संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते कोलकाता मधील जीआरएसई लि. येथे प्रोजेक्ट 17A श्रेणीतील Y- 3023 दुनागिरी युद्धनौकेचे जलावतरण

Posted On: 15 JUL 2022 6:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2022

 

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांच्या हस्ते 15 जुलै 2022 रोजी कोलकाता येथे गार्डन रीच शिपबिल्डर्स लिमिटेडद्वारा  निर्मित प्रोजेक्ट 17A श्रेणीतील Y- 3023 दुनागिरी युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार आणि भारतीय नौदल तसेच मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी या समारंभाला उपस्थित होते.

P17A युद्धनौका-P17 (शिवालिक श्रेणी) युद्धनौकांसाठी फॉलो-ऑन आहेत, यामध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहेत. माझगाव डॉक लिमिटेड आणि जीआरएसई  येथे सात P17A युद्धनौका  बांधकामाच्या विविध टप्प्यांमध्ये  आहेत.

या प्रसंगी बोलताना, संरक्षण मंत्र्यांनी  युद्धनौका निर्मितीसंदर्भात देशाला स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यात योगदान दिलेल्या नौदल रचना संचालनालय आणि नौदलाच्या इतर  पथकांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तसेच विविध आव्हाने असूनही जहाज निर्मिती क्षेत्रात जीआरएसईने दिलेल्या अथक पाठिंब्याबद्दल आणि भारतीय नौदलाला जहाज बांधणी योजना साकार करण्यात मदत केल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. संरक्षण मंत्री म्हणाले की, 'दुनागिरी' ही  समुद्र, आकाश आणि पाण्याखालून शत्रूंना नामोहरम करण्याची बहुआयामी क्षमता असलेली जागतिक दर्जाची युद्धनौका ठरेल.

बदलत्या जागतिक परिस्थितीत आपल्या पायाभूत सुविधा आणि मालमत्ता वाढवण्याच्या गरजेबद्दल बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, विविध देशांमध्ये आर्थिक, राजकीय आणि व्यापारी संबंध सातत्याने विकसित होत आहेत. हिंद महासागर क्षेत्र आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील  सुरक्षा विषयक आव्हाने सतत वाढत आहेत. 'सागर', म्हणजेच 'प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास' हे पंतप्रधानांचे स्वप्न साकारण्यासाठी आणि भारताच्या राष्ट्रीय सागरी हितांच्या रक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर संस्थांनी पायाभूत सुविधा आणि मालमत्ता वाढवणे आवश्यक आहे, जेणेकरुन या आव्हानांना सामोरे जाताना देश अग्रेसर राहील.

 

R.Aghor/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1841835) Visitor Counter : 225