जलशक्ती मंत्रालय
राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाअंतर्गत दिल्लीत यमुनेच्या सात घाटांवर स्वच्छता मोहिमा
Posted On:
23 JUL 2022 5:56PM by PIB Mumbai
यमुना नदीसाठी सुरू असलेल्या जागरूकता मोहिमेचा एक भाग म्हणून एनएमसीए अर्थात राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन आणि स्वयंसेवी संस्थांच्या गटाने आज राजधानी दिल्लीत यमुनेच्या सात घाटांवर स्वच्छता मोहिमा राबविल्या. या श्रमदानात शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळी साडेसातला सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमांमध्ये दिल्ली जल बोर्ड आणि दिल्ली महानगरपालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतीयम, रोटरी मंथन, अर्थ वॉरियर्स, युवा परिवर्तन फाउंडेशन, एसवायए या स्वयंसेवी संस्थाही या मोहिमांचा एक भाग आहेत. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी नियमितपणे अशा प्रकारे स्वच्छता मोहिमा आयोजित केल्या जातात.
एनएमसीजीचे तांत्रिक विभागाचे कार्यकारी संचालक डी पी मथुरीया हे या उपक्रमात सहभागी झाले. अधिक चांगल्या आणि शाश्वत भविष्यासाठी आपल्या नद्या स्वच्छ राखण्याचं महत्त्व याविषयी त्यांनी मुलांशी संवाद साधला. या स्वच्छ यमुना चळवळीचा भाग होण्यासाठी त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.
गंगा नदीच्या उपनद्यांची विशेषत: यमुना नदीची स्वच्छता यावर ‘नमामि गंगे’ अभियानाचा मुख्य भर आहे. नमामि गंगे कार्यक्रमांतर्गत कोरोनेशन पिलरवरील 318 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे (एसटीपी) मार्चमध्ये कार्यान्वित करण्यात आली होती तर एनएमसीजीद्वारे निधी मिळालेले यमुनेवरील इतर 3 मुख्य एसटीपी डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यामध्ये आशियामधील रिथाला, कोंडली आणि ओखला या सर्वात मोठ्या एसटीपींचा समावेश आहे. यामुळे यमुनेमध्ये सोडले जाणारे नाल्यांमधील सांडपाणी रोखण्यास मदत होईल. दिल्लीत नमामि गंगे कार्यक्रमांतर्गत यमुना नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सुमारे 1385 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे, सुमारे 2354 कोटी रुपयांचे एकूण 12 प्रकल्प कार्यरत आहेत.
***
R.Aghor/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844218)
Visitor Counter : 173