कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

18,000 विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी करार, विशेष करून ग्रामीण आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना येत्या तीन वर्षांत प्रशिक्षित करणार


सरकार आणि खासगी क्षेत्र एकत्र येऊन रोजगार आणि उद्योजकता यांच्यासाठीचा आराखडा तयार करणार – ही घडामोड म्हणजे कौशल्यासाठीचे न्यू नॉर्मल असेल : केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून तेथील विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना रोजगार योग्य बनविणे यासाठी भारतभर कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यासाठी सहकार्य

Posted On: 19 JUL 2022 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2022

येत्या तीन वर्षांत देशातील 18,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)आणि ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (एएसडीसी)यांच्याशी सामंजस्य करार केल्याचे एनएसडीसी अर्थात राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने आज जाहीर केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून टोयोटा कंपनीच्या टोयोटा तंत्रज्ञान शिक्षण कार्यक्रमाच्या (टी-टीईपी) माध्यमातून या विद्यार्थ्यांना रोजगार करण्यायोग्य बनविले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना वाहन उद्योग क्षेत्रातील  सामान्य तंत्रज्ञ, बॉडी अँड पेंट तंत्रज्ञ, सेवा सल्लागार, विक्री सल्लागार आणि कॉल सेंटर कर्मचारी या पाच प्रकारच्या कामांचे प्रशिक्षण दिले जाईल.

एनएसडीसीचे मुख्य परिचालन अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वेदमणी तिवारी, एएसडीसीचे प्रमुख अरिंदम लाहिरी आणि टीकेएमचे महाव्यवस्थापक शबरी मनोहर आर यांच्यादरम्यान सामंजस्य कराराच्या दस्तावेजांचे आदानप्रदान झाले. यावेळी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि टीकेएमचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी उपस्थित होते.

वाहन उद्योगासाठी प्रतिभावान आणि तंत्रज्ञानदृष्ट्या कुशल व्यावसायिक निर्माण करण्याच्या उद्देशाने टी-टीईपी कंपनी स्किल इंडिया अभियानाला जोरदार पाठींबा देत कंपनीने आतापर्यंत देशातील 21 राज्यांमधील 56 आयटीआय संस्था आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांशी संलग्न झाली आहे. या घडीला 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी 70% विद्यार्थी विविध ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये काम करत आहेत.

आजच्या कार्यक्रमात,केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने एनएसडीसी आणि एएसडीसी यांच्या सहकार्याने ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करून देशभरात कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यासाठी सुरु केलेला हा उपक्रम या विद्यार्थ्यांना अत्यंत कुशल, रोजगारयोग्य आणि भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरणार आहे. भारत सरकारच्या स्किल इंडिया अभियानाला जोडूनच हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. टोयोटा कंपनीसारख्या उद्योग क्षेत्रातील भागीदारांना प्रोत्साहन देणे, पाठबळ पुरविणे आणि त्यांच्याशी सहकारी संबंध स्थापित करणे या उद्देशाने त्यांना कौशल्य विषयक तफावत भरून काढण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे कार्यबळ विकसित करण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असे ते पुढे म्हणाले.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1842879) Visitor Counter : 140


Read this release in: Punjabi , Hindi , English , Urdu