अर्थ मंत्रालय
आयकर विभागाने महाराष्ट्रात राबवली तपास मोहीम
Posted On:
11 AUG 2022 9:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2022
आयकर विभागाने 03.08.2022 रोजी स्टील टीएमटी बारचे उत्पादन करणाऱ्या दोन प्रमुख समूहांच्या मालकीच्या आस्थापनांच्या परिसरात तपास मोहीम राबवली. या तपास मोहिमेत जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबई येथील 30 पेक्षा जास्त परिसरांमध्ये आयकर विभागाने छापे टाकले.
या तपास मोहिमेत अनेक गुन्हादर्शक साक्षीपुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत.
दोन्ही समूहांमधून जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांच्या प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की ते अनेक संस्थांकडून बनावट खरेदीद्वारे खर्चाचा आकडा फुगवून मोठ्या प्रमाणात करचोरी करत होते. या संस्था जीएसटी बुडवण्यातही गुंतल्या असल्याचे आढळून आले आहे. रुपये 120 कोटी पेक्षा जास्त रकमेच्या कच्च्या मालाच्या साठ्याची हिशेबाच्या वहीत नोंद नसल्याचे देखील पुराव्यांमधून आढळून आले आहे.
एका समूहामधून हस्तगत झालेल्या पुराव्यांच्या तपासणीमधून असेही दिसून आले आहे की या समूहाने कोलकाता येथील शेल कंपन्यांकडून मिळवलेले बोगस असुरक्षित कर्ज आणि शेअर प्रीमियमच्या माध्यमातून आपले बेहिशेबी उत्पन्न प्राप्त केले आहे. या समूहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावाने सहकारी बँकांमध्ये उघडले गेलेले अनेक लॉकर्स देखील शोध पथकाला या तपासणीमध्ये सापडले आहेत. या तपास मोहिमेत सहकारी बँकांमधील लॉकर्ससह 30 पेक्षा जास्त बँक लॉकर्सचा शोध लागला आहे. या लॉकर्समध्ये मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड आणि सोन्याचे दागिने सापडले आहेत.
त्याशिवाय, यापैकी एका समूहाच्या मालकीच्या फार्म हाउसवरील गुप्त खोलीतून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
आतापर्यंत, या तपास मोहिमेत 56 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड आणि 14 कोटी रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पुढील तपास सुरु आहे.
S.Kulkarni/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851079)
Visitor Counter : 169