आणि  महर्षीं म्हणून संबोधले, त्यांच्या प्रती   पारमार्थिक आस्था व्यक्त केली. महर्षी चरक, महर्षी सुश्रुत, महर्षी वाग्भट्ट! अशी कित्येक उदाहरण आहेत, त्यांचे ज्ञान आणि स्थान आज भारतीय जनमानसात अजरामर झाले आहे.

बंधू आणि भगिनींनो, 

भारताने शतकानुशतकाच्या गुलामगिरी आणि अंधकारातही आपली संस्कृती आणि विचार कधीच लुप्त होऊ दिला नाही, त्याची जोपासना केली. आपले ते  आध्यात्मिक सामर्थ्य देशात पुन्हा एकदा बळकट होत आहे.  आपल्या आदर्शांची उर्जा पुन्हा एकदा मजबूत होत आहे.  भारताच्या या नवजागरणाचे एक महत्त्वाचे वाहक म्हणून पूज्य अम्मा  यांच्या रूपाने राष्ट्र आणि जग अनुभवत आहे.  त्यांचे संकल्प आणि प्रकल्प आज इतक्या मोठ्या सेवेच्या आस्थापनांच्या रूपाने आपल्यासमोर आहेत.  समाजजीवनाशी निगडित अशा सर्व क्षेत्रांत पूज्य अम्मांचे वात्सल्य, त्यांची करुणा आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. त्यांचे मठ आज हजारो मुलांना शिष्यवृत्ती देत ​​आहेत, बचत गटांच्या माध्यमातून लाखो महिलांचे सक्षमीकरण करत आहेत.  स्वच्छ भारत अभियानातही तुम्ही देशासाठी अभूतपूर्व योगदान दिले आहे.  स्वच्छ भारत निधीत तुमच्या अमूल्य योगदानामुळे गंगेच्याकाठी काही भागात खूप काम झाले आहे.  यामुळे नमामि गंगे मोहिमेलाही खूप मदत झाली.  पूज्य अम्मा यांच्याबद्दल संपूर्ण जगाला आदर आहे, पण मी एक भाग्यवान व्यक्ती आहे. गेल्या अनेक दशकांपासून मला पूज्य अम्मा यांचा स्नेह आणि पूज्य अम्मा यांचे आशीर्वाद अविरतपणे मिळत आहेत. त्यांचे साधे मन आणि मातृभूमीबद्दलची विशाल दृष्टी मला जाणवली आणि म्हणूनच मी म्हणू शकतो की ज्या देशात इतकी उदार आणि समर्पित आध्यात्मिक सत्ता आहे, त्याचा उत्कर्ष सुनिश्चित आहे.

मित्रांनो,

आपल्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांकडून शिक्षण आणि औषधोपचाराशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडण्याची ही व्यवस्था एक प्रकारे जुन्या काळातील पीपीपी मॉडेल आहे.  याला सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) म्हणतात पण मी 'परस्पर प्रयत्न' म्हणूनही पाहतो. राज्य आपल्या पातळीवर मोठमोठ्या विद्यापीठांच्या उभारणीत भूमिका बजावत, स्वतःची व्यवस्था तयार करत असत.  पण त्याच वेळी धार्मिक संस्था देखील याचे महत्त्वाचे केंद्र असत.आज, सरकार देखील पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने देशातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी जलद गतीने कार्य करत आहे.यासाठी सामाजिक संस्थांनाही प्रोत्साहन दिले जात आहे.खाजगी क्षेत्राशी भागीदारी करून सार्वजनिक खासगी भागीदारीची प्रभावी प्रारुपे विकसित केली जात आहेत.मी या व्यासपीठावरून सांगतो,की अमृता रुग्णालयाचा हा प्रकल्प देशातील इतर सर्व संस्थांसाठी आदर्श ठरेल, तो एक आदर्श प्रारुप म्हणून उदयास येईल.आपल्या देशातील इतर काही धार्मिक संस्थानेदेखील अशाप्रकारे संस्था चालवत आहेत,अनेक संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.आमची खाजगी क्षेत्रे देखील संसाधने उपलब्ध करून आणि मदत करून पीपीपी( PPP) प्रारुपांप्रमाणे आध्यात्मिक खाजगी भागीदारीला समर्थन देत, अशा संस्थाना संसाधने उपलब्ध करत त्यांना मदत करू शकतात.

