विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी, ‘कार्बन न्यूट्रल’ बांधकाम क्षेत्रांमधील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे आणि 2030 पर्यंत भारताला 500 गिगावॅट जीवाश्म विरहित ऊर्जा क्षमता प्राप्त करण्यात मदत करण्यासाठी त्यांना उद्योगाशी जोडण्याचे केले आवाहन
हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत-अमेरिका यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या सोलर डेकॅथलॉन इंडियाच्या पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ जितेंद्र सिंह यांचे विशेष मार्गदर्शन
Posted On:
02 JUL 2022 6:41PM by PIB Mumbai
"कार्बन न्यूट्रल" बांधकाम क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे आणि COP26 बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 2030 पर्यंत भारताला 500 GW जीवाश्मरहित ऊर्जा क्षमता गाठण्यासाठी या स्टार्टअप्सना उद्योगाशी जोडण्याचे आवाहन आज केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालय,कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, सेवानिवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अवकाश या खात्यांचे राज्यमंत्री, डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.
हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत-अमेरिका यांनी सुरू केलेल्या स्वच्छ ऊर्जाविषयक सोलर डेकॅथलॉन इंडिया या संयुक्त उपक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डॉ जितेंद्र सिंह यांनी इमारत बांधकाम क्षेत्रातील विकासकांना आवाहन केले, स्थावर मालमत्ता विकासक, बांधकाम विकासक, उद्योग क्षेत्र आणि अभ्यासकांनी भारताच्या पर्यावरणीय क्षेत्रांच्या वेगळ्या गरजा ओळखून त्यावर नावीन्यपूर्ण आणि रास्त उपाययोजना शोधायला हव्यात. टोकाच्या हवामानात जीवित आणि मालमत्तेला निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी हे उपाय योजले गेले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअपना पूर्णपणे पाठबळ दिले असून त्यांनी हवामान बदलासह देशासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करायचे आवाहन केले आहे, असे त्यांनी सांगितले. नेट-शून्य कार्बन उत्सर्जन विषयक स्टार्टअप्स भारतात वेगाने उदयास येऊ लागले आहेत. त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) त्यासाठी सर्व आर्थिक साहाय्य केल्याचे त्यांनी नम़ूद केले.
अशा उपक्रमांचा अवलंब करण्यासाठी व्यवसायांनी खुलेपणाने पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. स्वच्छ आणि हरित इमारतींव्यतिरिक्त, स्वच्छ वाहतुकीवर दिलेला भर, सौर जलपंप आणि सौरऊर्जेवर चालणारे रेफ्रिजरेशन, क्लीन ग्रिड पॉवर, इलेक्ट्रिक वाहने ही भारताच्या स्वच्छ तंत्रज्ञानावर आधारित परिसंस्थेसाठी महत्त्वाची क्षेत्रे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. निव्वळ-शून्य ऊर्जा आणि निव्वळ-शून्य-पाणी विकसित करण्याच्या कल्पना विकसित करताना येणारी आव्हाने लक्षात घेऊन त्यांनी सोलर डेकेथलॉनमधील सहभागींचे आणि विजेत्यांचे त्यांच्या प्रकल्पांबद्दल आणि त्यांनी काढलेल्या नावीन्यपूर्ण तोडग्यांबद्दल अभिनंदन केले. सोलर डेकेथलॉन पुढच्या पिढीचे आर्किटेक्ट, अभियंते आणि व्यावसायिकांना कार्बन उत्सर्जनमुक्त इमारती बांधण्यात मदत करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ जितेंद्र सिंग यांनी पुरस्कारांचे वितरण केले आणि पोस्टर सत्रात फिरून तरुण नवोन्मेषक आणि त्यांचे शिक्षक मार्गदर्शक यांच्याशी संवाद साधला. सोलर डेकॅथलॉन इंडिया हा एक अद्वितीय उपक्रम आहे, असे ते म्हणाले.
भारतीय विद्यापीठे, महाविद्यालयांमधील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सोलर डेकॅथलॉन इंडिया ही एक वार्षिक स्पर्धा असून हवामान बदलाला तोंड देण्यासाठी इमारत बांधकाम क्षेत्रात नाविन्यपूर्ण, निव्वळ-शून्य ऊर्जा आणि कोणत्याही हवामानाला तोंड देणाऱ्या उपाययोजनांचा त्यातून शोध घेतला जातो, असे त्यांनी सांगितले.
***
S.Patil/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838858)
Visitor Counter : 241