आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताने 2014 पासून बालमृत्यू दर 1000 जन्मांमागे 45 वरून 2019 मध्ये प्रति 1000 जन्मांमागे 35 पर्यंत कमी करण्यात वेगाने प्रगती केली आहे - केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार


केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, यांनी आज अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट परिषद तसेच पालन 1000 राष्ट्रीय मोहीम आणि पालकत्व ॲपचे केले उद्घाटन

"पहिले हजार दिवस मुलाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आकलनविषयक आणि सामाजिक आरोग्यासाठी एक ठोस व्यासपीठ उपलब्ध करतात"

Posted On: 16 AUG 2022 5:23PM by PIB Mumbai

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज मुंबईत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बालपण विकास परिषद (अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह), पालन 1000 राष्ट्रीय अभियान आणि पालकत्व ॲपचे उद्घाटन केले. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य आणि पोषण) डॉ विनोद के पॉल हे देखील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुलाच्या आयुष्यातील सुरूवातीचे टप्पे खूप महत्त्वाचे असतात कारण या टप्प्यातील प्रभाव पुढे आयुष्यभर राहू शकतो. स्त्रीच्या गरोदरपणात पोटातील बाळाच्या मेंदूच्या वाढीची प्रक्रिया सुरू होते. आईचे आरोग्य, पोषण आणि आजूबाजूचे वातावरण  याचा प्रभाव या वाढीवर होतो, असे केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यावेळी म्हणाल्या.

पहिले 1000 दिवस ज्यात गर्भधारणेचा समावेश आहे आणि मुलाच्या आयुष्याची पहिली दोन वर्ष या कालावधीत मुलाला योग्य आहार, संवेदनाविषयक विकासावर लक्ष, प्रेम आणि पाठबळ याची आवश्‍यकता असते, असेही त्यांनी सांगितले.

आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर सातत्याने काळजी घेण्यावर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा भर आहे, असे त्यांनी नमूद केले.

बालमृत्यू कमी करण्यात आलेल्या यशाबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार त्यांनी माहिती दिली. भारताने 2014 मध्ये 1000 जन्मांमागे 45 बालमृत्यू असा असलेला दर 2019 मध्ये 1000 जन्मांमागे 35 असा कमी करण्यात वेगाने प्रगती केली आहे. बालमृत्यूचा दर कमी करण्यासाठी भारत वेगाने उपाययोजना करत आहे.  राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत बाल आरोग्य कार्यक्रम मिशन (NHM) आणि सर्वसमावेशक एकात्मिक हस्तक्षेपाद्वारे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले अशी माहितीही त्यांनी दिली.

मुलांचा जीव वाचविणे याचा विचार स्वतंत्रपणे करता येत नाही कारण त्याचे आरोग्य आईच्या आरोग्याशी जवळून जोडले गेलेले असते अशी टिप्पणीही त्यांनी केली. पाच वर्षांखालची मुले आणि बालकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी गंभीर, महत्त्वाच्या सेवा घरपोच, सामुदायिक संपर्काद्वारे आणि आरोग्य सुविधांद्वारे प्राथमिक, प्रथम संदर्भ युनिट, तृतीयक आरोग्य सुविधा यासारख्या विविध स्तरांवर उपलब्ध करून दिल्या जाव्यात याची ग्वाही राष्ट्रीय आरोग्य अभियान देते. स्मार्ट भारतासाठी बुद्धिमान भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक स्वप्न आहे, जे तरुणांच्या मनाला आकार देण्याचा प्रयत्न करते. तरूणांची वाढ वयाच्या 8 व्या वर्षापर्यंत सर्वात वेगवान असल्याचे मानले जाते,” असे त्या म्हणाल्या.

आजच्या आणि उद्याच्या मुलाचा आकलनविषयक, वागणूकविषयक,  सामाजिक आणि संवेदनाविषयक विकास याला खूप जास्त महत्त्व आहे. आपल्या मुलांच्या इष्टतम क्षमतेला  मुक्त वाव मिळण्यासाठी ते आवश्यक आहे, असे पॉल यावेळी म्हणाले.

फक्त मातेनेच नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांनीही बालसंगोपनात सहभागी झाले पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलाला दिवसभरात किती वेळा स्पर्श करता यावर तुमचा त्याच्याशी असलेला बंध आणि त्याच्यावर असलेले प्रेम ठरते असे राज्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले.

योग्य निदानाबरोबरच प्रतिसाद द्यायला लागणारा वेळ, दर्जा, चिकाटी आणि आपली समजावून सांगण्याची क्षमता आणि वेळेवर मिळणारी सेवा यामुळे कमी वजनाची अर्भके जन्माला येण्याचे प्रमाण कमी करता येईल, असे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे सहसचिव डॉ.अशोक बाबू यांनी सांगितले.

पालन 1000 च्या उद्घाटनादरम्यान आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला.


डॉ. सुमिता घोष, अतिरिक्त आयुक्त आणि प्रभारी (बाल आरोग्य), मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, बर्नार्ड वन लीर फाउंडेशनच्या भारतातील प्रतिनिधी रुश्दा मजीद, लुइगी डी'अक्विनो, युनिसेफ, डॉ. पुष्पा चौधरी, डब्ल्यूएचओ इंडिया हे देखील या बैठकीत उपस्थित होते.


पालन 1000 राष्ट्रीय मोहीम आणि पालकत्व ॲप बद्दल

'पालन 1000 - पहिल्या 1000 दिवसांचा प्रवास', त्याच्या आयुष्याच्या पहिल्या 2 वर्षांत मुलांच्या संज्ञानात्मक विकासावर लक्ष केंद्रित करते. पालन 1000 पालक, कुटुंबे आणि इतरांसाठी सुरुवातीच्या वर्षांचे प्रशिक्षण कुटुंबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सेवांसह एकत्रित करते. आयुष्याच्या पहिल्या वर्षांमध्ये चांगली सुरुवात करण्यासाठी पालक आणि काळजीवाहू महत्त्वपूर्ण असतात. हा कार्यक्रम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) च्या मिशनशी संबंधित आहे. तो प्रतिसादात्मक काळजी आणि पहिल्या 1000 दिवसांमध्ये हस्तक्षेप करण्यावर भर देतो. PAALAN 1000 पालकत्व ॲप काळजी घेणाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये काय करता येईल याबद्दल व्यावहारिक सल्ला देईल आणि पालकांच्या विविध शंकांचे निराकरण करण्यात मदत करेल आणि मुलांच्या विकासासाठी आमच्या प्रयत्नांना निर्देशित करेल. 2 वर्षांखालील मुलांचा संज्ञानात्मक विकास हे या पालन 1000 चे प्रमुख क्षेत्र आहे. पालन 1000 ने प्रेम वाढवा, बोला आणि व्यस्त राहा, हालचाली आणि खेळामधून एक्सप्लोर करा, कथा वाचा आणि चर्चा करा, स्तनपानादरम्यान आईची मुलाशी संलग्नता आणि तणाव व्यवस्थापित करणे आणि शांत राहणे या 6 तत्त्वांवर लक्ष केंद्रित केले आहे.


S.Tupe/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1852293) Visitor Counter : 276