मित्रांनो,

आपण कोरोनाच्या या काळात हे पाहिले आहे,की समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक संस्था,प्रत्येक क्षेत्र यांचे प्रयत्न फलदायी ठरतात.यातही जी अध्यात्मिक खाजगी भागीदारी आहे, आज मी त्याचा विशेष उल्लेख करणार आहे.तुम्हा सर्वांना माहिती आहे, की भारताने जेव्हा लस बनवली तेव्हा काही लोकांकडून त्यांचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला गेला.  या अपप्रचारामुळे समाजात अनेक प्रकारच्या अफवा पसरू लागल्या.पण जेव्हा समाजातील धार्मिक नेते, अध्यात्मिक गुरू एकत्र आले, तेव्हा त्यांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका, असे सांगितले आणि त्याचा लगेच परिणाम झाला. इतर देशांतील लोकांची संभ्रमावस्था झालेली आपण पाहिली तशी स्थिती लसीबाबत भारतात निर्माण झाली नाही.आज आपल्या सबका प्रयास या भावनेमुळेच,भारत जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबवू शकला आहे.

मित्रांनो,

यावेळी लाल किल्ल्यावरून मी अमृतकाळाच्या पंचप्रणांचे तत्व स्वरूप देशासमोर ठेवले आहे. या पाच प्रतिज्ञांपैकी(प्रणांपैकी) एक प्रतिज्ञा म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेचा पूर्ण त्याग.त्याचीही सध्या देशात जोरदार चर्चा होत आहे.या मानसिकतेचा त्याग आपण केला,की आपल्या कृतीची दिशाही बदलते.हाच बदल आज देशाच्या आरोग्य व्यवस्थेत दिसून येत आहे.आता आपण ज्या आपल्या पारंपारिक ज्ञानावर आणि अनुभवांवर विसंबून आहोत,त्यांचे लाभ जगासमोर नेत आहोत.आपला आयुर्वेद,आपला योग आज एक विश्वासार्ह औषध प्रणाली बनली आहे.भारताच्या प्रस्तावावर संपूर्ण जग पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करणार आहे. भरड धान्ये. आपण सर्वांनी ही मोहीम पुढे न्यावी, आपली उर्जा त्यासाठी द्यावी ही अपेक्षा मी व्यक्त करतो.

मित्रांनो,

आरोग्याशी संबंधित सेवांची व्याप्ती केवळ रुग्णालये,औषधे आणि उपचारांपुरतीच मर्यादित नाही.सेवेशी संबंधित अशी अनेक कामे आहेत, जी निरामय समाजाचा पाया मजबूत करतात.उदाहरणार्थ, सामान्यातील सामान्य नागरिकांपर्यंत स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची उपलब्धता असणे ही तितकीच महत्त्वाची बाब आहे.आपल्या देशात अनेक आजार केवळ प्रदूषित पाण्यामुळेच होतात.त्यामुळेच देशाने जल जीवन मिशनसारखे देशव्यापी अभियान 3 वर्षांपूर्वी सुरू केले.या तीन वर्षांत देशातील 7 कोटी ग्रामीण कुटुंबांना प्रथमच नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.विशेष म्हणजे हरियाणा सरकारने या मोहिमेतही प्रभावीपणे कार्य केले आहे.मला त्याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.हरियाणा आज देशातील अशा अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे जिथे प्रत्येक घराला नळाद्वारे पाण्याची सोय करून देण्यात आली आहे.  तसेच हरियाणातील जनतेने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या मोहिमेतही उत्कृष्टपणे काम केले आहे. तंदुरुस्ती आणि खेळ हे विषय हरियाणाच्या नसानसात, हरियाणाच्या मातीत, येथील संस्कारांत आहेत.आणि त्यामुळेच तर येथील तरुण खेळाच्या मैदानात आपल्या तिरंग्याची शान वाढवीत आहेत.या गतीने आपल्या सर्वांना, देशातील इतर राज्यांपेक्षा कमी कालावधीत मोठे परीणाम घडवून आणायचे आहेत.यासाठी आपल्या सामाजिक संस्था मोठे योगदान देऊ शकतात.

मित्रांनो,

योग्य विकास म्हणजे तोच, जो प्रत्येकापर्यंत पोहोचतो,ज्यातून प्रत्येकाला लाभ होतो.गंभीर आजारावरील उपचार सर्वांसाठी सहजपणे उपलब्ध व्हावेत ही अमृता रूग्णालयाची भावना आहे.मला खात्री आहे की तुमच्या सेवेचा हा अमृत संकल्प हरियाणा, दिल्ली-एनसीआरमधील लाखो कुटुंबांना आयुष्मान करेल.  पुन्हा एकदा पूज्य अम्मा यांच्या श्री चरणी नतमस्तक होऊन, तुम्हा सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो, आपल्या सर्वांना अनेकानेक शुभेच्छा आणि, खूप खूप धन्यवाद !!

 

* * *

N.Chitale/Vinayak/Sampada/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1854213) Visitor Counter : 200