संरक्षण मंत्रालय

स्वातंत्र्याची 75  वर्षे साजरी करण्यासाठी देश सज्ज


दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी  राष्ट्राला संबोधित करणार

Posted On: 14 AUG 2022 10:11PM by PIB Mumbai

 

ठळक वैशिष्ट्ये -

  •  देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसाजरा करत आहे
  •  पंतप्रधान उद्या लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे नेतृत्व करतील
  • 21 तोफांच्या सलामीमध्ये प्रथमच देशी बनावटीच्या  ATAGS  होवित्झर तोफा  वापरल्या जातील
  • एनसीसी विशेष युवा आदानप्रदान कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 14 विविध  देशांमधील 26 अधिकारी/पर्यवेक्षक आणि 124 कॅडेट्स/युवकांना  लाल किल्ल्यावरील  स्वातंत्र्य दिन सोहळ्यात  प्रथमच सहभागी होतील
  • अंगणवाडी कार्यकर्ते, रस्त्यावरील विक्रेते, मुद्रा योजनेतील कर्जदार, शवागारातील कामगार यांना विशेष निमंत्रण

आज भारतीयांसाठी  स्वातंत्र्याची साडेसात दशके पूर्ण झाली आहेत.  15 ऑगस्ट 1947 रोजी देशाने वसाहतवादी राजवटीच्या बेड्यांमधून स्वतःला मुक्त केले. स्वाभिमानी राष्ट्र स्वातंत्र्याचे  76 वे वर्ष साजरे करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसाजरा करत आहे. संपूर्ण  देशात  देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. भारत सरकारच्या विविध मंत्रालये, विविध राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश, सशस्त्र दल आणि सामान्य जनतेकडून या महत्त्वपूर्ण प्रसंगी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन ऐतिहासिक 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी राष्ट्राचे नेतृत्व करतील. ते राष्ट्रध्वज फडकवतील आणि त्यानंतर परंपरेप्रमाणे  राष्ट्राला संबोधित करतील.

पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन झाल्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण  राज्यमंत्री  अजय भट्ट आणि संरक्षण सचिव डॉ अजय कुमार त्यांचे  स्वागत करतील.  संरक्षण सचिव  दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा, एव्हीएसएम  यांचा  पंतप्रधानांना परिचय करून देतील.

दिल्ली क्षेत्राचे जीओसी नरेंद्र मोदींना सलामीच्या ठिकाणी  घेऊन जातील, जिथे संयुक्त आंतरसेवा  आणि दिल्ली पोलिस दल  पंतप्रधानांना सलामी देतील. त्यानंतर पंतप्रधान मानवंदना स्वीकारतील.

पंतप्रधानांना मानवंदना देणाऱ्यांच्या  तुकडीत लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिसांचे प्रत्येकी एक अधिकारी आणि  20 जवान असतील. भारतीय हवाई दल या वर्षी समन्वय सेवा पाहणार आहे. मानवंदनेचे  नेतृत्व विंग कमांडर कुणाल खन्ना करणार आहेत. पंतप्रधानांच्या मानवंदनेत  हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर लोकेंद्र सिंह , लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व मेजर विकास सांगवान आणि नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर अविनाश कुमार करतील. दिल्ली पोलिस दल तुकडीचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस उपायुक्त (पूर्व दिल्ली) अचिन गर्ग यांच्याकडे असेल.

मानवंदना स्वीकारल्यानंतर, पंतप्रधान  नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर जातील, जिथे  संरक्षण  मंत्री  राजनाथ सिंह,संरक्षण राज्यमंत्री  अजय भट्ट, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदलप्रमुख ऍडमिरल  आर हरी कुमार आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी त्यांचे स्वागत करतील. दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग  राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी पंतप्रधानांना  तटबंदीवरील  व्यासपीठाकडे नेतील.

तिरंगा ध्वज फडकवण्यात आल्यानंतर त्याला राष्ट्रीय सलामीदिली जाईल.राष्ट्रध्वज फडकवताना आणि त्याला राष्ट्रीय सलामीदेत  असताना हवाई दलाच्या 20 जणांच्या समूहाच्या बँडकडून राष्ट्रगीताची धुन वाजवण्यात येईल. या बँडचे संचालन वॉरंट ऑफिसर मास्टर रघुवीर करणार आहेत.

