राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांचा ह्रद्य निरोप समारंभ


पक्षांनी पक्षपाती दृष्टिकोनातून बाहेर पडावे तसेच 'देश प्रथम' या भावनेने सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार करावा- राष्ट्रपती कोविंद

Posted On: 23 JUL 2022 10:19PM by PIB Mumbai

 

मावळते राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा आज (23 जुलै 2022)  संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात ह्रद्य निरोप समारंभ झाला.

राष्ट्रपती म्हणून देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी जनतेचा सदैव ऋणी आहे. सर्वशक्तिमान देवाला जे साध्य करायचे होते ते सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या पाठिंब्याशिवाय पूर्ण होऊ शकले नसते, असे ते म्हणाले. आपण आपल्या कार्यकाळात निवडून आलेल्या प्रतिनिधींशी विविध व्यासपीठांवर वारंवार संवाद साधला होता तसेच आपण संसद सदस्यांच्या आणि इतर क्षेत्रातील लोकांच्या असंख्य शिष्टमंडळांना देखील भेटलो होतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले.  आपल्या कारकीर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांसोबत काम करण्याची संधीही मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.  त्यांना मिळालेल्या विशेष सन्मानाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी ज्या प्रकारे संसदेचे कामकाज चालवले आणि तिची महान परंपरा पुढे चालू ठेवली त्याबद्दलही त्यांनी त्यांचे आभार मानले.

आपल्या राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृहे मिळून संसदेची तरतूद आहे. या घटनात्मक तरतुदीचे पालन करताना या तरतुदीला आपल्या भावनेची जोड देऊन आपण राष्ट्रपतींकडे संसदीय कुटुंबाचा अविभाज्य घटक म्हणून पाहतो, असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही कुटुंबाप्रमाणेच या संसदीय कुटुंबातही मतभेद असतीलच, पुढे वाटचाल कशी करायची याबद्दल भिन्न भिन्न मते असतील. पण, आपण एक कुटुंबच आहोत आणि राष्ट्रहितालाच आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. राजकीय प्रक्रिया पक्ष संघटनांच्या यंत्रणेद्वारे चालतात, परंतु पक्षांनी पक्षपाती दृष्टिकोनाच्या पुढे जाऊन राष्ट्र प्रथमया भावनेने सर्वसामान्य लोकांच्या हिताचे काय आहे , काय आवश्यक आहे याचा विचार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपती म्हणाले की, सार्वजनिक सेवेतील त्यांच्या कारकीर्दीकडे आणि सरकारच्या प्रयत्नांकडे वळून पाहताना आपण हे मान्य केले पाहिजे की, आजवर बरेच काही साध्य झाले असले तरी उपेक्षितांचे जीवनमान उंचावण्यासाठी अजून बरेच काही साध्य करायचे आहे. देश हळूहळू पण निश्चितपणे डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार करत आहे.

राष्ट्रपती म्हणाले की, मूलभूत गरजांची जशी काळजी घेतली जात आहे, तशा लोकांच्या आकांक्षाही बदलत आहेत. सर्वसामान्य भारतीयांच्या स्वप्नांना आता पंख फुटले आहेत. हे सुशासनामुळे शक्य झाले आहे. जनतेची सेवा करतांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करु नये, हीच सुशासनाची मूलभूत भावना आहे, असे सांगत, देशाची  ही सर्वांगीण प्रगती बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेशी सुसंगत आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी म्हणाले.

राष्ट्रपतींचे हिंदी भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

राष्ट्रपतींचे इंग्रजी भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

***

R.Aghor/P.Jambhekar/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1844297)
Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi