भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी 9 किनारी राज्यांतील 46 जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद, देशभरात सुरू असलेल्या 75 दिवसांच्या समुद्रकिनारे स्वच्छता मोहिमेचा आढावा घेत या व्यापक मोहिमेत सहाय्य करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना


जगातील सर्वात दीर्घ आणि सर्वात व्यापक समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम असलेली "स्वच्छ सागर, सुरक्षित सागर" मोहीम उत्तरोत्तर वाढवत नेण्याच्या दृष्टीने सहाय्य्य करण्याचे मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

स्थानिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक गोष्टींचा अंतर्भाव करून या प्रदेशातील ख्यातनाम व्यक्तींना या मोहिमेशी जोडून सर्व किनारी जिल्हे एक अनोखे स्वच्छता मॉडेल विकसित करू शकतात.- डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 02 AUG 2022 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज 9 किनारी राज्यांतील 46 उपायुक्त/जिल्हाधिकाऱ्यांशी  संवाद साधला,यावेळी त्यांनी देशभरात  सुरू असलेल्या 75 दिवसांच्या समुद्रकिनारे   स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने सुरू केलेल्या आणि सर्व संबंधित केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे तसेच नागरी समाज संस्थांचा समावेश असलेल्या या व्यापक मोहिमेत सहाय्य करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

"स्वच्छ सागर, सुरक्षित सागर" ही मोहीम  जगातील सर्वात दीर्घ   आणि सर्वात व्यापक समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आहे, या मोहिमेने आधीच  जनतेचे  आणि देशाचे  लक्ष वेधून घेतले आहे.जिल्हाधिकारी ही मोहीम  शाश्वत मोहिमेच्या स्वरूपात  तयार करू शकतात आणि समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन खऱ्या अर्थाने   ही मोहीम  उत्तरोत्तर वाढवत नेऊ शकतात, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

समुद्रकिनारे  स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात  यशस्वी करण्यासाठी "संपूर्ण सरकार" हा दृष्टिकोन अधोरेखित करत , स्वयंसेवी संस्था, नागरिक समूह ,बालके  आणि युवा मंच, कॉर्पोरेट्स, ना-नफा संस्था, किनारी राज्यांतील  महानगरपालिका आणि पर्यावरण कार्यकर्ते यांना या मोहिमेत सामावून घेण्याच्या सूचना डॉ जितेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

बहुविभागीय अभियानात सर्व घटकांचा, विशेषत: देशातील विद्यार्थी आणि तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

डॉ जितेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, भूविज्ञान मंत्रालयाने 5 जुलै रोजी सुरू केलेल्या 75 दिवसीय अभियानाची सांगता 17 सप्टेंबर 2022 रोजी "आंतरराष्ट्रीय तटीय स्वच्छता दिनी" होईल. ते म्हणाले, 17 सप्टेंबर हा योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देखील आहे आणि तो "सेवा दिवस" म्हणून देशभरात साजरा केला जात असून, त्या दिवशी किनारपट्टीच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 75 स्वयंसेवकांसह देशभरातील 75 समुद्रकिना-यांवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी सागरी किनार्‍यांवरून 1,500 टन कचरा, मुख्यतः एकदा वापरायचे प्लास्टिक उचलण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी सर्व संबंधितांकडून सक्रिय सहकार्याची अपेक्षा केली. यावर्षीचा कार्यक्रम हा देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग असल्याचेही त्यांनी सांगितले.

समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि निवडलेल्या चारही किनार्‍यांवर गोवा-आदर्श किनारा स्वच्छता अभियान राबवण्यासाठी स्थानिक मंडळे आणि सेलिब्रिटींना सहभागी करून घेण्यास डॉ जितेंद्र सिंह यांनी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

त्याचप्रमाणे मंत्री महोदयांनी गुजरातमधील पोरबंदरच्या जिल्हाधिकाऱ्यांना, पोरबंदर आणि माधवपूरच्या 100 किलोमीटरच्या किनारपट्टीवर कचरा साफ करण्यासह विविध उपक्रम हाती घेण्यासाठी संपूर्ण संसाधने एकत्रित करण्यास सांगितले. ते म्हणाले, गुजरातच्या सातही किनारी जिल्ह्यांनी “स्वच्छ सागर, सुरक्षित सागर” मोहिमेला पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे.

चेन्नईच्या जिल्हाधिकार्‍यांनी माहिती दिली  की मरीना हा आशियातील सर्वात मोठा समुद्रकिनारा तसेच 29 किलोमीटरच्या किनारपट्टीसह  4 प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर यापूर्वीच स्वच्छता मोहीम राबवली जात आहे  आणि येत्या काही दिवसांत या कामांना आणखी गती मिळेल. दीव, अंदमान आणि निकोबार बेटे, केरळमधील थिरुवनंतपुरम , एर्नाकुलम,  कोल्लम आणि इतर जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांनी मंत्र्यांसमोर त्यांचा कृती आराखडा  आणि भविष्यातील उपक्रम याबाबत सादरीकरण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिमेत पुढाकार घेतला आहे आणि भारताची  7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी मानवजातीसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी संपूर्ण देशाला त्यांनी प्रेरित केल्याचा डॉ जितेंद्र सिंह यांनी पुनरुच्चार केला. 17 सप्टेंबर रोजी देशभरातील 75 समुद्रकिनाऱयांवर 75 स्वयंसेवकांच्या मदतीने   किनारपट्टीच्या प्रत्येक किलोमीटर परिसरात राबविण्यात येणाऱ्या भव्य स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव  डॉ. एम. रविचंद्रन आणि प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी डॉ जितेंद्र सिंह यांना , किनारपट्टी स्वच्छता मोहिमेला अधिक मजबूत  करण्यासाठी आणि चालना देण्यासाठी सर्व 9 किनारी राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी नियमित संवाद साधला जाईल अशी ग्वाही दिली. बृहन चेन्नई महापालिकेचे  आयुक्त गगनदीप सिंग बेदी आणि अमिताभ सेनगुप्ता, विशेष सचिव, गृह विभाग, पश्चिम बंगाल यांनीही मोहिमेचा विस्तार करण्यासाठी आपल्या सूचना सामायिक केल्या.  आजच्या बैठकीत वरिष्ठ अधिकार्‍यांसह भूविज्ञान मंत्रालयाचे नोडल अधिकारी, तटरक्षक दल, नौवहन मंत्रालय आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

ही भव्य मोहीम राबवण्यासाठी सूचना जाणून घेण्यासाठी तसेच मदतीसाठी 22 जुलै रोजी देशाच्या किनारपट्टीलगतच्या  राज्यांतील केंद्रीय मंत्री आणि खासदारांची डॉ जितेंद्र सिंह यांनी महत्वपूर्ण बैठक बोलावली होती , त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांबरोबर आज ही बैठक झाली. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया,  मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्यासह  किनारी राज्यांतील खासदार बैठकीला उपस्थित होते.

 

* * *

S.Patil/Sonal/Vasanti/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1847619) Visitor Counter : 120


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu