पर्यटन मंत्रालय
एक भारत श्रेष्ठ भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत ओदीशातील 50 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राला दिली भेट
ओदीशातील विद्यार्थी महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, परंपरा, संगीत, चित्रपट, खाद्यपदार्थ, वनस्पती/प्राणी जीवन आणि वैज्ञानिक योगदानाबद्दल जाणून घेऊन समृद्ध होऊन परतले
Posted On:
08 JUL 2022 8:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2022
एक भारत श्रेष्ठ भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत ओदीशातील 50 विद्यार्थ्यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. विनिमय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी 29 जून रोजी मुंबईत पोहोचले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि शिक्षण मंत्रालयाने या विनिमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ओदीशातील 50 विद्यार्थ्यांच्या तुकडीसाठी मुंबईच्या ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीने कार्यक्रम आयोजित केला होता आणि या माध्यमातून महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, परंपरा, संगीत, खाद्यपदार्थ इत्यादींबद्दल जाणून घेण्याची या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली.

ओदीशातील विद्यार्थ्यांच्या या तुकडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. आणि त्यांना पुरणपोळी, कोथिंबीर वडी, मिसळ पाव आणि कांदे पोह्यांसह महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची मेजवानी देण्यात आली. याशिवाय, ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या पेस्ट्री शेफद्वारे केक बनवण्याच्या कार्यशाळेचे थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये याबाबतीत खूप स्वारस्य निर्माण झाले.

या दौऱ्याचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या विविध ठिकाणांना भेट दिली. त्यांनी प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला भेट दिली.पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय म्हणून ओळखल्या जाणार्या, या वस्तुसंग्रहालयात ,मुघल साम्राज्य काळातील अनेक अवशेष, कलाकृती आणि हस्त कलाकृती, सिंधू संस्कृती आणि मुंबईचे इतर खंडांशी असलेल्या व्यापारी संबंधांचे दाखले देणाऱ्या वस्तू प्रदर्शित केल्या आहेत.

राज्यातील वनस्पती आणि प्राणीजीवन अनुभवण्यासाठी, जगातील सर्वात मोठे पूर्णपणे शहरी वर्दळीने वेढलेले उष्णकटिबंधीय जंगल म्हणून वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला या विद्यार्थ्यांनी भेट दिली. अद्वितीय बौद्ध शैली आणि स्थापत्यकलेचे प्रदर्शन घडवणाऱ्या सुमारे 100 लेणी असलेल्या या उद्यानातील कान्हेरी लेणींना भेट देण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळाली.

भारताची मनोरंजनाची राजधानी आणि बॉलीवूडचे केंद्र असलेल्या मुंबईतील महालक्ष्मी येथील भारतीय चित्रपट संग्रहालयाला विद्यार्थ्यांनी भेट दिली.विद्यार्थ्यांनी वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र आणि गिरगावमधील दर्शक गॅलरीही पाहिली. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांनी एआर व्हीआर तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीला आणि ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला भेट दिली.

आपल्या भेटीच्या अखेरच्या दिवशी, ओदिशातील विद्यार्थ्यांनी टीसीईटीच्या स्वयंसेवकांसमवेत बोरिवली येथील जागतिक विपश्यना केंद्राला भेट दिली. यावेळी निरोप समारंभही झाला, ज्यात विद्यार्थ्यांनी ओडिसी आणि भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर केले.

आपल्या मुक्कामात, दोन्ही राज्यांच्या विद्यार्थ्यांना एकमेकांची परंपरा, संस्कृती, जीवनशैली, शिक्षण, आदीवर वैचारिक देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली. यावेळी खोल्यांमध्ये आणि बाहेरील वातावरणातील विविध प्रकारचे उपक्रम, गमतीचे खेळ आणि मैत्रीपूर्ण सामने यात गुंतले होते.
ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ एव्हीएशन इंजिनिअरिंग या संस्थेत मुलांसाठी यंत्राच्या सहाय्याने विमान उड्डाण कसे करायचे, यावर एक प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले होते.
एक भारत श्रेष्ठ भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यार्थी विनिमय या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भेटीत अनेक मनोरंजक आणि उत्साहजनक कार्यक्रम होते. गुनूपूर येथील जीआयईटी विद्यापीठाची अनया राय म्हणाली की, आम्ही मुंबईला भेट दिल्यावरच मुंबई ही जुन्या आणि नव्या संस्कृतींचे शुद्ध मिश्रण आहे, याची आम्हाला जाणीव झाली. प्रत्येक सेकंदाला शहर वाढते आहे, असे वाटते तरीही ते आपल्या अमूल्य इतिहासाचे सुंदररित्या संरक्षण करू शकतात. मी म्हणेन की हा पाच दिवसांचा कार्यक्रम संपूर्ण यशस्वी झाला. दुसरा विद्यार्थी आशुतोष बिस्वाल म्हणाला की, आम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, परंपरा, कपडे, खाद्यपदार्थ, वारसा, संस्कृती आणि भाषा आदींबाबत माहिती मिळाली. महाराष्ट्राबद्दल थोडक्यात माहिती मिळण्याचा माझ्यासाठी हा अतिशय महत्वपूर्ण अनुभव होता. यातील सर्वोत्कृष्ट भाग म्हणजे नवीन मित्र मिळाले, हा होता, असे त्याने पुढे सांगितले.
एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचा उद्देश, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातील जोड्यांच्या कल्पनेच्या माध्यमातून विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील लोकांमध्ये परस्परसंवाद वाढून आणि सामंजस्याला चालना मिळावी, हा आहे. भाषा अध्ययन, संस्कृती, परंपरा आणि संगीत, पर्यटन, खाद्यप्रकार, क्रीडा आणि उत्तम रितीरिवाजांची देवाणघेवाण या क्षेत्रांत शाश्वत आणि रचनात्मक सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठी राज्ये विविध उपक्रम आयोजित करत असतात.
* * *
S.Patil/S.Chavan/U.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840224)
Visitor Counter : 253