पंतप्रधानांन राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी करण्यासाठी स्क्वॉड्रन लीडर सुनीता यादव मदत करतील. यावेळी  एलिट 8711 फील्ड बॅटरी (सेरेमोनिअल) या पराक्रमी गनर्स समूहाकडून  21 तोफांची सलामी देण्यात येईल. या सेरेमोनिअल पराक्रमी समूहाचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल एसएम विकास कुमार, आणि गन पोझिशन ऑफिसर नायब सुभेदार (एआयजी) अनूप सिंग असतील.

पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात येत असताना हवाई दल, लष्कर, नौदल आणि दिल्ली पोलिसांचे पाच अधिकारी आणि 128 जवानांचा समावेश असलेले राष्ट्रीय ध्वजरक्षक राष्ट्रीय सलामी देतील. भारतीय हवाई दलातील विंग कमांडर टीव्हीआर सिंग हे या इंटर-सर्व्हिसेस गार्ड आणि पोलिस गार्डचे कमांडर असतील.

राष्ट्रीय ध्वजरक्षक दलातील हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर मिहिर झोकरकर, लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व मेजर आकाश जोशी आणि नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर प्रवीण सारस्वत करणार आहेत.  दिल्ली पोलिस दलाचे नेतृत्व अतिरिक्त डीसीपी (मध्य दिल्ली) श्री अक्षत कौशल हे करणार आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आल्यावर अमृत फॉर्मेशनच्या ठिकाणी दोन MI-17 1V हेलिकॉप्टर्सद्वारे फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात येईल.यासाठी विंग कमांडर आनंद विनायक आगाशे यांच्या नेतृत्वाखाली नुब्रा वॉरियर्स 129 या हेलिकॉप्टर युनिटची संरचना करण्यात आली असून दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये विंग कमांडर निखिल मेहरोत्रा असतील.दोन एमआय-17 इन लाइन ॲस्टर्न गतीच्या फॉर्मेशननंतर द स्नो टायगर्सफॉर्मेशनमध्ये 111 हेलिकॉप्टर या युनिटची दोन ध्रुव हेलिकॉप्टर्स येतील.या फॉर्मेशनचे नेतृत्व विंग कमांडर अभिजीत कुमार करणार आहेत आणि दुसऱ्या हेलिकॉप्टरचे नेतृत्व विंग कमांडर केएस विशाल करणार आहेत.

फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केल्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. पंतप्रधानांच्या भाषणाच्या शेवटी, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी (कॅडेट्स) राष्ट्रगीत गातील.राष्ट्रीय उत्साहाच्या या उत्सवात देशभरातील विविध शाळांतील 792 मुले-मुली, एनसीसी कॅडेट्स( लष्कर, नौदल आणि हवाई दल) सहभागी होणार आहेत.या कॅडेट्सना लाल किल्ल्याच्या तटबंदीसमोरील ज्ञान पथयेथे भारताच्या नकाशाची भौगोलिक रचना केल्याप्रमाणे बसवले जाईल. ते भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक असणार्‍या प्रदेशांचे पोशाख परिधान करतील. एक भारत श्रेष्ठ भारतहा संदेश पुढे नेण्यासाठी हे काम केले जात आहे. प्रथमच, सरकारच्या मेक इन इंडियाउपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी हॉवित्झर तोफ, ॲडव्हान्स्ड  टोव्ड आर्टिलरी गन सिस्टिम (एटीजीएस), 21 तोफांच्या सलामी मध्ये सहभागी असेल.. ही तोफ पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असून DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास  संस्थेने तिची रचना आणि विकास केला आहे. स्वदेशी शस्त्रे आणि दारूगोळा विकसित करण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचा दाखला म्हणून ही तोफ उभी असेल. गोळीबार प्रशिक्षक(firing instructor) नायब सुभेदार गुलाब वाबळे यांच्यासोबत लेफ्टनंट कर्नल गगनदीप सिंग संधू हे गन युनिटचे नेतृत्व करत आहेत. या समारंभासाठी ही तोफ काही तांत्रिक वैशिष्ट्ये बदलून विशेषत: अनुकूलित करण्यात आली आहे. 2022 च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून समाजातील दुर्लक्षित नायकांनाज्यांचे सहसा गुणगाण केले गेले जात नाही अशा व्यक्तींना या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका, फेरीवाले, मुद्रा योजनेचे लाभार्थी, आणि शवागार कामगार यांचा समावेश आहे.आझादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून, संरक्षण आणि संस्कृती  मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या सहकार्याने यावेळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली जाईल.कला कुंभ या भव्य कला प्रकल्पात, पाचशे प्रमुख कलाकारांनी अथक परिश्रम घेऊन प्रत्येकी 75 मीटर लांबीचे, दहा स्क्रोल तयार केले आहेत, त्यापैकी आठ येथे प्रदर्शित केले आहेत. स्मारकीय स्क्रोल कथन कला, या प्राचीन भारतीय परंपरा आणि ऐतिहासिक घटनांना जिवंत करतात, ज्यातून भारत वसाहतवादी राजवटीच्या बंधनातून कसा बाहेर पडला हे दर्शवण्यात येते.

