उपराष्ट्रपती कार्यालय
भारतीय संस्कृतीचा अर्थ एकता, शांतता आणि सामाजिक सौहार्दाची वैश्विक मूल्ये असा आहे : उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू
“शाळा आणि महाविद्यालयात सामूहिक सेवा अनिवार्य केली जावी”
परस्परभाव आणि एकमेकांची काळजी हे मूल्य भारतीय मूल्य प्रणालीचा गाभा - उपराष्ट्रपती
Posted On:
24 JUL 2022 3:44PM by PIB Mumbai
भारतीय संस्कृतीचा अर्थ एकता, शांतता आणि सामाजिक सौहार्दाची वैश्विक मूल्ये असा असून या जुन्या मूल्यांचे जतन तसेच प्रचार करण्यासाठी आध्यात्मिक पुनरूज्जीवन करा, असे आवाहन आज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केले. उपराष्ट्रपती भवनात सिंग, डान्स ॲण्ड प्रे- द इनस्पारेशनल स्टोरी ऑफ श्रील प्रभुपाद या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते.
स्वामी प्रभुपादांसारख्या महान संत आणि अध्यात्मिक गुरुंपासून तरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि चांगले मानव बनण्यासाठी शिस्त, परिश्रम, संयम आणि सहानुभूती हे गुण आत्मसात करा असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. जात, लिंग, धर्म आणि प्रदेशाच्या संकुचित विचारातून बाहेर पडून समाजात एकता, सौहार्द आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करा असे त्यांनी सूचित केले. कृष्णाच्या मंदिर परिसरात १० मैल त्रिज्येच्या परिघातील कोणीही भुकेलेले असू नये या स्वामी प्रभुपादांच्या इच्छेची आठवण त्यांनी करून दिली. इस्कॉनच्या सेवेच्या अद्भुत भावनेतून इस्कॉन करत असलेल्या कार्यांचा त्यांनी गौरव केला. या सेवाभावाचा संदर्भ देत नायडू म्हणाले की शेअर करा आणि काळजी घ्या हे मूल्य भारतीय मूल्य प्रणालीचा गाभा आहे. ही मूल्ये युवकांनी आत्मसात करावीत, असे त्यांनी सांगितले. शाळा आणि महाविद्यालयात सामूहिक सेवा अनिवार्य केली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. समाजातील उपेक्षित मुले आणि वंचित घटकांसाठी शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजना अक्षय पत्र फाउंडेशन या जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राबवित असल्याबद्दल त्यांनी इस्कॉनचे कौतुक केले.
इसकॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचे चरित्र डॉ हिंदोल सेन यांनी पुस्तकरूपात शब्दबद्ध केले आहे.
डान्स ॲण्ड प्रे- द इनस्पारेशनल स्टोरी ऑफ श्रील प्रभुपाद हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल नायडू यांनी लेखक दासगुप्ता आणि इस्कॉन बेंगळुरू यांचे अभिनंदन केले. प्रभुपाद यांच्या सव्वाशेव्या जयंतीचे औचित्य साधत त्यांना वाहिलेली ही चपखल आदरांजली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दैनंदिन जीवनात त्यांची तत्त्वे अंगिकारण्यासाठी या पुस्तकामुळे वाचक प्ररित होतील, असा विश्वास त्यांनी दर्शविला. या पुस्तकाचे विविध भाषांमध्ये अनुवाद करायचे आवाहनही त्यांनी केले.
इस्कॉन बंगळुरूचे अध्यक्ष आणि अक्षय पत्र चे अध्यक्ष मधु पंडित दास, उपाध्यक्ष चंचलपती दास, पुस्तकाचे लेखक आणि इतिहासकार, डॉ हिंडोल सेनगुप्ता, इस्कॉनचे भाविक आदी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित होते.
***
S.Thakur/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844399)
Visitor Counter : 252