शिक्षण मंत्रालय
भारत आणि इंग्लंड या देशांतील उच्च शिक्षण संस्थांच्या दरम्यान शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांचे आवागमन वाढविण्यासाठी या दोन्ही देशांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेला परस्परांनी मान्यता देण्यासंबंधीचा सामंजस्य करार
Posted On:
21 JUL 2022 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2022
इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाचे स्थायी सचिव जेम्स बोलर आणि केंद्रीय शिक्षण विभागाचे उच्च शिक्षणविषयक सचिव के.संजय मूर्ती यांनी आज दोन्ही देशांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेला परस्परांनी मान्यता देण्यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
मे 2021 मध्ये आभासी पद्धतीने झालेल्या भारत आणि इंग्लंड या देशांच्या पंतप्रधानांच्या शिखर परिषदेत दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी एकात्मिक आराखडा 2030 चा स्वीकार करण्यात आला होता. दोन्ही देशांनी नव्या वाढीव व्यापारविषयक भागीदारीला देखील मान्यता दिली. शिक्षण क्षेत्र हा या आराखड्याचा महत्त्वाचा घटक आहे. भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेला परस्पर मान्यता देण्यास मंजुरी देऊन दोन्ही देशांनी शिक्षणक्षेत्र विषयक सहकार्य अधिक वाढविण्याला मान्यता दिली आहे.
या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना एकमेकांच्या देशात अधिक सुलभतेने शिक्षण घेणे शक्य होईल आणि दोन्ही देशांतील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या दरम्यान शैक्षणिक तसेच संशोधनविषयक सहकार्याची कक्षा अधिक रुंदावेल. त्यामुळे आपल्या द्विपक्षीय शैक्षणिक संबंधांच्या बाबतीत हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जात आहे.
देशाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अधिक भर देण्यात आलेले शिक्षण क्षेत्राचे आंतरराष्ट्रीयीकरण अधिक सुलभतेने होण्यासाठी भारत सरकार विविध देशांशी मोठ्या प्रमाणात आंतराष्ट्रीय सहकारी संबंध वाढविण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलत आहे.
* * *
R.Aghor/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1843625)
Visitor Counter : 180