उपराष्ट्रपती कार्यालय

विद्यालयांनी विद्यार्थ्यांमध्ये चौकसवृत्ती आणि नवोन्मेषाची प्रेरणा जोपासली पाहिजे : उपराष्ट्रपती


“आजच्या काळात विद्यालये त्यांच्या विद्यार्थ्यांना कोणते सर्वोत्तम कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करू शकतात तर ते म्हणजे स्वीकारार्हता”

वर्गातील अध्यापनाला प्रत्यक्ष क्षेत्रावरील कार्ये आणि समाजसेवेचे उपक्रम यांची जोड देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

शाळांमध्ये शिक्षणाचे मध्यम म्हणून मातृभाषेला उपराष्ट्रपतींनी अधिक अनुकुलता दर्शविली

“मूल्यरहित शिक्षण म्हणजे शिक्षण न घेतल्यासारखेच आहे,” नायडू यांचे प्रतिपादन

उपराष्ट्रपतींच्या हस्ते वेल्लोर आंतरराष्ट्रीय विद्यालयाचे उद्घाटन

Posted On: 29 JUN 2022 2:28PM by PIB Mumbai

 

एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान-प्रेरित विश्वातील आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सज्ज करण्याकरिता विद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, नवोन्मेष आणि उत्कृष्टतेची प्रेरणा जोपासली पाहिजे असे आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी देशभरातील विद्यालयांना केले.

शिक्षणातील कंटाळवाणेपणा दूर करतानाच अध्यापनात भविष्यकालीन दृष्टीकोन स्वीकारण्याचे आवाहन करत उपराष्ट्रपती म्हणाले, आजच्या काळात विद्यालये त्यांच्या विद्यार्थ्यांना कोणते सर्वोत्तम कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करू शकतात तर ते म्हणजे स्वीकारार्हता. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, चपळपणे कार्य करण्याचे  आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अभिनव संशोधने करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे, त्यांनी पुढे सांगितले.

चेन्नई जवळच्या व्हीआयटी समूहाच्या संस्थांचा एक उपक्रम असलेल्या वेल्लोर आंतरराष्ट्रीय विद्यालयाचे उद्घाटन करताना उपराष्ट्रपती बोलत होते. लहान मुलाच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये असलेल्या अध्यापनाच्या महत्त्वावर भर देत उपराष्ट्रपती नायडू यांनी पारंपारिक शिक्षण पद्धतीत या मुलांचा बहुतेक काळ वर्गाच्या चार भिंतींच्या बंदिस्त चौकटीत व्यतीत होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी  बाह्य जगाचा अनुभव घ्यावा, निसर्गाच्या संगतीत वेळ घालवावा, समाजाच्या सर्व घटकांशी संवाद साधावा आणि विविध हस्तकला तसेच व्यवसाय यांचे ज्ञान मिळवावे यासाठी त्यांना उत्तेजन दिले जावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. 

शाळेच्या वर्गातील अध्यापनाला प्रत्यक्ष क्षेत्रावरील कार्ये आणि समाजसेवेचे उपक्रम यांची जोड देण्याचे आग्रही प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच सेवाभाव आणि देशभक्तीची भावना रुजविण्याची अत्यंत गरज आहे.

भारताची गुरुकुल शिक्षण पद्धती व्यक्तीच्या समग्र विकासावर लक्ष केंद्रित करणारी होती आणि त्यामध्ये शिक्षक मुलांसोबत वेळ व्यतीत करत असत याची आठवण उपराष्ट्रपतींनी करून दिली. त्या शिक्षण पद्धतीमध्ये व्यक्तिमत्त्वाला आकार देणे आणि विद्यार्थ्याचे योग्य मूल्यमापन करणे यावर भर दिला जात असे. सध्याच्या शाळांनी, ‘गुरु-शिष्य परंपरेचीसकारात्मक शैली उचलली पाहिजे असे निरीक्षण नोंदवत नायडू म्हणाले की अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कार्ये यांच्यातील कृत्रिम पृथक्करण सोडून द्यायला हवे आणि शिक्षण क्षेत्रात बहुशाखीय अध्ययन पद्धतीला प्रोत्साहन द्यायला हवे.

विद्यालयांनी प्रत्येक विद्यार्थ्यातील सर्वोत्तम क्षमता आणि उच्च प्रतीच्या सद्गुणांचा आविष्कार करणाऱ्या  मूल्याधारित, समग्र शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

शाळांमध्ये शिक्षणाचे मध्यम म्हणून मातृभाषेला असलेले महत्त्व अधोरेखित करत नायडू म्हणाले, विद्यार्थ्यांनी त्यांच्या सामाजिक वातावरणात मातृभाषेत मुक्तपणे संवाद साधावा यासाठी  आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मातृभाषेत मुक्तपणे आणि अभिमानाने बोलू शकू तेव्हाच आपण आपल्या सांस्कृतिक वारशाची खऱ्या अर्थाने जपणूक करू शकू.

मातृभाषेसोबतच इतर भाषांवर प्रभुत्व मिळविण्यामुळे सांस्कृतिक सेतू उभारण्यास मदत होते आणि अनुभवाच्या नव्या जगाच्या खिडक्या आपल्यासाठी खुल्या होतात याकडे त्यांनी निर्देश केला. कोणत्याही भाषेचे लादले जाणे किंवा कोणत्याही भाषेला पूर्णपणे विरोध असणे या दोन्ही गोष्टी टाळणे आवश्यक आहे यावर भर देत, आपल्यापैकी प्रत्येकाने शक्य असतील तितक्या भाषा अवश्य शिकाव्यात पण मातृभाषेला सर्वोच्च स्थान द्यावे अशी सूचना उपराष्ट्रपती नायडू यांनी यावेळी केली.

मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या सुनिश्चितीसाठी, नियमित शारीरिक व्यायामाचा उपक्रम हाती घेण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची आवाहन त्यांनी शाळा व्यवस्थापनाला केले. निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी क्रीडा अथवा तत्सम व्यायामप्रकारात उत्साहाने सहभागी होण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

तामिळनाडूचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री टी. एम.अन्बरासन, व्हीआयटी समूहाच्या संस्थांचे संस्थापक आणि कुलपती डॉ.जी.विश्वनाथन, व्हीआयटीचे प्रमुख आणि उपाध्यक्ष जी.व्ही.सेल्वम, व्हीआयटीचे उपाध्यक्ष शंकर विश्वनाथन, व्हीआयटीचे उपाध्यक्ष डॉ.शेखर विश्वनाथन यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

S.Thakur/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838052) Visitor Counter : 202