मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2022 साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत
Posted On:
24 AUG 2022 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2022
केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील पशुपालन आणि दुग्धविकास विभागाने वर्ष 2022 साठीच्या गोपाल रत्न पुरस्कारांसाठी 01.08.2022 पासून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. यासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर म्हणजेच https://awards.gov.in येथे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2022 आहे. येत्या राष्ट्रीय दुग्ध दिनी म्हणजेच 26 नोव्हेंबर 2022 रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या पुरस्कारांसाठी आवश्यक पात्रता इत्यादी बाबींचे तपशील जाणून घेण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या संकेतस्थळाला भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पुरस्कारासाठी विचारात घेण्यात येणाऱ्या गाई-म्हशींच्या नोंदणीकृत जाती परिशिष्टात दिल्या आहेत.
शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका पुरविण्याच्या उद्देशाने पशुपालन आणि दुग्धविकास क्षेत्रात परिणामकारक विकास घडवून आणण्यासाठी केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भारतातील देशी जातींच्या गायी-म्हशी सशक्त आहेत आणि त्यांच्यात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्याची जनुकीय क्षमता आहे. शास्त्रीय पद्धतीने गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात 2014 सालच्या डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा “राष्ट्रीय गोकुळ अभियान(आरजीएम)” सुरु करण्यात आले.
या अभियानाअंतर्गत, दूध उत्पादक शेतकरी, या क्षेत्रात कार्यरत इतर व्यक्ती तसेच दूध-उत्पादकांना बाजारापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या सहकारी संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या वर्षी देखील खालील विभागांसाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे:
- देशी गाई अथवा म्हशींचे पालन करणारा सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी (नोंदणीकृत जातींची यादी सोबत जोडली आहे)
- सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ
- सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था/ दूध निर्मिती कंपनी/दूध उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादक संघटना
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारामध्ये प्रत्येक श्रेणीसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र, स्मरणचिन्ह आणि खालील रोख रकमेचा समावेश आहे:
- प्रथम क्रमांक – रु.5,00,000/- (पाच लाख रुपये)
- द्वितीय क्रमांक- रु.3,00,000/-(तीन लाख रुपये) आणि
- तृतीय क्रमांक- रु.2,00,000/- (दोन लाख रुपये)
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1854159)
Visitor Counter : 256