गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद 2022 चे उद्घाटन
Posted On:
17 AUG 2022 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 17 ऑगस्ट 2022
राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेच्या सर्व पैलूंचे बळकटीकरण करून भारताला एक निर्धोक आणि सुरक्षित देश म्हणून सुनिश्चित करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद 2022 चे उद्घाटन केले. केंद्रीय गृह सचिव, उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार , सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसेच पोलीस महानिरीक्षक तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे महासंचालक या परिषदेला उपस्थित आहेत. तसेच देशभरातील 600 पोलीस अधिकारी प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने या परिषदेत भाग घेत आहेत.
या परिषदेमध्ये देशातील सर्वोच्च नेतृत्व आणि विशेष क्षेत्रातील नैपुण्य असणारे सर्वोत्कृष्ट पोलीस अधिकारी, संरक्षण अधिकारी आणि तज्ञ यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. परिषदेची सुरुवात होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शहीद स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
परिषदेच्या पहिल्या दिवशी, आज, दहशतवाद-विरोधी कारवाई, अत्याचाराला विरोध, क्रिप्टो-चलनाशी संबंधित समस्या, गुन्हेगारांना रोखणारे ड्रोन तंत्रज्ञान तसेच माओवादी गटाकडून निर्माण केल्या जात असलेल्या आव्हानांसह राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.
नव्याने निर्माण होणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांचा शोध घेण्यात जिल्हा पातळीवरील पोलीस अधिकाऱ्यांची असलेली महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात दहशतवाद रोखण्याच्या बाबतीत मानवी बुद्धीमत्तेचे महत्त्व अधोरेखित केले.
केंद्रीय मंत्री शाह यांनी यावेळी, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोने विकसित केलेल्या बोटांच्या ठशांच्या ओळख निश्चितीसाठीच्या राष्ट्रीय स्वयंचलित प्रणालीचे देखील उद्घाटन केले.या प्रणालीमुळे बोटांच्या ठशांच्या केंद्रीकृत माहिती साठ्याच्या मदतीने अनेक गुन्ह्यांची जलद गतीने तसेच सोप्या पद्धतीने उकल होण्यास मदत होणार आहे.
या परिषदेच्या उद्याच्या समारोप सत्राला केंद्रीय गृहमंत्री संबोधित करणार आहेत.
***
SushamaK/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1852809)
Visitor Counter : 255