माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दूरदर्शन आणि आकाशवाणीशिवाय भारताच्या भावनांची अभिव्यक्ती शक्य नाही : केंद्रीय मंत्री अमित शहा
स्वराज ही मालिका स्वातंत्र्यलढ्यातील वीरांबद्दलच्या आपल्या अभिमानाची अभिव्यक्ती आहे : अनुराग ठाकूर
'स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा' या मालिकेचा केंद्रीय मंत्री अमित शहा आणि अनुराग ठाकूर यांनी केला प्रारंभ
Posted On:
05 AUG 2022 8:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022
नवी दिल्लीत आकाशवाणी भवन येथे आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी 'स्वराज - भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा' या मालिकेचा शुभारंभ केला.यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अग्रवाल उपस्थित होते.
दूरदर्शन आणि आकाशवाणीने 550 हून अधिक स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यगाथा पुनरुज्जीवित करून समोर आणण्याचे आणि तरुण पिढीला या अनाम वीरांची ओळख करून देण्याचे प्रशंसनीय काम केले आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
स्वराज्याच्या संकल्पनेमागील दृष्टिकोनाची पुन्हा संकल्पना मांडणे आणि त्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणाऱ्या वीरांच्या कथा सांगणे हा या मालिकेचा उद्देश आहे. ही मालिका भूतकाळातील या वीरांबद्दल असलेल्या आपल्या अभिमानाची अभिव्यक्ती असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील या कथा जिवंत करण्यासाठी ,मालिका तयार करण्यापूर्वी सखोल संशोधन करण्यात आणि आदेशाच्या कानाकोपऱ्यातून माहिती आणि दस्तावेज संकलित करण्यात आले, असे त्यांनी समाधान व्यक्त करत नमूद केले.
''पंडित जसराज आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्यासारख्या दिग्गजांनी आकाशवाणी नसती तर त्यांचे अस्तित्वच नसते'' असे म्हटले होते, असे सांगत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सार्वजनिक प्रसारकांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलताना त्या काळाची आठवण करून दिली. दूरदर्शन आणि आकाशवाणीशिवाय भारताच्या भावनांची अभिव्यक्ती शक्य नाही, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा केवळ आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा उत्सव नाही तर स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पंचाहत्तर वर्षांच्या कामगिरीचा, आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या आणि अनाम वीरांच्या बलिदानाचाही आहे असे सांगत अमित शाह यांनी यासंदर्भात विवेचन करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यामागचा अर्थ सांगितला. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण भारताच्या भविष्याची रूपरेषा बघत आहोत आणि इथून पुढे भारत यशाची आणि उत्कृष्टतेची नवनवीन शिखरे पादाक्रांत करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वराज ही संकल्पना समजण्यास क्लिष्ट आहे, स्वराज म्हणजे केवळ स्वतःचे राज्य नव्हे असे अमित शाह म्हणाले. आपल्या वेगळ्या अशा शैलीने देशात सुशासन आणण्याची ही प्रक्रिया असून यामध्ये आपल्या भाषा, आपली संस्कृती यांचा समावेश होतो, जोपर्यंत आपण स्वराज्याची ही सर्वसमावेशक कल्पना आत्मसात करू शकत नाही तोपर्यंत भारत खरोखरच ती साध्य करू शकणार नाही. या शताब्दी वर्षात आपण आपल्या भाषांचे जतन करणे आणि आपला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, अत्यंत महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.
या मालिकेतील पडद्यामागच्या कलाकारांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचा उल्लेख करून अमित शाह यांनी त्यांचे कौतुक केले. शिक्षणापासून धनसंपत्तीपर्यंत, संस्कृतीपासून प्रशासनापर्यंत सर्वच बाबतीत भारत हा वसाहतवादी सत्तांपेक्षा खूप अधिक प्रगत होता, पण भारताविषयी भ्रामक कथा रचल्या गेल्या आणि लोकांमध्ये न्यूनगंड निर्माण झाला. स्वराज ही मालिका देशातील लोकांच्या सामूहिक विवेकातून सर्व न्यूनगंड दूर करेल, असे ते म्हणाले.
यावेळी विविध संसद सदस्य, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, दूरदर्शन आणि आकाशवाणीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही मालिका दूरदर्शनसह आकाशवाणीवर प्रसारित केली जाईल, असे प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अग्रवाल यांनी सांगितले. या मालिकेमागील सल्लागार समितीच्या सदस्यांचे अग्रवाल यांनी आभार मानले
स्वराज मालिकेविषयी – स्वतंत्र संग्राम की समग्र गाथा
स्वराज ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाचे वर्णन करणारी 75 भागांची मालिका आहे. 4K/HD तंत्रज्ञान वापरून या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.14 ऑगस्ट पासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर हिंदीतून दर रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत प्रसारित केली जाणार आहे. इंग्रजीसह नऊ प्रादेशिक भाषांमध्ये ही मालिका डब केली जात आहे. 20 ऑगस्टपासून दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवर तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, ओरिया, बंगाली आणि आसामी या भाषांमध्ये तिचे प्रसारण होणार आहे.
1498 मध्ये वास्को-द-गामाने भारतात पाऊल ठेवल्याच्या घटनेपासून सुरू होणारी ही मालिका या भूमीतील नायकांची समृद्ध गाथा सादर करते.
यामध्ये राणी अब्बाक्का, बक्षी जगबंधू, तिरोट सिंग, सिद्धू मुर्मू आणि कान्हू मुर्मू, शिवप्पा नायक, कान्होजी आंग्रे, राणी गैडिनलियू, तिलका माझी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, मॅडम भिकाजी कामा यांसारख्या अनेक प्रसिद्ध वीरांचा समावेश आहे.
S.Patil/S.Chavan/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1848920)
Visitor Counter : 217