यावर्षी लाल किल्ल्याच्या भव्य भिंतींना विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांची भिंतीवर टांगलेली भित्तिचित्रे सुशोभित करत आहेत.  याबरोबर त्या भिंतींवर त्या विशिष्ट राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा सांस्कृतिक, नैसर्गिक आणि धार्मिक वारसाही दर्शविला जाईल. या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांमध्ये  आंध्र प्रदेशचे पट्टाभी सीतारामय्या, अरुणाचल प्रदेशचे मोजे रिबा, आसामचे कुशल कोंवर, बिहारचे वीर कुंवर सिंग, छत्तीसगडचे वीर नारायण सिंह, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचे लाला हरदयाळ, गोव्याचे पुरुषोत्तम केशव काकोडकरगुजरातच्या भिकाजी कामा, हरियाणाचे राव तुला राम, हिमाचल प्रदेशचे पदम देव, जम्मू-काश्मीरचे सैफुद्दीन किचलु, झारखंडचे भगवान बिरसा मुंडा, कर्नाटकचे कर्नाड सदाशिव राव, केरळचे अक्कामा चेरियन, लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे अब्दुल सत्तार मध्य प्रदेशचे चंद्रशेखर आझाद, महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक, मणिपूरच्या राणी गाईदिनलिऊ, मेघालयचे फान नॉन्ग्लायट, मिझोरामचे रोपुइलियानी, नागालँडचे खैखोजम कुकी, ओडिशाचे लक्ष्मण नायक, पंजाबचे भाई परमानंद, राजस्थानचे सागरमल गोपा, सिक्कीमचे त्रिलोचन पोखरेल, तामिळनाडूचे के कामराज, तेलंगणाच्या सरोजिनी नायडू, त्रिपुराचे सचिंद्र लाल सिंग, उत्तराखंडचे अनुशुया प्रसाद बहुगुणा , उत्तर प्रदेशचे मंगल पांडे आणि पश्चिम बंगालचे चित्तरंजन दास यांचा समावेश आहे.

हे अभिवादन या अतुलनीय व्यक्तिमत्त्वांना स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अतुलनीय किंवा काहीवेळा अनाम राहिलेल्या योगदानाबद्दल अतिशय योग्य श्रद्धांजली आहे.

स्वातंत्र्य दिवस समारोहामध्ये आणखी एक सुंदर भर घातली गेली आहे. ती म्हणजे भारताच्या आवडत्या मनोरंजनांपैकी एक असलेल्या पतंग उडवण्यावरील भित्तिचित्रे मीना बाजार येथे प्रदर्शित केली गेली आहेत. यात विविध रंग, आकार आणि तंत्रांचे पतंग आपल्या मातृभूमीच्या विविधतेतील एकतेचा मंत्र दर्शवितात.

स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून प्रथमच, 09 ते17 ऑगस्ट 2022 दरम्यान एक विशेष युथ एक्सचेंजचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. या 14 देशांमध्ये ज्यात अमेरिका,युरोपियन समूह,अर्जेंटिना, ब्राझील, फिजी, इंडोनेशिया, किरगिझस्तान, मालदीव, मॉरिशस, मोझांबिक, नायजेरिया, सेशेल्स, अरब अमिरात आणि उझबेकिस्तान चा समावेश आहे. या देशांमधून 26 अधिकारी/पर्यवेक्षक आणि 124 कॅडेट्स/युवक स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी आधीच भारतात दाखल झाले आहेत.  लाल किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबरोबरच हे तरुण दिल्ली आणि आग्रा येथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहेत.

***

S.Patil/S.Kane/S.Patgaonkar/V.Yadav/G.Deoda/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851916) Visitor Counter : 339


Read this release in: English , Tamil , Urdu , Hindi