संरक्षण मंत्रालय
आधुनिक पद्धतीचा दारुगोळा ही नव्या युगातील युद्धशास्त्राची गरज आहे; राष्ट्रीय सुरक्षेसाठी नाविन्यपूर्ण आणि स्वावलंबी दारुगोळ्याचा पाया निर्माण करणे आवश्यक आहे: केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे ‘अॅमो इंडिया’ परिषदेमध्ये प्रतिपादन
वाढीव सज्जतेसाठी सशस्त्र दलांच्या दारुगोळाविषयक गरजा पुरविण्यासाठी सरकारसोबत काम करण्याचा आग्रह त्यांनी खासगी क्षेत्राला केला
स्थानिक पातळीवरील प्रयत्न आणि परदेशी सहयोग हा भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा पाया आहे : केंदीय संरक्षणमंत्री
Posted On:
27 JUL 2022 4:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2022
भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांना पूर्णतः सज्ज ठेवणारा मजबूत आणि स्वावलंबी पाया निर्माण करण्यासाठी दारूगोळ्याच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन व्हायला हवे असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केले आहे. नवी दिल्ली येथे “मेक इन इंडिया संधी आणि आव्हाने” या संकल्पनेवर आधारलेल्या ‘अॅमो इंडिया’ या लष्करी दारूगोळ्याशी संबंधित दुसऱ्या परिषदेच्या 27 जुलै 2022 रोजी झालेल्या उद्घाटनपर सत्रात ते बोलत होते. आधुनिक पद्धतीचा दारुगोळा ही नव्या युगातील युद्धशास्त्राची गरज आहे आणि भारताच्या प्रादेशिक तसेच जागतिक आवश्यकता आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा विचार करता ती अनिवार्य आहे असे ते म्हणाले. “देशाचा वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक तसेच आर्थिक विकास त्या देशाची शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यांच्या क्षमतेमध्ये प्रतिबिंबित होत असतो. दारूगोळ्यासंदर्भातील विकास केवळ देशाच्या सुरक्षेसाठीच नव्हे तर देशाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वाचा आहे. भारताला जागतिक सत्ता आणि संरक्षण सामग्रीचे उत्पादन करणारा आघाडीचा देश होण्यासाठी, आपण दारूगोळ्याचे स्वदेशी संरेखन, विकास आणि उत्पादन या दिशेने प्रयत्नशील असायला हवे,” असे संरक्षणमंत्री म्हणाले.
संरक्षण क्षेत्राला बळकटी आणण्यात खासगी क्षेत्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते हे केंद्र सरकारने जाणले आहे आणि म्हणूनच दारूगोळ्याच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यासाठी यापूर्वी प्रचलित असलेले अनेक अडथळे सरकारने दूर केले आहेत असे राजनाथ सिंग यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले की बोली लावणाऱ्यांच्या सहभागावरील मर्यादेपासून, आर्थिक पात्रतेचे निकष किंवा कर्जाच्या व्याजाचा मुद्दा अशा अनेक बाबतीत सरकारने मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत.सशस्र दलांच्या वाढीव सज्जतेच्या सुनिश्चीतीसाठी या दलांच्या गरजा पुताविणारा पाया निर्माण करू शकणारे नवे मार्ग शोधण्याचा आग्रह त्यांनीसरकारी तसेच खासगी क्षेत्र, संशोधन आणि विकास आस्थापना, स्टार्ट-अप्स, शिक्षणक्षेत्र आणि स्वतंत्र नवोन्मेषी संशोधकांकडे व्यक्त केला.
अचूक मार्गदर्शित दारुगोळा त्याच्या सतत विकसित होत असलेल्या स्वरूपामुळे शस्त्रे किंवा मंचाइतकाच महत्त्वाचा असून भविष्यातील युद्धांमध्ये तो अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे असे सांगत संरक्षण मंत्र्यांनी या दारूगोळ्याच्या महत्त्वावर अधिक भर दिला.
‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ मिळविण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत सिंह म्हणाले की या क्षेत्रातील देशांतर्गत उद्योगांना अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत आणि हे उद्योग राष्ट्रीय सुरक्षेमध्ये अधिक वाढ करण्याच्या दृष्टीने सशस्त्र दलांना देशात निर्माण केलेल्या शस्त्रे आणि यंत्रणांसह सुसज्ज करतील. आयुध निर्माण उद्योग मंडळातून निर्माण झालेल्या सातपैकी सहा संरक्षण विषयक कंपन्यांनी त्यांच्या स्थापनेपासून सहा महिन्यात नफा झाल्याची नोंद केली आहे या तथ्याबद्दल केंद्रीय मंत्री सिंग यांनी त्यांची प्रशंसा केली.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या अनेक सुधारणांची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
केंद्रीय संरक्षण मंत्रालय आत्मनिर्भरता प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करत असतानाच मंत्रालय ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून भारतात गुंतवणूक, उत्पादन आणि भारतातून निर्यात करण्यासाठी परदेशी अस्सल साधनांच्या निर्मात्यांना प्रोत्साहन देखील देत आहे असे राजनाथ सिंग यांनी सांगितले. “संरक्षण क्षेत्रावर सर्वात अधिक खर्च करणाऱ्या जगातील पहिल्या दहा देशांमध्ये भारताने स्थान मिळविले आहे आणि त्यामुळे आपला देश संरक्षण सामग्रीसाठीच्या सर्वात आकर्षक बाजारांपैकी एक देश झाला आहे. स्थानिक पातळीवरील प्रयत्न आणि परदेशी सहयोग हा भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा पाया आहे,” असे मत राजनाथ सिंग यांनी व्यक्त केले.
भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ -फिक्की- आणि संयुक्त शस्त्रास्त्रे अभ्यास केंद्र (सीईएनजेओडब्ल्यूएस) यांनी संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले आहे. सशस्त्र दलांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दारूगोळ्याच्या विस्तृत श्रेणीचे सादरीकरण या परिषदेत होत आहे.
* * *
M.Iyengar/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845390)
Visitor Counter : 247