पंचायती राज मंत्रालय
राज्यमंत्री (पंचायती राज) कपिल मोरेश्वर पाटील उद्या सुधारित राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी आराखडा तयारीच्या राष्ट्रीय लेखन कार्यशाळेचे उद्घाटन करतील
Posted On:
15 AUG 2022 10:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2022
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील उद्या नवी दिल्ली येथे सुधारित राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी मार्गदर्शक आराखडा तयारीच्या राष्ट्रीय लेखन कार्यशाळेचे उद्घाटन करतील. ते सुधारित राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांवरील मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करतील.
ही राष्ट्रीय लेखन कार्यशाळा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या विभागातील अधिकाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार अर्ज प्रक्रियेवर अभिमुखता प्रदान करेल, जे ते पुढे पंचायती राज संस्थांपर्यंत (PRIs) प्रवाही पद्धतीने पोचवतील.
सुधारित प्रणाली अंतर्गत, ग्राम, गट आणि जिल्हा पंचायतींना दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार (वैयक्तिक संकल्पना आधारित कामगिरीसाठी) आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार (विविध संकल्पनांवर आधारित एकूण कामगिरीसाठी) या दोन श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातील. प्रत्येक संकल्पनेसाठी संबंधित स्तरावरील संकल्पना निवड समित्या पुरस्कारप्राप्त पंचायतींची निवड करतील. याशिवाय, काही विशेष श्रेणींचे पुरस्कार ग्रामपंचायतींना दिले जातील, जसे की, उर्जेच्या नवीकरणीय स्रोतांचा स्वीकार आणि वापर यासाठी ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार; नेट-झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या अनुकरणीय कार्यासाठी कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार; ज्या ग्रामपंचायतींनी पात्रता निकष पूर्ण केले आहेत आणि आगामी वर्षांमध्येही राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी निवडल्या जातील अशा ग्रामपंचायतींना नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार; ज्या संस्थांनी शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण (LSDGs) आणि सर्वोत्कृष्ट सहभागी राज्य/ केंद्रशासित प्रदेश /जिल्हा /गट पंचायतींना संस्थात्मक सहाय्य प्रदान केले आहे अशा संस्थांसाठी पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार.
सुधारित राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या प्रयत्नासाठी, पंचायत राज मंत्रालय (MoPR) नोडल केंद्रीय मंत्रालये /विभाग जसे की, ग्रामीण विकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महिला आणि बाल विकास, पेयजल आणि स्वच्छता, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण आणि जल संसाधने, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन यांच्याशी सहयोग करत आहे. ही नोडल मंत्रालये संबंधित विषयांवर राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांच्या निवडीसाठी विषयगत निवड समित्यांचे नेतृत्व करतील आणि इतर मंत्रालये /विभाग या समित्यांचे सदस्य असतील.
तत्पूर्वी, 4 ते 6 जुलै 2022 दरम्यान, पंचायती राज संस्थांमध्ये (PRIs) शाश्वत विकास उद्दिष्टे (LSDGs) च्या स्थानिकीकरणावर योजना आणि कृती आराखड्याच्या तयारी आणि अभिप्रेत योजना पुढे नेण्यासाठी विविध अभिसरण धोरणांवर चर्चा करणे यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकरिता राष्ट्रीय लेखनशाळा देखील आयोजित करण्यात आली होती.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1852126)
Visitor Counter : 210