वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात 14% वाढून 5987 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सवर
पहिल्या तिमाहीत प्रक्रिया केलेल्या अन्न निर्यातीत 36.4% वाढ झाली आहे
2022-23 साठी एकूण 23.56 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्यएवढ्या निर्यात लक्ष्यापैकी 25.4% पहिल्या तीन महिन्यांत साध्य
Posted On:
17 JUL 2022 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2022
गेल्या वर्षाचा कल कायम ठेवत 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून), आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच कालावधीच्या तुलनेत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत 14 टक्के वाढ झाली आहे.
2022-23 या वर्षासाठी, सरकारने अपेडा( APEDA-कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण) अंतर्गत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या गटासाठी 23.56 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याएवढ्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकारांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत एकूण वार्षिक निर्यात लक्ष्याच्या त्यापैकी 25 टक्के साध्य करण्यात मदत झाली आहे.
वाणिज्य माहिती आणि सांख्यिकी महासंचालनाद्वारे (डायरेक्टरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्स -DGCI&S) जारी केलेल्या त्वरित अंदाज आकडेवारीनुसार, अपेडाअंतर्गत येणाऱ्या उत्पादनांची एकूण निर्यात एप्रिल-जून 2022 मध्ये गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 5256 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत वाढून 5987 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सएवढी झाली. एप्रिल-जून 2022-23 साठी निर्यातीचे लक्ष्य 5890 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याएवढे होते. अपेडा अंतर्गत चहा, कॉफी, मसाले, कापूस आणि सागरी निर्यात वगळण्यात आली आहे.
ताजी फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत 8.6 टक्के वाढ नोंदवली गेली, तर प्रकियाकृत अन्नउत्पादने जसे की तृणधान्ये आणि विविध प्रक्रिया केलेल्या पदार्थांसारख्या खाद्य उत्पादनांमध्ये मागील वर्षाच्या याच महिन्यांच्या तुलनेत 36.4 % (एप्रिल-जून 2022-23) ची वाढ नोंदवली गेली.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तीन महिन्यांत तांदळाच्या निर्यातीत 13 टक्के वाढ झाली आहे, तर मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि कुक्कुट उत्पादनांच्या निर्यातीत 9.5 टक्के आणि इतर तृणधान्यांच्या निर्यातीत 29 टक्के वाढ झाली आहे.
“देशातल्या वैशिष्ठयपूर्ण उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आम्ही कृषी माल मूल्य साखळीतील विविध भागधारकांना तांत्रिक आणि आर्थिक साहाय्य करतो'',असे अपेडाचे अध्यक्ष एम अंगमुथू यांनी सांगितले.
कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत झालेली वाढ हे कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यात प्रोत्साहनासाठी सरकारने केलेल्या विविध प्रयत्नांचा जसे की विविध देशांमध्ये B2B प्रदर्शने आयोजित करणे, उत्पादन-विशिष्ट आणि सामान्य विपणन मोहिमेद्वारे नवीन संभाव्य बाजारपेठांचा शोध घेणे, भारतीय दूतावासांचा सक्रिय सहभाग, यांचा परिणाम आहे. भारतामध्ये नोंदणीकृत भौगोलिक संकेतांक (GI) असलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने संयुक्त अरब अमिरातीसह आणि हस्तशिल्पांसह भौगोलिक संकेतांक असलेल्या उत्पादनांसाठी अमेरिकेसह खरेदीदार-विक्रेता यांच्या आभासी बैठका आयोजित करण्यासारखी अनेक पावले उचलली.
* * *
N.Chitale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842239)
Visitor Counter : 296