उपराष्ट्रपती कार्यालय

जनता आणि सरकार यांच्यातल्या सतत संवादाच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी दिला भर


लोकांना भेटणे आणि त्यांच्याकडून शिकणे हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली –भारताचे उपराष्ट्रपती म्हणून आपल्या शेवटच्या संबोधनात नायडू यांचे उद्‌गार

Posted On: 09 AUG 2022 8:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2022

 

जनकेन्द्री आणि प्रतिसादात्मक प्रशासनासाठी जनता आणि सरकार यांच्यातल्या सातत्यपूर्ण संवादाच्या  गरजेवर उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी भर दिला.  प्रत्येक टप्प्यावर लोकसहभागासह धोरणनिर्मिती आणि अंमलबजावणी ही  उभय मार्गी  प्रक्रिया असली पाहिजे, असे ते म्हणाले.

उपराष्ट्रपती निवास येथे त्यांची  भेट घेण्यासाठी आलेल्या  भारतीय माहिती सेवेतील 2018 आणि 2019 तुकडीच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना ते आज बोलत होते. यावेळी नायडू यांनी सरकार आणि नागरिक यांच्यातले अंतर कमी करण्यासाठी संवादाची भूमिका अधोरेखित केली.''लोकशाहीमध्येलोकांना त्यांच्या मातृभाषेतून सरकारची धोरणे आणि उपक्रमांची वेळेवर माहिती देऊन जागरूक  करणे आवश्यक आहे.तर दुसरीकडे, सरकारांना लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षांची वस्तुनिष्ठ माहिती वेळेवर  उपलब्ध होणे  आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही म्हणून भारताचे वर्णन करताना लोकांचे जीवन सुखी आणि समृद्ध करणे हा कोणत्याही सुधारणा प्रक्रियेचा उद्देश असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. म्हणूनच, लोकांचे  जीवन शाश्वत आनंदी ठेवणे हे  सर्व सरकारी धोरणात्मक उपायांच्या केंद्रस्थानी असायला हवे असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

"माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत आणि त्यांची  तटस्थता, वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता भारताची लोकशाही मूल्ये  टिकून राहण्यासाठी महत्त्वाची आहे," असे ते म्हणाले.

तरुण अधिकाऱ्यांनी  देशभरातून विकासाच्या अनेक यशोगाथा  समोर आणाव्यात असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. माहिती  आणि  मानसिक  द्वंद  हे आधुनिक काळातील युद्धांचे  महत्वाचे पैलू असल्याचे सांगत नायडू यांनी भारतीय माहिती सेवीतील  अधिकाऱ्यांना या उदयोन्मुख आणि धोरणात्मक क्षेत्रात नैपुण्य विकसित करण्याचा सल्ला दिला.

मते मिळविण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या  लोकानुनयी  उपायां  संदर्भात खबरदारी घेणे आवश्यक असून विनामूल्य देण्याच्या  संस्कृतीमुळे अनेक राज्यांचे आर्थिक आरोग्य बिघडले आहे, असे नायडू म्हणाले. "सरकारने गरीब आणि गरजूंना नक्कीच मदत केली पाहिजे, मात्र  त्याच वेळी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे," असे त्यांनी सांगितले.

 " निखळ मेहनत, एकनिष्ठता  आणि देशाच्या प्रत्येक भागातील  सतत प्रवास आणि लोकांशी संवाद ही एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलापासून देशातील सर्वोच्च घटनात्मक दुस-या पदापर्यंतच्या  माझ्या प्रगतीची   गुरुकिल्ली  आहे."  लोकांना भेटून, बोलून खूप काही शिकायला मिळाले, असे   भारताचे उपराष्ट्रपती म्हणून केलेल्या आपल्या शेवटच्या भाषणात  नायडू  यांनी सांगितले.

 

 

 

 

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850337) Visitor Counter : 156