संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दलाकडून 32 बांगलादेशी मच्छिमारांची सुटका

Posted On: 23 AUG 2022 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022

 

भारतीय तटरक्षक दलाने  32 बांगलादेशी मच्छिमारांची सुटका केली आणि दोन्ही तटरक्षक दलांमधील विद्यमान सामंजस्य करारानुसार आज त्यांना बांगलादेश तटरक्षक दलाकडे सुपूर्द केले. 

भारत-बांगलादेश  आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ  बोटी उलटल्यानंतर 'वरद' या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने 32 बांगलादेशी मच्छिमारांची  सुटका केली आणि त्यांना बांगलादेशी तटरक्षक जहाज 'तजुद्दीन'(PL-72) च्या स्वाधीन केले.  बांगलादेशी मच्छिमारांचे प्राण वाचवण्याच्या मानवतावादी भूमिकेबद्दल बांगलादेश तटरक्षक दलाने भारतीय तटरक्षक दलाचे आभार मानले आहेत.

बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनार्‍यावर 19-20 ऑगस्ट 22 दरम्यान  चक्रीवादळ/कमी दाबाच्या पट्ट्यामुळे  बांगलादेशी मच्छिमारांच्या बोटी उलटल्या होत्या. यापैकी बहुतांश मच्छीमार खवळलेल्या समुद्रात मासे मारण्याच्या जाळ्यांना जवळपास 24 तास लटकत होते आणि जगण्यासाठी धडपडत होते.  20 ऑगस्ट 22 रोजी  जवळपास 24 तासांनंतर, त्यांना भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांनी आणि विमानांनी त्यांना पाहिले आणि बचावकार्य सुरू केले.32 बांगलादेशी मच्छिमारांपैकी 27 जणांना भारतीय तटरक्षक दलाने खोल पाण्यातून सोडवले आणि उर्वरित 5 बांगलादेशी मच्छीमारांना भारतीय मच्छिमारांनी उथळ क्षेत्रातून वाचवले.

या बचावकार्यातून  कठीण परिस्थितीत जीवित हानी टाळण्याची  भारतीय तटरक्षक दलाची  प्रतिबध्दता दिसून येते.  अशा यशस्वी शोधकार्य आणि बचाव कार्यांमुळे   प्रादेशिक शोध आणि बचाव संरचना मजबूत होईलच , शिवाय  शेजारी देशांसोबतचे आंतरराष्ट्रीय सहकार्य देखील वृद्धिंगत होईल.

S.Kane/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853967) Visitor Counter : 144


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil