माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चे डीडी स्पोर्ट्स वाहिनीवरून थेट प्रसारण
अनेक ठिकाणच्या भारतीय सहभागाचे विस्तृत प्रसारण
प्रविष्टि तिथि:
29 JUL 2022 5:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2022
नुकत्याच उदघाटन झालेल्या सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 8 ऑगस्ट 2022 पर्यंतच्या सांगता सोहोळ्यापर्यंतचे थेट प्रसारण डीडी स्पोर्ट्स वाहिनीवरून करण्यात येणार आहे.
डीडी स्पोर्ट्सने 28 जुलै 2022 पासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील अलेक्झांडर स्टेडियममध्ये भव्य उद्घाटन सोहळ्यासह प्रसारणाला सुरुवात केली. 29 जुलैपासून सुरू होत असलेल्या 20 क्रीडा प्रकारातील क्रीडा स्पर्धांचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सद्वारे केवळ डीडी फ्री डीशवर केले जात आहे.
215 खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय चमू 16 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहे. विविध ठिकाणी एकाच वेळी अनेक स्पर्धा सुरू असल्याने, डीडी स्पोर्ट्सच्या प्रसारणामध्ये भारताशी संबंधित सर्व सामने, उपक्रम आणि सहभागावर मुख्य लक्ष केंद्रित करून स्पर्धेतील विविध कार्यक्रमांच्या विस्तृत प्रसारणाचा समावेश आहे.
डीडी स्पोर्ट्सवर दररोज दुपारी 12 वाजल्यापासून प्रक्षेपणाला सुरुवात होईल आणि ते दिवसभरातील शेवटच्या क्रीडा स्पर्धेपर्यंत सुरू राहील. डीडी स्पोर्ट्सच्या दैनंदिन प्रसारणामध्ये दिवसभरातील नियोजित क्रीडाप्रकारांची माहिती देणाऱ्या क्रीडा तज्ञ आणि पत्रकारांसोबतच्या अर्धा तासाच्या पूर्वावलोकनाचा देखील समावेश आहे. दिवसभरात, ब्रेक दरम्यान, डीडी स्पोर्ट्स वाहिनीवरील निवेदक दर्शकांना आगामी क्रीडा प्रकारांबद्दल माहिती देतील.
डीडी स्पोर्ट्स वाहिनीवरील थेट प्रक्षेपणाशिवाय, आकाशवाणी आणि डीडी स्पोर्ट्स (@ddsportschannel) आणि आकाशवाणी स्पोर्ट्स (@akashvanisports) च्या ट्विटर हँडलवरूनही मैदानावरील घडामोडींबद्दल नियमित अद्ययावत माहिती उपलब्ध होईल.
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 72 देशांचा सहभाग आहे.
* * *
R.Aghor/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1846275)
आगंतुक पटल : 268